नाथ संप्रदायात प्रसिद्ध असणारे एक प्रमुख नाथ-योगी व रससिद्ध. यांना नाथ संप्रदायात नागनाथ किंवा नागार्जुन या नावाने ओळखले जाते. नवनाथ भक्तिसार या ग्रंथात त्यांना ‘अविर्होत्र’ नारायणाचा अवतार म्हटले गेले आहे. सा-स्क्य-विहार (११-१३ वे शतक), वर्णरत्नाकर (१४ वे शतक), तत्त्वसार (१४ वे शतक), शिवदिन-मठ-संग्रह सूची (१७-१८ वे शतक) इ. सिद्धांच्या सूचींमध्ये त्यांचे नाव आढळते. या सर्व सूचींमध्ये त्यांना ‘नागार्जुन’ या नावानेच संबोधले आहे.

नागनाथ (नागार्जुन) यांचे एक काल्पनिक चित्र.

भारतीय इतिहासात नागार्जुन या नावाचे काही विद्वान, विशेषकरून बौद्ध व शैव परंपरेत होऊन गेल्याचे सांगितले जाते. परंतु नाथ संप्रदायाचा उदय हा साधारणतः ११-१२ व्या शतकातला मानला गेला असल्याने बौद्ध महायान परंपरेतील नागार्जुन (इ. स. सु. १५०–२५०), तसेच सातव्या शतकाच्या सुरुवातीला होऊन गेलेले सरहचे शिष्य नागार्जुन हे निश्चितच नाथ संप्रदायातील मान्य नागार्जुन नसावेत, असे काही विद्वानांचे मत आहे. त्यानंतर साधारणतः नवव्या शतकात देखील एक नागार्जुन होऊन गेले, जे रसविद्येत निपुण होते. इ. स. १०३० मधील अल् बीरूनी या परकीय प्रवाशाच्या वर्णनावरून त्याच्या १०० वर्षांपूर्वी नागार्जुन नावाचे रससिद्ध होऊन गेले असल्याचे समजते. सोळाव्या शतकातील प्रभुलिंगलीला  या तेलुगू ग्रंथानुसार नागार्जुन व गोरक्षनाथ यांना रसविद्येच्या कलेत अल्लमप्रभू यांनी श्रीपर्वतावर दीक्षित केले असल्याचे म्हटले आहे.

तेराव्या शतकातील लीळाचरित्र  या ग्रंथात नागार्जुनाचे उल्लेख लीळा क्र. ५११, ५४१, ५४२ (उत्तरार्ध) मध्ये आलेले आहेत. त्यामध्ये चक्रधरांनी, त्यांच्याविषयी दोन कथाही सांगितलेल्या आहेत. लीळा क्र. ५११ मध्ये चक्रधरांनी गुरू-भक्तीचे उदाहरण देताना नागार्जुनाचा शिष्य कणेरीचा संदर्भ दिला आहे. कणेरीने आपल्या गुरूसाठी आपला डोळा अर्पण केला होता, असे या कथेवरून समजते.

लीळा क्र. ५४१ व ५४२ मध्ये सध्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील ‘लाड-जळगाव’ गावी असणाऱ्या नागार्जुनांच्या विवरासंबंधी उल्लेख मिळतो. त्यात चक्रधरांनी आपल्या दाइंबा नावाच्या शिष्येला नागार्जुनांचे विवर नदीच्या किनारी पश्चिमाभिमुख असल्याचे सांगितले आहे. चक्रधरांनी त्या विवराला भेट दिली होती. या कथेनुसार येथील विवरात नागार्जुनांचे डोके व धड वेगळे पडले होते. जो कोणी तेथे जाऊन त्यांचे डोके व धड एकत्र जुळवेल तेव्हाच ते उठतील, तसेच त्या व्यक्तीस विवरसिद्धी प्राप्त होईल. जर दाइंबा तेथे जाईल, तर तिलाही विवरसिद्धी प्राप्त होईल, असे वर्णन केलेले आढळते.

नित्यनाथाच्या रसरत्नाकर  या ग्रंथामध्ये श्रीपर्वतावरील रसशाळेचा उल्लेख आलेला आहे. रससिद्ध नागार्जुनांनी आंध्र प्रदेशातील श्रीपर्वतावर आपली रसशाळा उभारली होती. तसेच तेलुगू भाषेतील नवनाथचरीत्रमु  या ग्रंथातही असा उल्लेख आहे की, नागार्जुन शिष्य ‘आत्रेय’ याने श्रीपर्वतावर पाताळगंगेजवळील एका गुहेत रसशाळा थाटली होती आणि संपूर्ण श्रीपर्वतच सुवर्णात रूपांतरित करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. एकंदरीत, ९-१० व्या शतकातील रससिद्ध नागार्जुन हेच पुढे नवनाथांपैकी ‘नागनाथ’ म्हणून प्रसिद्ध झाले असावेत.

महाराष्ट्रात काही मंदिरांवर नागांच्या समवेत काही योगी दर्शविले आहेत. ही शिल्पे नागनाथ यांची असावीत. कारण या शिल्पांसोबत काही ठिकाणी मत्स्येंद्रनाथ व अन्य नाथ-योगी कोरलेले दिसून येतात. या शिल्पांमध्ये त्यांना साधारणपणे नाग, कर्णकुंडले, बाजूबंध, कंठहार, कंगण व सोट्यासोबत दर्शविले आहे. तिबेटमधील सिद्धांच्या चित्रांमध्येही त्यांची चित्रे आढळून येतात. सिद्धांच्या सूचीत दिल्याप्रमाणे तसेच लीळाचरित्रातील उल्लेखांवरून सिद्ध कणेरी हे नागार्जुनांचे शिष्य ठरतात.

लातूर जिल्ह्यातील नागनाथ-वडवळ हे ठिकाण नागनाथांचे प्रसिद्ध स्थान मानले जाते. येथे १३-१४ व्या शतकातील एक मंदिरही आहे. या भागातील डोंगररांगांवर अनेक औषधी वनस्पती आढळून येतात.

संदर्भ :

  • Eliade, Mircea, Ed., The Encyclopaedia of Religion, Vol.10, New York, 1987.
  • White, D. G. The Alchemical Body (Siddha tradition in Medieval India), Chicago, 1996.
  • कोलते, वि. भि. संपा., लीळाचरित्र, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, १९७८.
  • ढेरे, रा. चिं. नाथ संप्रदायाचा इतिहास, पुणे,२०१० (पुनर्मुद्रण).
  • द्विवेदी, हजारीप्रसाद, नाथ संप्रदाय, अलाहाबाद, १९५०.

                                                                                                                                                                                    समीक्षक : प्रमोद जोगळेकर