फिलीपीन्समधील एक महत्त्वाची व सर्वांत लांब नदी. रिओ गांद्रे दे कागायान या नावानेही ही नदी ओळखली जाते. फिलिपीन्समधील लूझॉन बेटाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या काराबायो पर्वतात स. स. पासून १,५२४ मी. उंचीवर या नदीचा उगम होतो. तिचे एकूण जलवाहनक्षेत्र २७,७५३ चौ. किमी. आहे. उगमानंतर प्रथम आग्नेय दिशेने, तदनंतर मोठे वळण घेऊन पूर्वेस आणि पुढे इझाबेल, कागायान प्रांतातून उत्तरेकडे वाहत जाऊन आपारी येथे लूझॉन सामुद्रधुनीतील बाबूयान खाडीला ती मिळते. लूझॉन सामुद्रधुनीद्वारे फिलिपीन्स आणि दक्षिण चिनी हे दोन समुद्र एकमेकांना जोडले गेले आहेत. कागायान नदीखोऱ्याच्या पश्चिमेस कॉर्डिलेरा सेंट्रल, पूर्वेस सिएरा माद्रे आणि दक्षिणेस काराबायो या पर्वतश्रेण्या आहेत. दोन्ही बाजूंनी वेढलेल्या डोंगराळ भूमीमुळे सुरुवातीचे सुमारे ३५० किमी. अंतर ती वळणावळणांनी वाहताना दिसते. त्यानंतर ती सुमारे ८० किमी. रुंद व सुपीक खोऱ्यातून वाहते.

चीको, मागात व ईलागान या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत. चीको आणि मागात नद्यांवर धरणे बांधण्यात आली आहेत. जलसिंचनाच्या दृष्टिने कागायान व तिच्या उपनद्या महत्त्वाच्या आहेत. मोसमी पर्जन्याच्या कालावधीत तिला व तिच्या उपनद्यांना नुकसानकारक पूर येतात. त्यामुळे फिलिपीन्स प्रशासनाने पूराची पूर्वसूचना देणारी केंद्रे नदीकाठावर स्थापन केली आहेत. मुखापासून आत २१ किमी. पर्यंत आगबोटींद्वारे (स्टीमर) नियमित जलवाहतूक होत असली, तरी आर्द्र ऋतूत जेव्हा नदीत भरपूर पाणी असते, तेव्हा लहानलहान बोटींद्वारे सुमारे २४० किमी. पर्यंत जलवाहतूक करता येते. तिच्या खोऱ्यात तांदूळ, मका, नारळ, तंबाखू, केळी, लिंबूवर्गीय फळे मोठ्या प्रमाणात पिकविली जातात. आपारी, इझाबेल, ईलागान, तूगेगाराओ, कागायन ही तिच्या काठावरची महत्त्वाची शहरे आहेत. त्यांपैकी मुखाजवळील आपारी हे प्रमुख बंदर आहे. कागायन नदीचे खोरे टायफून वादळाच्या मार्गात येते. येथील प्रांतीय शासनांकडून नदीच्या काठावर पर्यटन व्यवसायाचा विकास केला असून ‘व्हाइट वॉटर राफ्टिंग’ या क्रीडाप्रकारासाठी ही नदी विशेष महत्त्वाची आहे.

समीक्षक : वसंत चौधरी