उत्कल काँग्रेस : ओडिशातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष. सत्तरच्या दशकातील ओडिशाचे तत्कालीन मुख्यमंत्री विजयानंद (बिजू) पटनाईक यांना कामराज योजनेनुसार आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. १९६९ च्या काँग्रेस विभाजनानंतरही पटनाईक हे इंदिरा गांधी यांच्या काँग्रेस पक्षाबरोबर होते. मात्र ओरिसा प्रदेश काँग्रेस समिती आणि मध्यवर्ती काँग्रेस यांच्यातील तीव्र मतभेदामुळे १७ मे १९७० रोजी पटनाईक, राऊतराय आणि महांती या तीन वरिष्ठ काँग्रेस नेत्यांना केंन्द्रीय काँग्रेस समितीने निलंबित केले. निलंबनानंतर पटनाईक यांनी ओडिशा राज्याच्या रास्त मागण्यांकडे केंद्राचे लक्ष वेधावे, यासाठी जनतेचा पूर्ण पाठिंबा असणारा उत्कल काँग्रेस हा प्रादेशिक पक्ष स्थापन केल्याची घोषणा २२ मे १९७० रोजी दिल्ली येथे केली. १९७१ च्या निवडणुकीत उत्कल काँग्रेसला विधिमंडळात ३२ जागा मिळाल्या. मात्र पक्षाचे नेते पटनाईक यांना चार ठिकाणी पराभव पतकरावा लागला. स्वतंत्र पक्षाशी समझोता झाल्याने त्यांचा पक्ष संयुक्त शासनात सत्तारूढ झाला. त्यानंतर केवळ एक वर्षाच्या अवधीतच पटनाईक यांनी काँग्रेस प्रवेश केला आणि ९ जून १९७२ रोजी या संयुक्त शासनास राजीनामा द्यावा लागला. नंदिनी सत्पथी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष परत अधिकारावर आला. पटनाईक यांच्या गटाला सत्पथी यांचे नेतृत्व मान्य नव्हते, त्यामुळे काँग्रेस अंतर्गत परत संघर्ष सुरू झाला. प्रल्हाद मल्लिक या पटनाईक गटाच्या प्रवक्त्याने उत्कल काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाची घोषणा केली आणि १२ नोव्हेंबर १९७२ राजी उत्कल काँग्रेस परत उभी राहिली. मात्र पूर्वीच्या २८ पैकी केवळ ११ आमदारांनी उत्कल काँग्रेसकडे जाणे पसंत केले. हरेकृष्ण मेहताब यांनी ओडिशात स्थापन केलेल्या ‘स्वाधीन काँग्रेस’ बरोबर उत्कल काँग्रेसने सुरूवातीच्या काळात काम केले. विधिमंडळात त्यांनी ‘ओरिसा प्रगती पक्ष’ म्हणून काम पाहिले आणि २२ ऑगस्ट ७३ रोजी या दोन पक्षांचे विलीनीकरण झाले.
संदर्भ :
- मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती