ऑल पार्टी हिल लीडर्स कॉन्फरन्स : असमिया आणि हिंदी या दोन भाषांना राज्य शासनाची अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्याचा आसाम राज्य सरकारच्या विधेयकाला आसामच्या खासी, गारो आणि मिझो या डोंगरी भागांतील आदिवासी प्रतिनिधींचा तीव्र विरोध होता. सदर विधेयकाविरूद्ध लोकमत जागृत करण्यासाठी ६-७ जुलै १९६० रोजी या भागातील भटक्या जमातींचे प्रतिनिधी, इतर छोटे पक्ष, मिझो युनियन आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी खासदार जयभद्र हाजगेर यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय डोंगरी नेते परिषदेची स्थापना केली. या विरोधाला न जुमानता आसाम शासनाने आपले द्वैभाषिक धोरण राबविण्याचे ठरविले. त्यावेळच्या छालिया मंत्रिमंडळातील कॅ. विलीयमसन संगमा आणि डोंगरी भागातील प्रतिनिधी मंत्र्यांनी ७ ऑक्टोंबर १९६० रोजी राजीनामा दिला आणि डोंगरी भागासाठी स्वतंत्र राज्याची मागणी केली, तसेच विधिमंडळात या द्वैभाषिक धोरणाला कडाडून विरोध केला. परिषदेने स्वतंत्र डोंगरी राज्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले. १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार टाकला. १९६७ च्या निवडणुकीत डोंगरी भागातील विधानसभेच्या जास्तीत जास्त ११ जागा जिंकून आपल्या सामर्थ्याची चुणूक दाखविली. परिणामी ११ सप्टेंबर १९६८ रोजी केंद्र शासनाने आसाम अंतर्गत स्वायत्त डोंगरी राज्याच्या मागणीला मान्यता दिली. २ एप्रिल १९७० रोजी मेघालय राज्याची निर्मिती झाली. आसाम आणि मेघालय यांसाठी एकच उच्च न्यायालय आणि राज्यपाल असल्याने व स्वतंत्र मेघालय राज्याच्या आपल्या मागणीचा पुरस्कार करण्यासाठी परिषदेचा एक गट बाहेर पडला आणि ‘डोंगरी राज्य जनसत्ताक पक्ष’ (हिल स्टेट पिपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी) ८ नोव्हेंबर १९६८ रोजी स्थापन केला. २१ जानेवारी १९७२ रोजी मेघालय स्वतंत्र राज्य बनले. १९७२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत परिषदेने निर्णायक बहुमत मिळविले. २७ सप्टेंबर १९८४ रोजी डोंगरी राज्य प्रजासत्ताक पक्ष परत परिषदेत विलीन झाला. १९८४ मध्ये परिषदेने सत्तारूढ काँग्रेस पक्षाबरोबर सहकार्य केले. ९ फेब्रुवारी १९८६ रोजी परिषदेचे विसर्जन झाले आणि ‘हिल पीपल युनियन’ हा नवीन पक्ष ‘हिल स्टेट पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी’ या प्रादेशिक पक्षाच्या एकत्रिकरणाबरोबर निर्माण झाला.

संदर्भ :

  • Weiner, Myron, Ed. State Politics in India, Princeton, 1968.