नवनाथांपैकी एक ‘नाथ’ व चौऱ्याऐंशी सिद्धांपैकी एक ‘सिद्ध’. जालंधरनाथांचे शिष्य. साधारणतः दहाव्या-बाराव्या शतकातील बंगाली चर्यापदांमध्ये ते स्वतःला ‘कापालिक’ संबोधतात. कानिफनाथांना कण्हपा, कृष्णपा, कर्णपा, कृष्णपाद, कानिपा, कान्हूपा, कानपा, कानफा, कृष्णाचार्य, कर्णरी, कर्णरिपा, काननीपा, कृष्णवज्र, कण्ह, कान्ह, काण्हपाद, कृष्णाचार्यपाद, कान्हिललाङ्गा, चोम्पापा (नाग-पो-स्प्योड-पा), कृष्णचारी तसेच महाराष्ट्रात ‘कानिफनाथ’ व ‘कान्होबा’ या अन्य नावांनीही ओळखले जाते.

कानिफनाथ व बहुडी, हिरा गेट, दभोई (गुजरात).

कानिफनाथांचे नाव चौऱ्याऐंशी सिद्धांमध्ये आढळते. ‘वर्णरत्नाकर’ (१४ वे शतक) व ‘सहजयानी’ सिद्धांच्या सूचीमध्ये (११-१३ वे शतक) क्रमश: ‘कान्ह’ व ‘कर्णरिपा’ ही नावे आली आहेत. चौऱ्याऐंशी सिद्धांपैकी सात सिद्ध हे त्यांचे शिष्य संबोधले जातात. त्यांपैकी ‘कनखला’ व ‘मेखला’ ह्या त्यांच्या दोन शिष्या होत. १४ व्या शतकातील चांगदेव लिखित तत्त्वसार या मराठी ग्रंथात त्यांना ‘कान्हु’ म्हटले आहे. पैठण येथील शिवदिन केसरी मठातील सूचीमध्ये त्यांचा उल्लेख ‘कान’ म्हणून येतो. अनेक ठिकाणी त्यांचा उल्लेख ‘महाचार्य’, ‘महासिद्धाचार्य’, ‘उपाध्याय’ व ‘मंडलाचार्य’ असाही केला जातो. तंजूर ग्रंथानुसार कानिफनाथ हे मूळचे ओडिशाचे, तर तिबेटी परंपरेनुसार कर्नाटकातील मानले जातात. नागेंद्रनाथ उपाध्याय यांनी अपभ्रंश व संस्कृत साधनांच्या आधारे कृष्णपादांना ‘बौद्ध-कापालिक’ ठरविले आहे. नवनाथभक्तिसार या सांप्रदायिक मराठी ग्रंथात त्यांना प्रबुद्धनारायणाचा अवतार म्हटले आहे.

बौद्ध परंपरेतील हेवज्रपंजिका योगरत्नमाला नावाच्या पोथीचे हस्तलिखित पंडिताचार्य ‘कान्ह’ यांच्या नावावर आहे. राहुल सांकृत्यायन यांच्या मतानुसार त्यांनी सहा ग्रंथ तत्त्वज्ञानावर, तर ७४ ग्रंथ तंत्रमार्गावर लिहिले होते. कान्हपाद-गीतिका, महाढूंढन-मूल, वसंततिलक, असंबंध-दृष्टि, वज्रगीति आणि दोहाकोष हे ग्रंथ अपभ्रंश मध्ये होते, त्यांचे अनुवाद तंजूरमध्ये मिळतात. साधनमालेत कानिफनाथांना ‘कुरुकुल्ला देवी’ चे प्रवर्तक मानले आहे. महाराष्ट्रामध्ये ते खूप लोकप्रिय असून त्यांना मानणारा मोठा भक्तवर्ग आहे. लीळाचरित्रातील त्यांच्या उल्लेखावरून हे स्पष्ट होते की, यादव काळात विशेषतः १३ व्या शतकापासून त्यांच्या संबंधित कथा महाराष्ट्रात प्रसिद्ध होत्या. आजही भीमा नदीच्या खोऱ्यात कानिफनाथांशी निगडित अनेक मंदिरे व दर्गे पाहावयास मिळतात. उदा., मढी, कानिफनाथगड आणि गुहा.

