योगसाधनेच्या प्रवासात संपूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या ज्ञानापासून व त्यापासून प्राप्त होणाऱ्या सिद्धींपासून पूर्ण वैराग्य प्राप्त झाल्यानंतरची चित्ताची होणारी स्थिती म्हणजे धर्ममेघ समाधी होय.

चित्ताच्या संपूर्ण वृत्तींचा (विचारांचा) निरोध हे योगसाधनेचे प्रमुख लक्ष्य आहे. प्रतिक्षण आपल्या चित्तामध्ये अनेक विचार येत असतात, परंतु अनेक विचारांना एकाएकी थांबवणे शक्य नसते. त्यामुळे विचारांची संख्या हळूहळू कमी करत करत चित्त जेव्हा एकाच विषयावर दीर्घकाळपर्यंत एकाग्र होते, तेव्हा चित्तामध्ये केवळ एकच वृत्ती राहते. चित्ताला एकाग्र होण्यासाठी काही तरी आलंबन (एकाग्रतेचा विषय) असणे आवश्यक असते. अभ्यास आणि वैराग्य या दोन साधनांच्या साहाय्याने सुरुवातीला चित्त हे स्थूल (पंचमहाभूतात्मक) विषयांवर एकाग्र होते, त्यानंतर सूक्ष्म तन्मात्रांवर, त्यानंतर इंद्रियांवर आणि त्यानंतर पुरुष तत्त्वावर चित्त एकाग्र होते. चैतन्यस्वरूप पुरुष तत्त्वाचे ज्ञान होतानाच पुरुष आणि बुद्धी वेगळे आहेत याचेही ज्ञान योग्याला होते. यालाच योगाच्या परिभाषेत ‘विवेकख्याति’ असे म्हणतात. विवेकख्याति म्हणजे पुरुष आणि बुद्धी वेगळे आहेत याचे भेदरूप ज्ञान. विवेकख्यातीचे ज्ञान हेही चित्ताच्या वृत्तीमुळेच उत्पन्न होते, त्यामुळे चित्तवृत्तींचा संपूर्ण निरोध होण्यासाठी विवेकख्यातीचे ज्ञान उत्पन्न करणाऱ्या एकाग्र वृत्तीचाही निरोध केला पाहिजे, ही जाणीव म्हणजे ‘पर-वैराग्य’ होय.

विवेकख्याति प्राप्त झाल्यामुळे चित्तामध्ये सत्त्वगुणाचा उत्कर्ष होतो व त्यामुळे योग्याला आपोआपच प्रातिभ, श्रावण, वेदन, आदर्श, आस्वाद आणि वार्ता या ज्ञानरूप सिद्धी प्राप्त होतात (योगसूत्र ३.३६). प्रातिभ म्हणजे सर्वज्ञता, श्रावण म्हणजे दिव्य ध्वनीचे ज्ञान, वेदन म्हणजे दिव्य स्पर्शाचे ज्ञान, आदर्श म्हणजे दिव्य रूपाचे ज्ञान, आस्वाद म्हणजे दिव्य रसाचे ज्ञान आणि वार्ता म्हणजे दिव्य गंधाचे ज्ञान होय. विवेकख्याति नंतर प्राप्त होणाऱ्या या दिव्य विषयांच्या अनुभवामुळे योग्याचे चित्त पुन्हा या विषयांकडे आसक्त झाले तर चित्त रजोगुण आणि तमोगुण यांमुळे कलुषित होण्याची शक्यता असते. चित्त पुन्हा विषयांकडे आसक्त झाले, तर चित्ताची एकाग्रता नष्ट होते व विवेकख्यातीचे ज्ञान दृढ व स्थिर होत नाही. त्यामुळे या दिव्य विषयांप्रति पूर्ण वैराग्य असणे आवश्यक असते. विवेकख्यातीचे ज्ञान करवून देणारी चित्ताची वृत्ती आणि त्यानंतर प्राप्त होणाऱ्या प्रातिभ इत्यादी ज्ञानरूप सिद्धींपासून पूर्णपणे वैराग्य प्राप्त झाल्यावर चित्ताला प्राप्त होणारी अवस्था म्हणजे धर्ममेघ समाधी होय. या वैराग्य अवस्थेमध्ये चित्त स्थिर राहते म्हणून या अवस्थेला समाधी असे म्हटले आहे. ही अवस्था प्राप्त झाल्यामुळे योग्याचे चित्त क्लेशांपासून पूर्णपणे मुक्त होते व त्या योग्याला निश्चितपणे कैवल्य अवस्था प्राप्त होते. कैवल्य अवस्था प्राप्त होण्याइतका पुण्याचा संचय योगाच्या साधनेद्वारे प्राप्त झाल्यामुळे या अवस्थेला ‘धर्ममेघ’ म्हटले जाते. ‘धर्ममेघ’ म्हणजे पुण्यरूप धर्माचा मेघ जणू योग्यावर पुण्याचा वर्षाव करतो. ही अवस्था प्राप्त झाल्यावर चित्त लवकरच विचारशून्य अवस्थेला प्राप्त होते व योग्याला परम नि:श्रेयसरूप कैवल्याची प्राप्ती होते.

पहा : प्रातिभ (ज्ञान), विवेकख्याति, वैराग्य.

                                                                                                            समीक्षक : कला आचार्य