आंध्र प्रदेशातील एक प्रसिद्ध बौद्ध स्तूप. गोली हे गाव कृष्णा नदीची उपनदी गोलारूच्या तीरावर वसले असून ते अमरावती या प्रसिद्ध बौद्ध स्थळापासून साधारणतः ५० किमी. अंतरावर आहे. या स्थळाचा शोध सन १८८२ मध्ये लागल्याचे मद्रास इलाख्याच्या (प्रेसिडेंसी) प्राचीन अहवालात (अँटीक्विटी रिपोर्ट) नमूद आहे. या स्तूपाचे उत्खनन १९२६ च्या सुमारास फ्रेंच पुरातत्त्वज्ञ गॅब्रियल डुब्रेल यांनी केले होते. गोली स्तूपाच्या उत्खननातून प्राप्त अनेक शिल्प-अवशेष सध्यस्थितीत मद्रास संग्रहालयात आहेत.

बुद्ध शिल्प, गोली स्तूप, आंध्र प्रदेश.

गोली उत्खननात बौद्ध स्तूपावरील अलंकृत दगडी शिल्पे बहुसंख्येने प्राप्त झाल्याने स्तूपाचा संपूर्ण बाह्य भाग सुंदर शिल्पांनी आच्छादून अलंकृत केला असावा, असे लक्षात येते. गोली स्तूपावरील शिल्पे ही शुभ्र हस्तिदंती चुनखडी दगडात निर्मित आहेत. गोली येथील शिल्पे बौद्ध धर्मीय असून मुख्य शिल्पांची विषयवस्तू तथागत बुद्ध, बुद्धाच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटना, जातक कथेतील प्रसंग, स्तूप-पूजेचे अंकन, स्त्री-पुरुष, नागदेवता, पशु-पक्षी, बोधी-वृक्ष, छत्रयष्टी इत्यादी आहेत. गोली येथील स्तूपावर प्राप्त महत्त्वपूर्ण शिल्पांपैकी गौतम बुद्धांच्या विविध मुद्रा, निलगिरी हत्तीचे वशीकरण, सात फणाधारी नाग (मुचलिंद ?), षड्दंत जातक, वेस्संतर जातक, माती-पोषक जातक, ससा जातक,  बुद्धांचा मार-विजय, सुजाता-खीर प्रसंग इत्यादी शिल्पे प्रमुख असून यांमधून कलाकाराने तथागतांचे जीवनप्रसंग सजीव करण्याचा प्रयत्न केला आहे.

नागशिल्प, गोली स्तूप, आंध्र प्रदेश.

गोली येथील एका दगडी शिल्पपट्टावर स्तूपाचे अंकन प्राप्त झाले आहे. या शिल्पपट्टातील स्तूप हा अमरावती शैलीत निर्मित असून, स्तूपावर हर्मिका, छत्रावली, छत्रयष्टी, स्तूपासभोवताल प्रदक्षिणा पथ, आयकस्तंभ इत्यादी असण्याची शक्यता आहे. गोली स्तूपावरील अलंकृत शिल्पांच्या माध्यमातून तत्कालीन स्त्री, पुरुषांच्या आकृती, त्यांची वस्त्र-आभूषणे, इमारती, रथ, वृक्ष इत्यादी अंकनामधून तत्कालीन समाजजीवन, वस्त्र-आभूषणांची परंपरा व आवड, लोकांचे राहणीमान, धार्मिक चालीरितीवर महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त होते. गोली येथील शिल्पे भावनाप्रधान असून, कोरीव व्यक्ती सडपातळ बांध्याच्या, लवचिक, हालचालीयुक्त आणि त्रिभंग अवस्थेत आहेत. एकंदरीत गोली येथील शिल्पे उत्तरेतील सांची येथील स्तूपापेक्षा बारीकसारीक तपशील विचारात घेऊन निर्मित केली आहेत.

सातवाहन शासकांच्या कारकिर्दीत आंध्र प्रदेशात बौद्ध धर्माचा विकास होऊन गोली, अमरावती, नागार्जुनकोंडा इत्यादी स्तूप निर्मित होऊ लागले होते. यांपैकी अमरावती येथील महास्तूप अतिशय भव्य, अलंकृत आणि परिष्कृत असल्याने अनुकरणीय होता. अमरावती येथील शिल्पकला विशिष्ट प्रकारची आहे. या शिल्पांना स्वतंत्र ओळख असल्याने ते अमरावतीशैली म्हणून प्रसिद्ध आहेत. अमरावती शैली, गांधार आणि मथुरा शैलीची समकालीन असून या शैलीचा उदय व विकास दक्षिणेतील कृष्णा आणि गोदावरी नदीच्या खोऱ्यात झाला होता. अमरावती येथील शिल्पकलेचा प्रभाव दक्षिणेतील गुंटापल्ली, घंटाशाला, भट्टीप्रोलू, जगय्यापेटा, नागार्जुनकोंडा, चंदावरम् येथील स्तूप अलंकरणावर तसेच श्रीलंकेतील अनुराधपूर ते महाराष्ट्रातील तेर आणि तीर्थ बुद्रूक येथील प्राप्त स्तूप शिल्पांवर ठळकपणे दिसून येतो. गोली या स्तूपावरील अलंकरणावर देखील अमरावती येथील कला आणि शिल्प-परंपरेचा विपुल प्रभाव दिसून येतो. बौद्धधर्मीय स्मारकांत प्रसिद्ध असलेले षड्दंत जातक, वेस्संतर जातक, ससा जातक आणि शिल्पे, गोली आणि अमरावती या दोन्ही स्तूपावर असून त्यामध्ये विलक्षण साम्य दिसून येते आणि त्यामुळेच दक्षिण भारतीय कलेत गोली येथील स्तूपाचे स्थान महत्त्वपूर्ण आहे.

जेम्स बर्जेस यांच्या मते गोली येथील स्तूपाचे अमरावतीच्या स्तूपाशी असलेले साधर्म्य लक्षात घेता, गोली येथील स्तूपाचा काळ अमरावती येथील स्तूपाइतकाच निश्चित करता येऊ शकतो. टी. एन. रामचंद्रन यांच्या मते गोली स्तूपाचे निर्माण अमरावतीच्या चौथ्या टप्प्यात म्हणजे इ. स. तिसऱ्या शतकात झाले होते; परंतु गोली येथील शिल्पांच्या विषयवस्तूवरून गोली स्तूप संभवतः इ. स. द्वितीय शतकात निर्मित झाला असावा. गोली येथील स्तूपात अभिलेखांचा अभाव दिसून येतो. येथे केवळ एक अपूर्ण अभिलेख मिळाला आहे.

संदर्भ :

  • Ramchandran, T. N., ‘Buddhist Sculptures from A Stupa near Goli in Palnad Taluka, Guntur Districtʼ, Bulletin of the Madras Government Museum, New Series, Vol. I, Madras, 1929.

                                                                                                                                                                             समीक्षक : मंजिरी भालेराव