गोया, फ्रांथीस्को : ( ३० मार्च १७४६–१६ एप्रिल १८२८ ). प्रख्यात स्पॅनिश चित्रकार आणि उत्कीर्णनकार. त्याचे संपूर्ण नाव फ्रांथीस्को होसे दे गोया इ लूथ्येन्तेस (Francisco José de Goya y Lucientes). त्याचा जन्म फ्वेन्देतोदॉस (Fuendetodos), ॲरागॉन येथे झाला. प्रारंभी त्याने सॅरगॉसा येथे होसे लूथान (José Luzán y Martínez) या स्थानिक कलावंताकडे उमेदवारी केली. १७६३ मध्ये त्याने माद्रिदला फ्रांथीस्को बायो याच्याकडे कलेचे शिक्षण घेतले. त्याने १७६९ मध्ये इटलीला प्रयाण केले व रोम येथे कलाध्ययन केले. सॅरगॉसाला परतल्यावर एल पीलारच्या कॅथीड्रलमध्ये तसेच ओला दे येथील मठामध्ये त्याने धार्मिक चित्रे रंगवली. पुढे सँता बार्बरा येथील ‘रॉयल टॅपेस्ट्री फॅक्टरी’साठी चित्रजवनिका रंगविण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली व त्यानुसार त्याने सु. ३८ चित्रे रंगवली. ही चित्रे विविध रंगांतील असून त्यांत बैलझुंजी, सहली, जत्रा, लोकनृत्ये अशा विषयांद्वारा आनंदी व प्रसन्न वातावरणाचे चित्रण केले आहे. (उदा., ब्लाइंड मेन्स बफ, १७८७). १७७९ मध्ये मेंग्ज (Anton Raphael Mengs) या दरबारी चित्रकाराच्या ओळखीने गोयाचा राजदरबारी शिरकाव झाला. व्हेलाथ्केथच्या चित्रांची उत्कीर्णने करण्याची कामगिरी त्याच्यावर सोपविण्यात आली. तिथेच रेम्ब्रँटची चित्रेही त्याला जवळून पाहता आली. त्यांचा त्याच्यावर प्रभाव पडला. ‘व्हेलाथ्केथ, रेम्ब्रँट व निसर्ग हे माझे तीन गुरू होत’, असे त्याचे उद्गार होते.
गोयास १७८३ मध्ये फ्लोरीदाब्लांका या पंतप्रधानाचे व्यक्तिचित्र रंगविण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळाली. ह्याच सुमारास त्याने राजाची आणि राजकुटुंबियांची अनेक व्यक्तिचित्रे रंगवली. १७८५ मध्ये सान फेर्नांदोच्या अकादमीमध्ये चित्र कलेचा उपसंचालक म्हणून त्याची नियुक्ती झाली. तसेच तो दरबारी चित्रकारही बनला. एक शिष्टमान्य व्यक्तिचित्रकार म्हणून त्यास लौकिक लाभला. ह्या काळात यश, वैभव व प्रतिष्ठा यांनी त्याचे जीवन सुसंपन्न होते. द मेडो ऑफ सान इसीद्रो (१७८८) हे या काळातील त्याचे एक विख्यात चित्र होय.
गोया वैभवाच्या शिखरावर असतानाच, एका गंभीर आजारामध्ये त्यास बहिरेपण आले. या घटनेचा त्याच्या कलाजीवनावर खोल परिणाम झाला. या काळातील त्याच्या छायाभेदांकित अम्लरेखनाच्या (aquatint) मालिकेत मानवी भयावह निष्ठुरता, क्षुद्र मनोवृत्ती तसेच नैतिक मूल्यांचे अधःपतन यांसारखे विषय आले आहेत. उदा., Los Caprichos (इं. शी. द कॅप्रिसेस, १७९६–९८) ही ८२ अम्लरेखनांची मालिका. डिस्पॅरेट्स ह्या २२ अम्लरेखनांच्या मालिकेतही मानवी क्रौर्याचा प्रत्यय घडविणारी अद्भुतरम्य चित्रे आहेत. नेपोलियनच्या फ्रेंच सैन्याने स्पेनमध्ये जे क्रूर व पाशवी अत्याचार केले. त्यांचे अत्यंत भेदक व जिवंत चित्रण द एक्झिक्यूशन ऑफ रिबेल्स : द थर्ड ऑफ मे १८०८ यासारख्या चित्रातून पहावयास मिळते. द डिझास्टर्स ऑफ वॉर ही त्याची ८३ अम्लरेखनांची मालिका प्रसिद्ध आहे. १८२४ साली राजसत्तेच्या गैरमर्जीमुळे गोया स्पेन सोडून फ्रान्सला गेला व बॉर्दो येथे स्थायिक झाला. तेथेच त्याचे निधन झाले.
गोयाच्या प्रारंभीच्या काळातील चित्रांमध्ये द बेरियल ऑफ सार्डिन (१७९३), प्रोसेशन ऑफ फ्लॅगलंट्स (१७९३), द कोर्ट ऑफ द इन्क्विझिशन इ. उल्लेखनीय आहेत. ‘द कॅप्रिसेस’, डिस्पॅरेट्स, द डिझास्टर्स ऑफ वॉर या अम्लरेखनांतून सूक्ष्म निरीक्षण आणि तीव्र कल्पनाशक्ती यांतून साधलेली सामाजिक-राजकीय टीकेची अभिव्यक्ती आढळते. त्याची व्यक्तिचित्रे व प्रसंगचित्रे भोवतालच्या वातावरणात गुदमरलेली न वाटता, जिवंत व प्रत्ययकारी वाटतात. त्याची १८०० ते १८०५ या काळातील क्लोद्ड माजा व नेकिड माजा ही व्यक्तिचित्रे प्रख्यात आहेत.
गोयाने रंगापेक्षा रंगच्छटा आणि रेषेपेक्षा घनता (व्हॉल्यूम) यांना अधिक प्राधान्य देऊन व छायाप्रकाशतंत्राचा प्रभावी वापर करून जिवंत व वास्तववादी चित्रे निर्माण केली. त्याची चित्रणपद्धती स्थूल होती. तीत बारीकसारीक तपशिलांचा अभाव असला, तरी भावाभिव्यक्तीचे सामर्थ्य मोठे होते. गोया हा स्वकाळाच्या अनेक शतके पुढे असलेला द्रष्टा कलावंत होता. एकोणिसाव्या शतकातील कलाप्रवृत्तीची पूर्वचिन्हे त्याच्या कलेत दिसतात. नंतरच्या अनेक कलावंतांवर त्याचा प्रभाव पडला. त्याच्या चित्रांतून दृक्प्रत्यवाद, अभिव्यक्तिवाद, अतिवास्तववाद यांसारख्या आधुनिक कलापंथांची बीजे दिसून येतात.
संदर्भ :
- Chabrun, Jean — Francois, Trans. Brownjohn, J. M., Goya, London, 1965.
- Holland, Vyvyan, Goya : A Pictorial Biography, London, 1961.
- Schickel, Richard, The World of Goya, New York, 1968.