सुनीतीकुमार चटर्जी यांच्या मते, ‘कृष्णपाद’ किंवा ‘कान्ह’ (कानिफनाथ) नावाने अनेक योगी होऊन गेले असावेत. सेतुमाधवराव पगडी यांच्या मते, मढी येथील कानिफनाथ हे १५ व्या शतकातील होत. १५ व्या शतकात सूफी मताचा प्रसार द्रुतगतीने सुरू होता. या शतकात कानिफनाथांसारखे धर्मांतरित हिंदू धर्मप्रचार करत होते, तसेच मुसलमान पीरांनाही लोकमान्यता मिळत होती. ‘सय्यदुस्सादात निजामुद्दिन-इद्रीस-अलहुसैनी’ नामक सूफी साधूला धर्म-प्रचारासाठी त्यांचे गुरू सय्यद जिया यांनी पैठण प्रांत सोपविला होता. निजामुद्दिनच्या शिष्यांमध्ये कानिफनाथ उर्फ ‘शाह रमजान’ हे एक प्रसिद्ध शिष्य होते. त्यांना दीर्घायुष्य लाभले होते. मढीमध्ये जवळपास ५० वर्षे राहून १५ व्या शतकाच्या शेवटी त्यांनी आपला देह त्यागला. जे.जे. रायबर्मन यांनी त्यांच्या ग्रंथात कानिफनाथांच्या सशरीर समाधीची चर्चा करून त्यांचा समाधी काळ इ. स. १३६० ठरविला आहे. लीळाचरित्रातील लीळा क्रमांक ५०७ (उत्तरार्ध) वरून हे स्पष्ट होते की, १३ व्या शतकात महाराष्ट्रात जालंधरनाथ हेच कान्ह किंवा कानिफनाथांचे गुरू असल्याचे सर्वविदित होते.

कानिफनाथ व योगिनी बहुडी, विष्णू मंदिर, पळसदेव.

पुरातत्त्वीयदृष्ट्या विचार केल्यास त्यांची काही चित्रे, मंदिरे व दर्गे आजमितीस अस्तित्वात आहेत, परंतु मूर्तिशिल्पांमध्ये ते ओळखता येऊ शकले नव्हते. १३ व्या शतकातील महानुभाव पंथाच्या लीळाचरित्र या ग्रंथात त्यांच्याविषयी वर्णन केलेल्या आख्यायिकेमुळे तसेच तिबेट हाउस संग्रहालयातील चित्रांवरून त्यांच्या मूर्तिशिल्पांची ओळख पटविता येणे शक्य झाले.

