ऑस्बर्न, जॉन : (१२ डिसेंबर १९२९ – २४ डिसेंबर १९९४). अंग्री यंग मॅन ही संज्ञा लोकप्रिय करणारा दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळातील बंडखोर ब्रिटिश नाटककार. लंडन येथे जन्म. १९४१ मध्ये वडिलांच्या मृत्युनंतर बेल्मोंट महाविद्यालय, डेव्हन येथे निवासी शाळेमध्ये त्याचे शिक्षण झाले. काही काळ द गॅस वर्ल्ड या पत्राचा वार्ताहर म्हणून त्याने कार्य केले आणि एका प्रवासी कंपनीत त्याने नोकरी केली. त्यानंतर रॉयल कोर्ट थिएटर मध्ये नट म्हणून भूमिका आणि नट- व्यवस्थापक म्हणून त्याने काम केले व पुढे स्वतः नाटकांचे लेखन केले. द डेव्हिल इनसाईड द होम हे स्टेला लिंडन या अभिनेत्री – मैत्रिणी सोबत लिहिलेले त्याचे पहिले नाटक होय.
१९५६ मध्ये ‘लंडन ॲक्टर’ म्हणून नाट्यक्षेत्रात त्याचा प्रवेश आणि इंग्लिश स्टेज कंपनी द्वारा लुक बॅक इन अँगर (१९५६) या नाटकाची निर्मिती त्याने केली. ह्या नाटकाने प्रचंड खळबळ माजवली आणि ब्रिटिश रंगभूमी संदर्भाने एक वेगळी चळवळ सुरू झाली. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या तरुणपिढीचे वैफल्य आणि त्यांचा दांभिक समाजावरचा राग ह्यांचे वास्तववादी दर्शन जिमी पोर्टर ह्या व्यक्तिरेखेद्वारा घडवत ऑस्बर्नने प्रस्थापितावर कडाडून हल्ले चढवले ज्यामुळे “अँटी हीरो” ही संकल्पना रूढ झाली. द एंटरटेनर (१९५७) मधून त्याने म्युझिक हॉल परंपरेचे रूपक योजले. यानंतर ए सब्जेक्ट ऑफ स्कँडल अँड कन्सर्न (१९६१) आणि ल्यूथर (१९६१) हे सुधारकाच्या आयुष्यावर आधारित महाकाव्य नाटक (Epic drama)त्याने लिहिले. टू प्लेज फॉर लंडन (१९६२) यात द ब्लड ऑफ द बांबर्स ह्या उपरोधिक नाटकाचा आणि एका जोडप्यावर निर्मिलेल्या वर्चस्व आणि समर्पण यावर आधारित अन्डर प्लेन कव्हर या नाटकाचा समावेश आहे. इनॲडमिसिबल एव्हिडन्स (१९९४) यातून नैराश्य तर ए पॅट्रिअट फॉर मी (१९६५) या नाटकातून पहिल्या महायुद्धाआधीच्या काळातील होमोसेक्सुअल ऑफिसरचे कथानक ओस्बोर्न यांनी मांडले. ए बॉन्ड ऑनर्ड (१९६६), टाइम प्रेझेंट (१९६८) व द होटल इन ॲम्स्टरडॅम (१९६८) ही यानंतर लिहिलेली काही प्रमुख नाटके. वेस्ट ऑफ सुएझ (१९७१) हे ब्रिटिश वसाहतवादाचा काळ उजागर करणारे नाटक होय तर देजाऊ (१९९२) हे शेवटचे नाटक म्हणजे लुक बॅक इन अँगर चा पुढचा भाग होय, जे जिमी पोर्टरचे ३५ वर्षांनंतरचे आयुष्य उलगडते. ह्या साऱ्याच नाट्यकृतींतून कोसळणारी समाजमूल्ये, सांभाळू पाहणारा समाज आणि ह्या समाजात एकाकी पडलेले व समाजावर वैतागलेले बंडखोर यांचा संघर्ष आढळतो.
काही गाजलेल्या कलाकृतींचे ॲडोप्शन्स देखील ओस्बोर्न यांनी केले यात अ बॉण्ड ऑनर्ड (१९६२) , अ प्लेस कॉलिंग इट्सेल्फ रोम (१९७३) , हेडा गॅबलर ( १९७२ ), द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे ( १९७५ ), वॉच इट कम डाउन( १९७६), ट्राय अ लिटिल टेण्डरनेस (१९७८ ) आणि द फादर (१९८९) यांचा समावेश आहे. नाटकांशिवाय ओस्बोर्न यांच्या इतर लेखनात दे कॉल इट क्रिकेट (१९५७) हा त्याच्या डाव्या विचारसरणीचा आणि राजकीय मतप्रणालीचा ऊहापोह करणारा ग्रंथ महत्वाचा आहे. अ बेटर ग्लास ऑफ पर्सन (१९८१) हा त्यांच्या आत्मचरित्राचा पहिला भाग त्यांच्या नाटकात आलेली विदारकता आणि चीड याचे त्यांच्या आयुष्यातील मूळ स्पष्ट करणारा आहे तर आत्मचरित्राचा दूसरा भाग ओल्मोस्ट अ जंटलमन (१९९१) हा त्यांच्या आयुष्याचा दूसरा टप्पा, पाच लग्न इत्यादींवर भाष्य करणारा आहे. याखेरीज १९५८ मध्ये टोनी रिचर्डसन या दिग्दर्शकासोबत वूडकॉल फिल्म प्रॉडक्शन या संस्थेची स्थापना करून लुक बॅक इन अँगर व एंटरटेनर या दोन नाटकांची चित्रपट निर्मिती केली. हेनरी फिल्डिंग यांच्या टॉम जोन्स (१९६३) या कादंबरीवर आधारित चित्रपटाच्या पटकथेसाठी ऑस्कर आणि अकॅडेमी पुरस्कार तर लूथर साठी टोनी पुरस्कार त्याला प्राप्त झाला.
नाट्यतंत्राचा सखोल अभ्यास, जबरदस्त भावनावेगाने येणारी धारदार भाषाशैली आणि जे वाटते ते मांडण्याचा निर्भय प्रामाणिकपणा ह्या त्याच्या वैशिष्ट्यांमुळे ऑस्बर्नची नाटके इंग्लंडच्या रंगभूमीला नवी दिशा दाखविणारी ठरली. ऑस्बर्नच्या संतप्त वृत्तीत केवळ नकारात्मक निषेध नाही तर स्वतःच्या समस्यांचा प्रामाणिक शोध घेणाऱ्या आणि अपरिहार्यपणे सामाजिक स्थितीचे चित्रण करणाऱ्या कलावंताचा स्वाभाविक विकास आहे. उच्चभ्रू वर्गावर केंद्रित असणारी ब्रिटिश नाटकांची परंपरा समकाळातील वास्तववादी नाटकांकडे वळवून इंग्लंडच्या रंगभूमीला नवी दिशा दाखविणारा नाटककार म्हणून त्याचे स्थान विशेष महत्त्वपूर्ण आहे.
संदर्भ :
- www.britannika.com