गुजरातमधील अरवली जिल्ह्यातील मेशवो नदीच्या तीरावरील एक प्राचीन स्थळ (यापूर्वी साबरकांठा जिल्ह्यात हा भाग होता). पांढरीच्या या टेकाडाला स्थानिक लोक ‘भोज राजाची पहाडीʼ (भोज-राजा-ना-टिम्बो) म्हणून संबोधत असत. येथे लहान-मोठ्या आकाराच्या टेकड्या असून या टेकड्यांतील विटांचा उपयोग करून स्थानिक रहिवाशांनी हा प्राचीन भाग क्षतिग्रस्त केला होता. या टेकडी परिसराच्या काही अंतरावर विटांची टेकाडे, शिवलिंग आणि विटांचे मंदिर, गणेश प्रतिमा आणि मध्याश्मयुगीन दगडी हत्यारे इ. मिळाली होती. गुजरातमधील प्रसिद्ध शामलाजी मंदिर आणि पुरास्थळ या परिसरापासून २ किमी. अंतरावर आहे. या पुरास्थळाचा शोध प. अ. इनामदार यांनी लावला (१९३६).
हे स्थळ मेशवो नदीवरील श्याम-सरोवर धरणाच्या बुडीत क्षेत्रात येत होते. त्यामुळे बुडण्यापूर्वी या स्थळाचे विस्तृत सर्वेक्षण करण्यात येऊन या परिसरातील प्राचीन मानवी वसाहत आणि पुरावे तपासणे गरजेचे असल्याने येथे बडोदा येथील महाराज सयाजीराव विद्यापीठाच्या प्राचीन भारत आणि पुरातत्त्व विभागातर्फे १९६० ते १९६३ या तीन सत्रांमध्ये उत्खनन करण्यात आले. सदर उत्खननाचे निर्देशन र. न. मेहता आणि स. न. चौधरी यांनी केले. या परिसरात एकूण सहा ठिकाणी उत्खनन करण्यात आले. उत्खननामध्ये मध्याश्मयुगीन दगडी हत्यारे, बौद्ध स्थळे आणि एका मंदिराचे अवशेष प्राप्त झाले.
उत्खननामध्ये सर्वांत खालच्या स्तरात मध्याश्मयुगीन लघु हत्यारे मिळाली. उत्खननात बौद्ध धर्माचे दोन विहार, विशाल शारीरिक महास्तूप, चार उद्देशिक स्तूप, चैत्यगृह, मंदिर आणि संरक्षक भिंतीचे अवशेष मिळाले, जे गुजरातच्या आणि भारताच्या इतिहासाकरिता अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.
या उत्खननात एकूण पाच स्तूपांचे पुरावे मिळाले असून चार लहान आकाराचे उद्देशिक स्तूप, तर एक शारीरिक प्रकारचा महास्तूप होता. विशाल महास्तूप विटांनी निर्मित असून बांधकामपूर्व खालची काळी जमीन ठासून भक्कम केली होती. स्तूपाचा सर्वांत खालचा भाग २६ x २६ x ३ मी. इतका विस्तीर्ण असून यावरील पहिला थर २१ x २१ x ३ मी., दुसरा थर १६.४ x १६.४ x १.८ मी. इतका होता. दुसऱ्या थराच्या वर १६.४ मी. व्यास आणि ४ मी. उंचीचा स्तूपाचा अंड स्थिरावला होता. स्तूपाच्या हर्मिका आणि छत्रयष्टीचा भाग पूर्णपणे नष्ट झाला होता. स्तूपाच्या दोन्ही थरांमध्ये सभोवताल अलंकृत कोनाडे असून यामध्ये बुद्ध मूर्ती असाव्यात. स्तूपाच्या खालच्या थरांत ११ कोनाडे, तर वरच्या थरांत १० कोनाड्यांची रचना होती. महास्तूपाच्या आतील उत्खननात तळभागात मधोमध मातीच्या मडक्यात १२ सेमी. आकाराचा स्टिॲटाइट (सोप स्टोन) दगडाचा दंडगोलाकार अस्थिकरंडक (Casket) मिळाला. या अस्थिकरंडकाच्या वर विटांचा थर असून यामध्ये बुद्धांच्या ८ मूर्ती मिळाल्या.
