स्वतंत्र पक्ष : तमिळनाडू राज्यातील प्रादेशिक राजकीय पक्ष. मद्रास येथे १९५९ मध्ये स्थापन झालेल्या स्वतंत्र पक्षाचे राजकीय अस्तित्व अगदी अल्पकालीन ठरले तरी एक कट्टर व्यक्तिस्वातंत्र्यवादी पक्ष म्हणून त्याचे भारतीय राजकारणातील स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या सात-आठ वर्षांत पंडित नेहरूंच्या आर्थिक धोरणांची दिशा स्पष्ट झाली. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्राचे स्थान प्रभावी असावे आणि खाजगी भांडवलदारांनी शासकीय उद्दिष्टांना अनुसरून आणि शासनाने निश्चित केलेल्या मर्यादांमध्ये आपले व्यवहार करावे, असे डावीकडे झुकलेले धोरण आकार घेत असताना काँग्रेस पक्षाने ‘समाजवादी धर्तीची समाजरचना’ ही तात्त्विक भूमिका आवडी येथे भरलेल्या (१९५५) काँग्रेस अधिवेशनात जाहीर केली. याच सुमारास काँग्रेस अंतर्गत सोशालिस्ट फोरम या डाव्या गटाचा प्रभाव वाढत होता. १९५९ मध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद फोरमच्या एक प्रमुख नेत्या इंदिरा गांधी यांच्याकडे आले. त्याच वर्षी नागपूर येथील अधिवेशनात काँग्रेसने सहकारी तत्त्वावर आधारित शेती व्यवसाय पद्धतीचा पुरस्कार केला. या सर्व घटनांमुळे देशांतील संपत्तीधारक वर्गामध्ये आणि विशेषतः जमिनमालकींमध्ये अस्वस्थतः निर्माण झाली. आर्थिक क्षेत्रातील राज्यसंस्थेची वाढती उपक्रमशीलता थोपविण्याच्या उद्देशाने चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पक्षाची निर्मिती झाली. अर्थात, काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनाअगोदरच मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करणारा एखादा पक्ष स्थापन व्हावा, असा विचार प्रामुख्यने ‘फोरम ऑफ फ्री एंटरप्रायजेस’ (स्थापना १९५६) आणि ‘ऑल इंडिया ॲग्रिकल्चरिस्ट फेडरेशन’ (स्थापना १९५८) या दोन दबाव गटांमुळे घोळत होता. त्यांच्या प्रयत्नातून स्वतंत्र पक्षाची निर्मिती झाली.

मुंबई येथे ऑगस्ट १९५९ मध्ये भरलेल्या बैठकीमध्ये पक्षाने आपली तात्त्विक भूमिका जाहीर केली. व्यक्तीच्या आर्थिक उपक्रमशीलतेस व स्वातंत्र्यास मुक्त वाव असावा, राज्यसंस्थेचे व्यक्तीवरील नियंत्रण किमान असावे, वर्गीय संघर्षाची संकल्पना त्याज्य ठरवावी, शेतजमिनीच्या मालकी हक्कामध्ये कसलाही बदल करू नये, सुस्थिर ग्रामीण जीवनाचा पाया उध्वस्त करू नये, भांडवली वस्तुचे उत्पादन, उपभोग्य वस्तूंचे उत्पादन आणि ग्रामीण उत्पादन या सर्वांमध्ये समतोल राखावा, ही सारांश रूपाने पक्षाची भूमिका सांगता येईल. अर्थात पक्षाची व्यक्ती स्वातंत्र्यवादी भूमिका आणि भांडवलशाहीचे समर्थन करणारा १९ व्या शतकातील उदारमतवाद यांची गल्लत करणे चूक ठरेल. स्वतंत्र पक्षाचा आर्थिक नियोजनास पूर्णपणे विरोध नव्हता. मुख्यतः रशियन पद्धतीच्या नियोजनाबाबत त्याची विरोधी भूमिका होती. पक्षाचा प्रभाव प्रामुख्याने ओरिसा, राजस्थान, गुजरात, बिहार या राज्यांमध्ये होता. पक्षाने १९६२, १९६७ आणि १९७१ अशा तीन सार्वत्रिक निवडणुका लढविल्या. पैकी १९६७ च्या लोकसभा निवडणुकीस जवळजवळ ९ टक्के मते पक्षास मिळाली पण त्यानंतरच्या निवडणुकीत हे प्रमाण तीन टक्क्यांवर घसरले. पक्षास उल्लेखनीय शासकीय सत्तेचा लाभ फक्त ओरिसा राज्यांत १९६७ नंतरच्या संमिश्र सरकारात मिळाला. १९७५ मध्ये स्वतंत्र पक्ष भारतीय लोकदला या पक्षात विलीन झाला.

संदर्भ :

  • मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती