टर्नर, शार्लोट (स्मिथ) : (४ मे १७४९ – २८ ऑक्टोबर १८०६). प्रणयरम्य (रोमँटिक) कालखंडातील प्रख्यात ब्रिटिश कवयित्री आणि कादंबरीकार. जन्म लंडन, इंग्लंड येथे. शार्लोट ही निकोलस टर्नर आणि ऍना टॉवर्स या उभयतांची थोरली कन्या होती. तिने १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात श्रीमंत कुटुंबातील मुलीसाठी शिक्षण दिले जायचे त्यापद्धतीचे विशिष्ट शिक्षण घेतले. शार्लोटच्या आईचा अकाली मृत्यू, वडिलांचा खर्चिक स्वभाव आणि तिच्या काकू, ल्युसी टॉवर्सने केलेले संगोपन यामुळे तिचे बालपण झाकोळले गेले. वयाच्या सहाव्या वर्षी तिने चिचेस्टरच्या शाळेत जाऊन चित्रकार जॉर्ज स्मिथकडून चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले. दोन वर्षांनंतर ती, तिची काकू आणि तिची बहीण लंडनमध्ये गेली आणि तिने केन्सिंग्टनमधील मुलींच्या शाळेत शिक्षण घेतले. येथे तिने नृत्य, रेखाचित्र, संगीत आणि अभिनय इत्यादी कला आत्मसात केल्या होत्या. तिला कविता वाचण्यास आणि रचायला फार आवडत असे आणि यासाठी तिला तिच्या वडिलांनी चांगले प्रोत्साहनही दिले.

२३ फेब्रुवारी १७६५ रोजी वयाच्या पंधराव्या वर्षी शार्लोटने बेंजामिन स्मिथशी लग्न केले. बेंजामिनचे वडील रिचर्ड स्मिथ हे श्रीमंत व्यापारी आणि ईस्ट इंडिया कंपनीचे संचालक होते. तथापि, शार्लोटचा पती बेंजामिन कर्जबाजारीपणामुळे तसेच सावकारांपासून स्वतःला वाचवण्यासाठी फ्रान्समध्ये पळून गेला. तो इंग्लंडला परत येईपर्यंत ती त्याच्याबरोबरच फ्रान्समध्ये राहिली. मात्र, स्मिथ दाम्पत्याचे वैवाहिक जीवन वैफल्यग्रस्त होते. यातूनच १७८७ मध्ये तिने आपल्या पतीस सोडले आणि आपल्या मुलांच्या संगोपनासाठी लेखन सुरू केले. आपल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर, ती चिचेस्टरजवळच्या गावी गेली आणि तिने कादंबरी लिहिण्याचा निर्णय घेतला. १७८४ मध्ये तिने प्रकाशित केलेले इलिजियाक सॉनेट्स ऍण्ड अदर एसेज हे पुस्तक चांगलेच गाजले, पण कादंबरी लिखाणातून जास्त आर्थिक मोबदला मिळत असल्याने तिने कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली. तिची पहिली कादंबरी एममेलिन (१७८८) लोकप्रिय झाली आणि काही दिवसातच तिच्या १५०० प्रती विकल्या गेल्या. पुढच्या दहा वर्षांत तिने आणखी नऊ कादंबऱ्या लिहिल्या. त्या पुढीलप्रमाणे – एथेलिंडे ; किंवा, द रेक्ल्यूज ऑफ द लेक (१७८९), सेलेस्टीना (१७९१), डेसमॉन्ड (१७९२), द ओल्ड मॅनोर हाऊस (१७९३), द वंडरिंग ऑफ वॉरविक (१७९४), द बॅनिश मॅन (१७९४), मॉन्टलबर्ट (१७९५), मार्चमॉन्ट (१७९६) आणि द यंग फिलोसोफऱ (१७९८).