प्रदक्षिणापथाच्या वर विटांच्या ३५व्या थरात मिळालेले अस्थिकरंडक या उत्खननाचा सर्वांत महत्त्वाचा पुरावा आहे. या अस्थिकरंडकामध्ये एक तांब्याचे भांडे, क्षत्रपांची चांदीची नाणी, सोने आणि चांदीचे पत्रे, सोन्याचे लघु पात्र, रेशमी वस्त्र आणि अस्थीअवशेष मिळाले आहेत. या अस्थिकरंडकावर उत्कीर्ण इ. स. चौथ्या शतकातील ब्राह्मी लिपीतील अभिलेखानुसार सदर स्तूप ‘पाशान्तिकपल्लिʼ येथे बांधण्यात आला होता आणि पाशान्तिकपल्लि हे देवनीमोरीचे प्राचीन नाव होते. अभिलेखानुसार बौद्ध भिक्खू अग्निवर्मा आणि सुदर्शन यांनी मिळून या स्तूपाचे निर्माणकार्य संचालित केले होते आणि यामध्ये मिळालेले अस्थीअवशेष ‘दशबलʼ यांचे होते. भगवान बुद्धांचे एक नाव दशबल असल्याने सदर अवशेष बुद्धांचे होते, हे सिद्ध होते. त्यामुळे भारतातील अत्यंत महत्त्वाच्या स्तूपांत याची गणना केली जाते. अभिलेखानुसार कथिका राजवंशाच्या १२७ व्या संवत वर्षात रुद्रसेनाच्या कारकिर्दीत हा स्तूप निर्माण केला होता. स्तूपातील नाणी आणि अभिलेखाच्या आधारावर हा महास्तूप क्षत्रप राजा रुद्रसेन तृतीयच्या काळात संभवत: इ. स. ३०५ ते इ. स. ३७५ या कालखंडातील असावा. काळाच्या ओघात स्तूपाची दुरुस्ती करण्यात आली होती आणि यामध्ये बुद्धांच्या खंडित मूर्ती, खंडित दगडांचे आणि विटांचे तुकडे भरण्यात आले होते. नदीच्या पुरापासून स्तूपाच्या सुरक्षेकरिता एक सुरक्षा भिंत बांधण्यात आली होती.
देवनीमोरीच्या महास्तूपामधील तीन थरांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून महास्तूपामधील दोन्ही अस्थिकरंडकांची ठेवण पाकिस्तानातील गझ ढेरी या स्तूपातील अस्थिकरंडकाशी साम्य दर्शवणारी आहे. महास्तूपाच्या उत्खननात बुद्धांच्या २६ मूर्ती प्राप्त झाल्या होत्या आणि या सर्व मूर्ती ध्यानमुद्रेतील आहेत. येथील प्रतिमा या मूर्तिशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून बुद्ध शिल्पांच्या केसजटांवर गांधार कलेचा प्रभाव दिसतो, तर शरीराची ठेवण कुषाण काळातील मथुरा कलेशी मिळती-जुळती आहे. उत्खननकर्त्यांच्या मते, देवनीमोरी येथील शिल्पे गांधार आणि मथुरा कलेच्या संयुक्त संगमातून उत्पन्न व एक मिश्र शैलीची असून त्यावर क्षेत्रीय प्रभाव स्पष्ट होतो.
विहार : महास्तूपाच्या दक्षिणेकडे विहार असून याचे प्रवेशद्वार उत्तरेकडून होते. विटांनी निर्मित या चौरस विहाराचे आकारमान ४१ x ३८ मी. इतके होते. विहाराच्या मधोमध मोठे अंगण असून सभोवताल ३० खोल्या आणि व्हरांडे होते. विहाराच्या प्रवेशद्वाराच्या समोर खोली क्र.१६ ही पूजेची जागा असून येथील जमीन अलंकृत विटा आणि दगडाने तयार केली होती. पूजागृह आकाराने सर्वांत मोठे असून याचा आकार साधारणतः ७.५ x ३ मी. इतका होता. विहारातील अन्य खोल्यांचा आकार साधारणतः ३ मी. लांब आणि २.५ मी. रुंद इतका होता. खोल्यात प्रवेश करण्याकरिता मधोमध द्वार असून, आतली जागा विटांनी निर्मित होती. विहाराच्या आत अलंकृत विटांनी निर्मित व्याख्यानपीठ मिळाले असून याचा उपयोग कदाचित उपदेश देण्याकरिता होत असावा. विहारात भिक्खूंना बसण्याकरिता विटांचे ओटे, सांडपाण्याचा निचरा होणेकरिता नाल्या, चुल्ही, कवेलूचे तुकडे, लोखंडी खिळे इ. मिळाले आहेत. विहाराचा बाहेरचा भाग अलंकृत विटांनी बांधला होता. या विहाराचे निर्माणकार्य व विस्तार दोन टप्प्यांत झाल्याचे, तर कमीतकमी दोनदा विहाराची दुरुस्ती झाल्याचे पुरावे प्राप्त झाले. उत्खननामध्ये विष्णू आणि महिषमर्दिनीच्या लघु प्रतिमा मिळाल्या. विहाराचे निर्माण महास्तूपांच्या पूर्वी झाले होते, असे उत्खननातून निदर्शनास येते.
देवनीमोरी येथील विहार क्र.१ आणि महास्तूपांच्या निर्मिती नंतर विहार क्र.२ आणि चार येथे उद्देशिक स्तूपांचे बांधकाम करण्यात आले होते. चौकोनी उद्देशिक स्तूपांचा आकार साधारणतः २ ते ३ मी. असून हे स्तूप एकमेकांशेजारी बांधण्यात आले होते. महास्तूपांच्या दक्षिण-पूर्वेकडे चापाकार आकाराच्या चैत्याच्या केवळ पायाचे पुरावे मिळाले आहेत. चैत्याचा पाया दगडी असून वर विटांचे १२ थर आहेत. स्तूप आणि विहाराच्या शेजारी एक शिव मंदिर होते. या मंदिराच्या विटांचा आकार बौद्ध स्थापत्यामध्ये वापरलेल्या विटांइतकाच असल्याने हे मंदिर समकाळातील असून दोन्ही संप्रदाय देवनीमोरी येथे नांदत होते असे दिसते.
उत्खननात रोमन अंफोरा प्रकारची, चित्रकारी आणि ठप्पा असलेली खापरे आणि लाल चकाकीयुक्त खापरे मिळाली आहेत. ही खापरे इ. स. दुसऱ्या शतकात या परिसरात वापरात असल्याने या स्थळाचे कालक्रम करणे सोपे झाले.
निष्कर्ष : देवनीमोरी येथे सर्वप्रथम विहारांचे निर्माण करण्यात आले होते, तदनंतर स्तूप बांधण्यात आले. देवनीमोरी येथे इ. स.चौथ्या शतकापासून बौद्ध विहारे आणि स्तूप परंपरा विकसित झाली होती. कालानुरूप वेळोवेळी येथील स्थापत्याचा विस्तार आणि दुरुस्ती करण्यात आली होती. महास्तूप आणि विहाराचा भाग विविध चिन्हांकित विटा आणि सुबक दगडांनी अलंकृत केला होता. उत्खननात गुप्त राजवंशांचे कुठलेही प्रमाण न मिळाल्याने सदर भाग क्षत्रप राजवटीत विकसित होऊन महत्त्वाचे धार्मिक स्थळ होते, हे सिद्ध होते. देवनीमोरी आणि शामलाजी येथील उत्खननात क्षत्रप राजवटीतील प्राप्त पुरावशेषांच्या अनुषंगाने हे क्षेत्र पश्चिम भारतामधील एक महत्त्वाचे धार्मिक आणि व्यापारी क्षेत्र म्हणून नावारूपास आले होते, असे प्रमाणित होते. इ. स. सातव्या शतकानंतर देवनीमोरी येथील विहारे ओस पडण्यास सुरुवात झाली होती. सन १९७१-७२ च्या सुमारास सदर क्षेत्र मेशवो नदीवरील श्याम-सरोवर या धरणांत समाविष्ट झाले. सांप्रत महास्तूपांच्या जागेवर एक लोखंडी खांब पाण्यात उभा आहे.
संदर्भ :
- Indian Archaeology: A Review, 1961-62, Archaeological Survey of India, New Delhi, pp 13-14.
- Mehta, R. N.; Choudhary, S. N. Excavations at Devnimori, Department of Archaeology and Ancient History, M.S. University of Baroda, 1966.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर