सोशलिस्ट पार्टी – समाजवादी पक्ष : १९३२ च्या कायदेभंगाच्या चळवळीचा जोर ओसरल्यानंतर काँग्रेसमध्ये सनदशीर राजकारणाचे वारे वाहू लागले. कायदेभंगाच्या प्रत्यक्ष चळवळीपेक्षा सनदशीर राजकारणामध्ये प्यादी पुढे-मागे करून स्वातंत्र्य लढा पुढे न्यावा अशा विचाराचे नेते पुढे सरसावले. अशा वेळी राष्ट्रीय आंदोलनास नवी दिशा देण्यासाठी आंदोलनाची उद्दिष्टे अधिक स्पष्ट करण्यासाठी आणि स्वातंत्र्य-संग्रामाच्या साधनांचा पुनर्विचार करण्यासाठी १९३४ मध्ये काँग्रेस अंतर्गत सोशलिस्ट पार्टीची स्थापना झाली. मुंबईमध्ये डॉ. संपूर्णानंद यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या पक्षाच्या पहिल्या अधिवेशनात (२१ व २२ ऑक्टोबर १९३४) पक्षाने स्पष्ट केले की, संपूर्ण स्वातंत्र्य म्हणजे ब्रिटिश साम्राज्यापासून भारताचे विमोचन आणि समाजवादी समाजाची स्थापना होय. मीरत येथे भरलेल्या (जानेवारी १९३६) पक्षाच्या अधिवेशनात पक्षाचे स्वरूप, कार्यक्रम व उद्दिष्टे या संबंधी एक प्रबंध मंजूर करण्यात आला. ‘मीरत प्रबंध’ या नावाने तो प्रसिद्ध आहे. या प्रबंधात पक्षाच्या निर्मितीची मीमांसा, राष्ट्रवादी व समाजवादी परस्परसंबंध, साम्राज्यवादाविरुद्ध लढ्याचे स्वरूप इ. मुद्यांचा परामर्श घेण्यात आला.

लाहोर येथे १९३८ मध्ये भरलेल्या अधिवेशनात पक्षाचा प्रचलित आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरील दृष्टीकोन स्पष्ट करण्यात आला. परिषदेतील ठरावात असे म्हणण्यात आले की, फॅसिझम व साम्राज्यवाद यांचे समाजवादावरील आणि लोकशाहीवरील आक्रमण अधिक तीव्र बनत आहे. जपानचे चीनवरील आक्रमण, इंग्लंडची भारतावरील पोलादी पकड, जर्मनी, जपान, इटली यांची युती यांवरून साम्राज्यशाही व फॅसिस्ट शक्ती यांचे वाढते सामर्थ्य लक्षात येते. या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत रशियन राजनीतीची अचूक दिशा स्पष्ट होते. रशियामधील सामाजिक व आर्थिक पद्धतीस पाठिंबा देण्यात आला. कम्युनिस्टांशी एकजूट करण्याचा निर्णय झाला. परंतु अल्पावधीतच त्यांच्यात सामंजस्य कमी होऊन तणाव निर्माण झाले. हिंदुस्थानातील कम्युनिस्ट पक्षाच्या युद्धविषयक नीतीच्या प्रश्नावर दोन पक्षांमधील एकी संपुष्टात आली. सुरुवातीस दुसऱ्या महायुद्धास ‘साम्राज्यवाद्यांमधील आपापसांतील संघर्ष’ असे संबोधणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाने, युद्धात रशिया सामील झाल्यावर दोस्त राष्ट्रांशी सहकार्य करावे आणि भारताच्या स्वातंत्र्याचा लढा स्थगित ठेवावा, अशी मागणी केली. उलट स्वातंत्र्यलढा आक्रमक करण्याची हीच वेळ आहे अशी समाजवादी पक्षाची भूमिका होंती.

म. गांधीच्या नेतृत्वाखाली १९४२ रोजी भारताच्या स्वातंत्र्याचा अंतिम लढा सुरू झाला. समाजवाद्यांनी या लढ्यात स्वतःस पूर्णतः झोकून दिले. जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन, एस्. एम्. जोशी इत्यादींनी भूमिगत राहून आंदोलनाची सूत्रे चालविली. १९४६ मध्ये पक्षाचे नेते व कार्यकर्ते तुरुंगातून सुटल्यानंतर १९४२च्या आंदोलनात ज्यांनी सहकार्य दिले होते, त्यांच्या मदतीने काँग्रेस अंतर्गत ‘ऑगस्टवादी’ गट या नावाने काम करावे की काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची पुनर्घटना करावी, यावर विचार झाला. त्यात पार्टीची पुनर्घटना करण्याचा निर्णय घेण्यात आला. १९४७ मध्ये कानपूर येथे भरलेल्या अधिवेशनात समाजवादी आंदोलनापुढील तात्त्विक आणि संघटनात्मक समस्यांवर प्रदीर्घ चर्चा झाली. ध्येयधोरणांंच्या नव्या निवेदनात प्रथम लोकशाही समाजवाद व हुकूमशाही साम्यवादाचे तुलनात्मक विवेचन करण्यात आले. समाजवाद म्हणजे केवळ भांडवलशाहीचा अंत नव्हे तर समता व लोकशाहीवर आधारलेली नव समजारचना होय. हा नवसमाज निर्माण करण्यासाठी पक्षाने पुढील सूत्रांचा पुरस्कार केला : (१) लोकशाही पद्धतीने कार्य करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना संघटना स्वातंत्र्य आणि प्रचार स्वातंत्र्य. (२) राजकीय सत्तेचे विकेंद्रीकरण (३) आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण (४) लोकशाहीनिस्ट आर्थिक नियोजन. (५) उद्योगधंद्यांचे सामाजिकीकरण (६) सहकारी शेती. याच अधिवेशनात ‘काँग्रेस सोशलिस्ट पार्टी’ या नावातील ‘काँग्रेस’ हा शब्द वगळण्यात आला. काँग्रेस बरोबरचे दुरावलेले संबंध त्यावरून स्पष्ट झाले. पुढच्याच वर्षी (१९४८) नासिक येथे भरलेल्या पक्षाच्या सहाव्या अधिवेशनात सोशलिस्ट पक्षाने काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा व एक स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून कार्य करण्याचा निर्णय घेतला.

पाटणा येथे १९४९ मध्ये भरलेल्या पक्षाच्या अधिवेशनात हिंसात्मक क्रांतीचा मार्ग त्याज्य ठरविण्यात आला आणि लोकशाही समाजवाद हे पक्षाचे ध्येय जाहीर करण्यात आले. याच अधिवेशनात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत सोशलिस्ट पक्षाचे सभासदत्व क्रियाशील सभासदांपुरतेच मर्यादित होते. येथून पुढे पक्षाचे दरवाजे पक्षाचे ध्येय धोरण मानणाऱ्या सर्वांना खुले करण्यात आले. पक्षाचे व्यापक जनपक्षात रूपांतर करण्यात आले. या प्रश्नावर मतभेद होऊन अरुणा असफ अली यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्ते १९५१ मध्ये पक्षाबाहेर पडले व त्यांनी ‘डावा समाजवादी गट’ स्थापन केला.

पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत ह्या पक्षाचा प्रचंड पराभव झाला. त्यानंतर पंचमढी येथे पक्षाची खास परिषद भरली. (मे १९५२). अध्यक्षीय भाषणात राम मनोहर लोहिया यांनी स्पष्ट केले की, साम्यवाद आणि भांडवलशाही या दोहोंना निश्चित तत्त्वज्ञान आहे. समाजवादास अशा मूलभूत सिद्धांताचा पाया अद्यापि लाभलेला नाही. यात त्याची दुर्बलता अंतर्भूत आहे. समाजवादाने साम्यवादाकडून आर्थिक उद्दिष्टे आणि भांडवलशाहीकडून सर्वसाधारण उद्दिष्टे घेतली. यामुळे समाजवादी विचार आंतरिक विसंवादाने वेढला गेला आहे. या दोहोंमध्ये समन्वय निर्माण करण्याचे ऐतिहासिक कार्य समाजवादी पक्षाने करावे असे आवाहन त्यांनी केले.

