नागालँड नॅशनॅलिस्ट ऑर्गनाइझेशन : नागालँड या राज्यातील एक राजकीय पक्ष. स्वातंत्र्यपूर्व काळात आसामच्या आदिवासी भागात ख्रिस्ती धर्मप्रसारकांव्यतिरिक्त इतरांना प्रवेशबंदी होती. त्या काळात आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतर झाले आणि या धर्मातरितांत आपण एक वेगळे राष्ट्र आहोत, अशी भावना निर्माण झाली. त्यांना ब्रिटिशांकडून प्रोत्साहन मिळत गेले. १९४६ साली नागा नॅशनल पार्टीची स्थापना झाली आणि नागा जमातीच्या वेगवेगळ्या घटकांनी स्वायत्त राज्यासाठी आणि नेतृत्वासाठी चळवळ सुरू केली. त्यांच्यातील अंतर्गत मतभेद मिळविण्यासाठी आणि जमातीमध्ये समझोता घडवून आणण्यासाठी, नागा जमातीची परिषद १९५७ मध्ये बोलविण्यात आली. पुढील तीन वर्षांत या परिषदेला सर्व स्तरांवर व्यापक पाठिंबा मिळत गेला आणि परिषद ही त्यांची प्रतिनिधिक संघटना म्हणून ओळखली जाऊ लागली. १९६० साली नागांच्या स्वतंत्र राज्याची मागणी त्यांनी पुढे केली. १९६३ साली नागालँड भारतातील सोळावे राज्य म्हणून घोषित करण्यात आले. १९६९ च्या निवडणुकीत नागा नॅशनॅलिस्ट ऑर्गनाइझेशन अधिकार पदावर आली. या सत्तारूढ पक्षाला विरोध म्हणून डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ नागालँड हा पक्ष अस्तित्वात आला. भूमिगत नागांच्या चळवळीबाबत कुठली भूमिका घ्यावी, याबाबत पक्ष नेतृत्वात गंभीर मतभेद निर्माण झाले. बऱ्याच मंत्र्यांनी राजीनामे देऊन पक्षविरोधी भूमिका घेतली. पक्ष विस्कळित बनला. तद्नंतरच्या निवडणुकीत ६० पैकी पक्षाला २३ जागा मिळाल्या आणि नंतर पक्ष नगण्य बनला.

संदर्भ :

  • मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती