कॉलिंझ, विल्यम विल्की : ( ८ जानेवारी १८२४-२३ सप्टेंबर १८८९ ).  विख्यात ब्रिटीश कादंबरीकार, अभिनेता, इंग्रजी हेरकथांचा जनक असा लौकिक असणारा लेखक. त्याचा जन्म लंडन येथे झाला. त्याचे वडील विल्यम कॉलिंझ हे एक चित्रकार होते. त्याचे शालेय शिक्षण एका खासगी निवासी शाळेमध्ये झाले. शाळा संपल्यानंतर त्याला १८४१ मध्ये चहा व्यापार्‍यांच्या एका कंपनीकडे नोकरी मिळाली. दोन वर्षांनंतर त्यांची पहिली लघुकथा प्रकाशित झाली. वडिलांच्या सांगण्यावरून त्याने १८४६ मध्ये कायद्याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आणि १८४९ मध्ये तो बॅरिस्टर झाला. तथापि वकिली न करता त्याने स्वत:ला लेखनासच वाहून घेतले.

चार्ल्स डिकन्स हा प्रतिभावान साहित्यिक कॉलिंझ याचा जवळचा मित्र होता. १८५१ ते १८७० पर्यंत दोघे सोबत होते. डिकन्सचा कॉलिंझच्या कारकिर्दीवर विशेष प्रभाव पडला. डिकन्सच्या प्रभावाखाली, कॉलिंझने व्यक्तिचित्रण, विनोदबुद्धी आणि लोकप्रियतेची प्रतिभा विकसित केली. अँटोनिया, ऑर फॉल ऑफ रोम (१८५०) ही त्याची पहिली कादंबरी ऐतिहासिक होती. तथापि चार्ल्स डिकिन्झच्या हाउसहोल्ड वर्ड्स ह्या नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या वूमन इन व्हाइट (१८६०) ह्या कादंबरीमुळे इंग्रजी हेरकथेचा जनक म्हणून कॉलिंझचा लौकिक झाला.

विल्की कॉलिंझ याने आपल्या ६५ वर्षाच्या कार्यकाळात ३० कादंबर्‍या, ६० हून अधिक लघुकथा, कमीत कमी १४ नाटके लिहिली. या शिवायही सत्य घटनेवर आधारित अनेक कथांचे त्याने लेखन केले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कादंबऱ्यांमध्ये हाइड अँड सीक (१८५४),  डेड सिक्रेट (१८५७), टेल ऑफ टू सिटीज (१८५९) वूमन इन व्हाइट (१८६०) ग्रेट एक्सपेक्टशन (१८६०-६१), मूनस्टोन (१८६८) इत्यादीचा विशेष उल्लेख करावा लागतो. याशिवाय नो नेम (१८६२), आर्माडेल (१८६६), मूनस्टोन (१८६८) ही त्यांची काही इतर महत्त्वाची पुस्तके होत. विवाहविषयक कायदयावर सल्ला करणारी मॅन अँड वाईफ (१८७०) आणि हार्ट अँड सायन्स (१८८३) या पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे.

विल्की कॉलिंझ याच्या जीवनाचा बहुतेक काळ व्हिक्टोरियन युग म्हणून ओळखल्या जातो. त्यांच्या वडिलांनी धार्मिक श्रद्धा आणि वडीलोपार्जित संबंधांना विशेष महत्व दिले; परंतु कॉलिंझच्या कादंबऱ्यामंध्ये धार्मिक ढोंगीपणा आणि सामाजिक दिखावा यावर टीका आहे. राणी व्हिक्टोरियाच्या काळात संपूर्णपणे ब्रिटन आणि युरोपमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले. औद्योगिकीकरणाच्या प्रगतीमुळे शेताऐवजी शहरी कारखान्यांमध्ये नोकरी वाढली. या पार्श्वभूमीवर कॉलिंझच्या लेखनात तत्कालीन सामाजिक, राजकीय विषयाचे रंग दिसून येतात. गुंतागुंतीच्या कथानकाची बांधणी आणि कल्पित कथा लेखनतंत्रात तरबेज असणारा कॉलिंझ नंतरच्या कारकीर्दीत खळबळजनक कल्पित कथाकडे वळला. त्याने आपल्या रहस्यमय कथांमध्ये स्वच्छंदतावादी आणि वास्तववादी दृष्टीकोन एकत्रित करून त्यानंतरच्या पिढीला कथेसाठी एक प्रारूप प्रदान केले. उत्कंठा निर्माण करणाऱ्या गुंतागुंतीच्या प्रसंगांतून रहस्याची उकल करण्याचे तंत्र त्याने आत्मसात केले होते. आपल्या हेरकथांत त्याने शास्त्रीय शोध, भौगोलिक पार्श्वभूमी, गुन्हे शोधण्याची नवीन तंत्रे ह्यांचा उत्तम उपयोग करून घेतला आहे. त्याने कथासुत्रातील नाट्यमयता, गुन्हेगार; मात्र बहुधा संशयित व्यक्तीचे व्यक्तिचित्रण, गुन्हेगाराच्या व्यक्तिमत्त्वात नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या प्रवृत्तीचे चित्रण सादर करून अस्तित्त्ववादी शैलींचा प्रयोग त्याच्या कथानिवेदनात केला आहे.

कॉलिंझची बहुतेक पुस्तके मुद्रित आहेत आणि सर्व आता ई-मजकूरात आहेत. त्यांच्या काही पुस्तकांवर आधारित नवीन चित्रपट, दूरचित्रवाणीवर काही मालिका – कार्यक्रम तसेच रेडिओ साठी देखील कार्यक्रम तयार झाले आहेत. त्याची सर्व ज्ञात पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्याच्या कार्याचा किंवा जीवनावर आधारित अभ्यासकार्य सुरू आहे.

लंडन येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ :