शाह, राजेंद्र केशवलाल : (२८ जानेवारी १९१३ – २ जानेवारी २०१०). गुजराती भावकवी, गुजरातमधील कपडवंज (जि. खेडा) येथे जन्म. वयाच्या दुसऱ्या वर्षीच वडील वारल्याने त्यांचे बालपण हालअपेष्टांत गेले. तत्त्वज्ञान हा विषय घेऊन त्यांनी मुंबई विद्यापीठाची बी. ए. पदवी संपादन केली. प्रारंभी शिक्षक नंतर किराणा व्यापारी, व्यवसाय संस्थेतील भागीदार म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या काव्यावर कलापी, नानाला, उमाशंकर जोशी, सुंदरम्‌, श्रीधराणी इत्यादींचा प्रभाव होता. प्रामुख्याने प्रेम, निसर्ग, ईश्वर या विषयांवर त्यांनी गेय कविता रचल्या.

गीत, सुनीत, विलापिका, उद्देशिका असे रचनाप्रकारही त्यांनी समर्थपणे हाताळले. ध्वनी (१९५१), आंदोलन (१९५१), श्रुति (१९५७), मोरपिंछ (शिशुगीते, १९६०), शांत कोलाहल (१९६२), चित्रण (१९६७), क्षण से चिरंतन (१९६८), विषादने साद (१९६८), मध्यमा (१९७७), उद्‌गीती (१९७९). प्रसंग सप्तक (१९८२), नीलांजन (१९८९), आरण्यक (१९९२) हे त्यांचे काही उल्लेखनीय काव्यसंग्रह. गीत गोविंद (१९८९), बुद्धदेव बसू (१९९०) इ. व्याप्तिलेख-अनुवाद असून पत्रलेखा (वाङ्‌मयीन पत्रसंग्रह) हे नंतरच्या काळातले त्यांचे प्रसिद्ध लिखाण होय. विषादने साद या संग्रहात त्यांच्या सामाजिक जाणिवेचा उत्कट काव्यात्म आविष्कार आढळतो. त्यांचे काव्य पारंपरिक वृत्तांमध्ये असून त्यांतून त्यांची सूक्ष्म सौंदर्यदृष्टी प्रतीत होते. भावपूर्ण प्रतीकांतून ते प्रणयाच्या नाजुक व तरल छटा व्यक्त करतात. गूढ अनुभूतीची अभिव्यक्तीही त्यांच्या काव्यात आढळते. त्यांची निसर्गकविता निसर्गसौंदर्याचा प्रत्यय देते. राष्ट्रीय एकात्मतेवरील शांत कोलाहल  ह्या काव्यग्रंथास साहित्य अकादमी पुरस्कार (१९६३) भारतीय भाषा परिषद पुरस्कार (१९८५ कलकत्ता) गुजरात राज्य गौरव पुरस्कार (१९९८) इ. पुरस्कार त्यांना लाभले. २००१ साली भारतीय साहित्यातील सर्वोच्च अशा ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. कविलोक  हे गुजराती काव्याला वाहिलेले द्वैमासिक त्यांच्या संपादकत्वाखाली मुंबईहून १९५७ मध्ये सुरू झाले. सध्या ते अहमदाबाद येथून प्रकाशित होते.

संदर्भ :

  • https://www.poemhunter.com/rajendra-keshavlal-shah/biography/