१७८० च्या दशकात शार्लोटने कादंबरीकार म्हणून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. या काळात स्त्री लेखकांनी प्रणयाराधन आणि नायिकाचे पवित्र आणि निर्दोष रेखाटन करणे अपेक्षित होते. अशाच प्रकारे तिने विषयाची मांडणी केली; मात्र सोबतच आपल्या लेखांतून फ्रेंच राज्यक्रांतीतील स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व या तत्त्वांनाही पाठिंबा दर्शविला. तिने द ओल्ड मॅनोर हाऊस आणि बीची हेड या साहित्यकृतीतून गुलामीच्या विरोधात लिखाण केले. तिच्या बऱ्याच कादंबऱ्यामध्ये व्यक्तिगत जीवनातील व्यक्तिरेखा आणि घटनांचा समावेश आहे. कधीकधी तिने स्त्रीच्या सुप्त इच्छेचे कथन केले तर कधी स्त्रीयांवरील अत्याचार यांवरही भाष्य करून परंपरागत प्रणय-कल्पनेला आव्हान दिले. एकंदरीतच, तिच्या कादंबऱ्यांनी ‘गॉथिक कथा’ आणि ‘संवेदनशील कादंबरीच्या’ विकासास हातभार लावला. आयुष्याच्या शेवटी ती मुलांसाठी उपदेशात्मक पुस्तके लिहिण्यास प्रवृत्त झाली. त्यातील सर्वोत्कृष्ट उपदेशात्मक पुस्तक म्हणून कॉन्वेरसेशनस इंट्रोड्युसिंग पोएट्री फॉर द यूझ ऑफ चिल्ड्रेन (१८०४) याचे नाव घेतले जाते. सर वॉल्टर स्कॉट या सुप्रसिद्ध कादंबरीकाराने तिची खूप प्रशंसा केली. विल्यम कॉपरने तिचे साहित्य म्हणजे ग्रामीण भागातील निसर्गातील आनंद साजरा करणारी कलाकृती असा उल्लेख केला. तिने लेटर्स ऑफ अ सॉलिटरी वँडरर (१८०१-१८०२) हा कथासंग्रह तसेच व्हाट इज शी? (१७९९) हे नाटक प्रकाशित केले. तिचा सर्वात यशस्वी आणि नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणजे बालसाहित्याचे लिखाण होय. यात प्रामुख्याने रूरल वॉक्स (१७९५), रॅम्बल्स फारदर (१७९६), मायनर मोराल्स (१७९८) आणि कॉन्वेरसेशनस इंट्रोड्युसिंग पोएट्री (१८०४) यांचा समावेश होतो. याच बरोबर तिने इंग्लंडच्या इतिहासाबाबत दोन खंड हिस्टरी ऑफ इंग्लंड (१८०६) आणि अ नॅचरल हिस्ट्री ऑफ बर्ड्स (१८०७ : मरणोत्तर प्रकाशित) लिहिली.

एकूणच, दहा कादंबऱ्या, तीन काव्यसंग्रह, मुलांसाठीची चार पुस्तके आणि इतर लिखाण अशी तिची ग्रंथसंपदा आहे. समीक्षकांनी तिच्या सुनीत काव्य प्रकारास दुःख भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून नोंदवले आहे. तिचा असा विश्वास होता की तिच्या कादंबऱ्याच नव्हे तर तिच्या कवितांनी तिला साहित्यविश्वात सन्मानाचे स्थान मिळवून दिले. तिच्या सुरुवातीच्या कादंबऱ्यामध्ये (विशेषतः द ओल्ड मॅनोर हाऊससारख्या) भावनात्मक सौंदर्याचा विकास दिसून येतो. पारंपारिक नैतिकतेबद्दल तिची मूलगामी वृत्ती उदाहरणार्थ डेस्मंड ही कादंबरी विवाहित स्त्रीबद्दल एका परपुरुषाच्या मनात उदभवणाऱ्या निरागस प्रेम भावनेचे चित्रण करते. तसेच वर्ग समानतेच्या राजकीय कल्पनांनी आणि फ्रेंच राज्यक्रांतीद्वारे प्रेरित झालेल्या तिच्या साहित्यामुळे काही प्रमाणात त्याकाळी ती कुविख्यात झाली. परंतु तरीही तिचे साहित्य स्त्री कादंबरीकारांच्या १८व्या शतकातील प्रणयरम्य (रोमँटिक) परंपरेच्या अनुषंगाने महत्वपूर्ण आहे. प्रकाशकांनी नंतर तिच्या साहित्यलेखनासाठी उचित पैसे दिले नाहीत आणि १८०३ पर्यंत ती निर्धन झाली. तसेच वाढत्या आजारपणामुळे तिला लिखाण करणेही जमले नाही. पुढे कर्ज फेडण्यासाठी तिने आपली प्राणप्रिय पुस्तकेही विकली. फर्नहॅमजवळील टिलफोर्ड येथे तिचे विपन्नावस्थेत निधन झाले.

संदर्भ :

  • Britannica, The Editors of Encyclopaedia. “Charlotte Smith”. Encyclopedia Britannica, 30 Apr. 2021.
  • https://www.britannica.com/biography/Charlotte-Smith. Accessed 24 July 2021.

    समीक्षण : लीना पांढरे