२६ व २७ सप्टेंबर १९५२ रोजी समाजवादी पक्ष आणि आचार्य कृपलानी यांचा किसान मजूर प्रजापक्ष यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची संयुक्त बैठक मुंबईमध्ये होऊन ‘प्रजा सोशलिस्ट पार्टी’ ची स्थापना करण्यात आली. या युतीचा हेतू प्रबल विरोधी पक्ष निर्माण करणे हा होता. परंतु पुढे काँग्रेसशी सहकार्याचे संबंध ठेवावयाचे की विरोधाचे ठेवावयाचे या प्रश्नावर पक्षात तीव्र मतभेद निर्माण झाले. या प्रश्नावर जयप्रकाश नारायण आणि अशोक मेहता पहिल्या भूमिकेस अनुकूल तर लोहिया दुसऱ्या भूमिकेचे आग्रही होते. त्याच प्रमाणे पक्षाचा तात्त्विक कल मार्क्सवादाकडे झुकणारा असावा की गांधी वादाकडे या प्रश्नावरही पक्षांतर्गत तणाव निर्माण झाला. १९५४ मध्ये जयप्रकाश नारायण पक्षातून बाहेर पडले व त्यांनी सर्वोदयी कार्य सुरू केले. पट्टम थानू पिल्ले यांनी त्रावणकोर-कोचीन राज्याच्या मंत्रीमंडळातून राजीनामा देण्याच्या प्रश्नावर पक्ष दुभंगला. पक्षाचा मोठा हिस्सा प्रजा समाजवादी पक्ष म्हणून काम करीत राहिला तर लोहियांच्या पाठीराख्यांनी सोशलिस्ट पार्टी हा वेगळा पक्ष स्थापन केला (१९५५). १० वर्षांच्या कालावधीनंतर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याचा संभव निर्माण झाला तथापि विलीनीकरणाच्या पहिल्या अधिवेशनातच (वाराणसी, जानेवारी १९६५) विभाजनाची प्रक्रिया सुरू झाली. कारण याच अधिवेशात पुर्वाश्रमीच्या प्रजा समाजवादी कार्यकर्त्यांनी विलीनीकरण रद्द करून प्रजा समाजवादी पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला.

१९७१ च्या लोकसभा निवडणुकीत संयुक्त सोशलिस्ट पार्टीने आघाडी उभी करण्यात पुढाकार घेतला. त्या सुमारास प्रजा समाजवादी पक्ष मात्र काँग्रेसशी संवाद साधण्यात व्यग्र होता. निवडणुकीत दोन्हीही पक्षांच्या पदरात प्रचंड अपयश पडले. त्या पार्श्वभूमीवर ९ ऑगस्ट १९७१ रोजी दोहोंच्या विलीनीकरणातून सोशलिस्ट पक्षाची निर्मिती झाली. अर्थात या विलीनीकरणापासून काही राज्यातील दोन्ही पक्षांच्या शाखा दूरच राहिल्या.

जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेने बिहारमध्ये सुरू झालेल्या काँग्रेस विरोधी आंदोलनात सोशलिस्ट पक्ष आणि त्याबाहेरील विविध समाजवादी गट आघाडीवर होते. अणीबाणीच्या काळात या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भूमिगत राहून अणीबाणी विरोधी वातावरण तयार करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. पुढे १९७७ च्या मे महिन्यात सोशलिस्ट पक्ष इतर चार पक्षांबरोबर विसर्जित होऊन जनता पक्षाची निर्मिती झाली. १९७९ आणि १९८० मध्ये जनता पक्षाचे विघटन झाले. प्रथम लोकदल आणि नंतर जनसंघ जनता पक्षातून बाहेर पडले, परंतु काँग्रेस (संघटना) या घटक पक्षाबरोबर सोशलिस्ट पक्ष जनता पक्षातच राहिला.

संदर्भ :

  • Key, V.O., Political Parties and Pressure Groups, New York, 1964.
  • Sadasivan, S. N. Party and Democracy in India, New Delhi, 1977.
  • लिमये, मधु, संयुक्त सोशॅलिस्टच का ?  मुंबई, १९६२.