कानिफनाथांचे उल्लेख लीळाचरित्रातील लीळा क्रमांक ४४८ (पूर्वार्ध), १९४, ५०७ (उत्तरार्ध) व ११४ (अज्ञात लीळा) मध्ये आलेले आहेत. यांपैकी लीळा क्रमांक १९४ खूप महत्त्वाची आहे. तीत वर्णिलेल्या कथेत कानिफनाथांना ‘कान्ह’ म्हटले गेले आहे. जेव्हा उपासनी पंथाचे योगी रीद्धिपुरात आले व त्यांच्या साधनेतील अधिक वृत्तीविषयी चर्चा सुरू झाली, तेव्हा कान्ह व बहुडी योगिनीच्या कथेचे उदाहरण खुद्द चक्रधरांनी आपल्या शिष्यांना दिले होते. त्या कथेनुसार, एकदा कान्ह आपल्या १४०० शिष्यांसमवेत बहुडीच्या जंगलात गेले होते. त्यांच्या आगमनामुळे सर्वत्र डमरूंचा आवाज निनादू लागला. कान्हाने बहुडीजवळ एक नारळ मागितला. बहुडीने प्रत्युत्तरादाखल सांगितले की, जर आपल्यात सामर्थ्य असेल तर स्वतः तोडून घ्यावा. तेव्हा कान्हाने आपल्या दृष्टीने नारळ तोडला आणि आपल्या एका शिष्याकडे सुपुर्द केला. परंतु बहुडीनेही वेळ न गमवता आपल्या नजरेने तो नारळ परत पूर्वठिकाणी जोडला आणि हा नित्यक्रम सुरू झाला. कान्ह नारळ तोडायचे आणि योगिनी तो नारळ पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी आणायची. नंतर कान्हूने बहुडी योगिनीला रति-क्रीडेत आव्हान दिले, परंतु यामध्येही कान्ह पराजित झाले. अशा प्रकारे कान्ह सारख्या महायोगीला पराभव पत्करावा लागला.

वर नमूद केलेल्या कथेचे शिल्पांकन महाराष्ट्रातील काही मंदिरे व पन्हाळे-काजी येथील लेणी क्रमांक १४ वर साकारले गेले आहे. गुजरातमध्ये ‘दभोई’ येथील ‘हिरा’ नावाच्या तोरणद्वारावरही अशा आशयाची दोन शिल्पे आहेत. त्यांचे अन्य एक शिल्प हे दभोई येथीलच महुडी तोरणद्वारावर चौऱ्याऐंशी सिद्धांच्या शिल्पांमध्ये दर्शविले आहे. विशेष म्हणजे त्यांची योगिनी बहुडीसोबतची शिल्पे फलटण येथील जैन मंदिरावर व पळसदेव येथील विष्णू मंदिरावर देखील कोरलेली आहेत. एकंदरीत सु. १२ व्या शतकातील जबरेश्वर मंदिरावरील कानिफनाथांचे शिल्प पुरातत्त्वीय दृष्टीने सर्वांत प्राचीन ठरते. कानिफनाथांच्या उपलब्ध शिल्पांमध्ये त्यांना योगिनी बहुडी, शिष्य मंडळी, नारळाचे झाड, डमरू, छत्र, अंगावरती विशिष्ट प्रकारचा कोट या गोष्टींसमवेत दर्शविले आहे.

नाथपंथाबरोबरच कापालिक, वैष्णव, जैन, बौद्ध, महानुभाव व नंतर सूफी संप्रदायातही ते आदरणीय ठरले. पुरातत्त्वीय तसेच बंगाली चर्यापदातील पुराव्यांच्या आधारे कानिफनाथांचा कार्यकाळ बाराव्या शतकाच्या अगोदर निश्चित करण्यास मदत झाली आहे. बहुदा इ. स. च्या १०-११ व्या शतकात ते होऊन गेले असावेत.

संदर्भ :

  • Chatterji, Suniti Kumar, The Origin, and Development of the Bengali Language, (Part-I), Calcutta, 1926.
  • Royburman, J. J. Hindu-Muslim Syncretic Shrines and Communities, New Delhi, 2002.
  • Sarde, Vijay, ‘Recently Deciphered Iconographic Representations of Kanifnath and Bahudi’, Historicity Research Journal, Solapur, Vol. 5 (1), 2018.
  • उपाध्याय, नागेंद्रनाथ, बौद्ध कापालिक साधना और साहित्य, वाराणसी, २००९.
  • पगडी, सेतुमाधवराव, ‘सूफी संप्रदाय’ (तत्त्वज्ञान आणि परंपरा), मुंबई, १९५३.
  • सांकृत्यायन, राहुल, वज्रयान और चौरासी सिद्ध, मुंबई, १९५८.

                                                                                                                                                          समीक्षक : अभिजित दांडेकर