फॉरवर्ड ब्लॉक : स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतातील एक राजकीय पक्ष. संघटनात्मक प्रश्नावर म. गांधीजींशी तीव्र मतभेद झाल्यामुळे सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि डाव्या समविचारी गटांना एकत्र आणण्यासाठी काँग्रेसच्याच अंतर्गत फॉरवर्ड ब्लॉक या नावाचा एक पुरोगामी गट संघटित केला (३ मे १९३९). १८ जून १९४० रोजी फॉरवर्ड ब्लॉक हा स्वतंत्र पक्ष म्हणून जाहीर करण्यात आला. सर्व डाव्या पक्षांचे एका ध्वजाखाली विलीनीकरण करणे, ते न जमल्यास निदान डाव्या घटक पक्षांचे एक फेडरेशन निर्माण करणे, हे फॉरवर्ड ब्लॉकच्या स्थापनेमागील उद्दिष्ट होते. परंतु हे उद्दिष्ट सफल झाले नाही. आपल्या नव्या पक्षाची बांधणी करण्यास सुभाषचंद्राना पुरेसा अवधी मिळू शकला नाही कारण स्वातंत्र्य लढ्याची विशिष्ट व्यूहरचना आखून त्यांनी अल्पावधीतच देशाबाहेर प्रयाण केले (१३ डिसेंबर १९४०). फॉरवर्ड ब्लॉकच्या तत्त्वप्रणालीमध्ये समाजवाद आणि राष्ट्रवाद या दोन तत्त्वांची सांगड घातली असल्याने ही तत्त्वप्रणाली फॅसिझमच्या खूपच निकट होती. सुभाषचंद्र बोस यांची विदेशनीती जर्मनी, जपान आणि इटली या अक्ष (अक्सीस) राष्ट्रांबाबत अनुकुलतेची होती. ही राष्ट्रे ब्रिटिशांची शत्रूराष्ट्रे होती, त्यामागील एक प्रमुख कारण होते हे खरे, परंतु त्याचबरोबर राजकीय तत्त्वज्ञानातील साधर्म्य हीही महत्त्वाची बाब होती.

ब्रिटिश सरकारने २२ जून १९४२ मध्ये या पक्षावर बंदी घातली आणि सर्व प्रमुख पक्षनेत्यांना अटक केली. ही बंदी १९४६ साली उठली तथापि पक्षनेत्यांमधील मतभेदांमुळे पक्षाचे विभाजन होऊन फॉरवर्ड ब्लॉक (सुभाषवादी) आणि फॉरवर्ड ब्लॉक (मार्क्सवादी) असे दोन गट निर्माण झाले. जानेवारी १९४७ मध्ये बिहारमध्ये आरा येथे भरलेल्या पक्षाच्या अधिवेशनामध्ये मार्क्सवादी तत्त्वप्रणालीचा पूर्णपणे स्वीकार करण्यात आला. शास्त्रीय समाजवाद हे पक्षाचे आधारभूत तत्त्व मानले गेले. तथापि भारतीय जीवनदृष्टी हीसुद्धा मार्क्सवादी तत्त्वप्रणाली इतकीच महत्त्वाची असून भारतातील समाजवादी विचारसरणी या दोहोंच्या समन्वयातून निर्माण झाली पाहिजे, असा आग्रह धरणारा एक गट पक्षात अस्तित्वात होता. फॉरवर्ड ब्लॉक (सुभाषवादी) या स्वरूपात तो अलग झाला. हा गट १९५३ मध्ये प्रजासमाजवादी पक्षात विलीन झाला. पुढे मार्क्सवादी गटामध्येही फूट पडून जोगळेकर यांच्या नेतृत्वाखाली मोठा गट बाहेर पडला. पक्षाने १९५२ पासून देशातील सर्व सार्वत्रिक निवडणुका कधी स्वतंत्रपणे, तर कधी इतर पक्षांशी युती करून लढविल्या आहेत. तथापि बंगाल वगळता इतरत्र या पक्षास उल्लेखनीय यश मिळाले नाही. महाराष्ट्रात विदर्भामध्ये पक्षाचा थोडाफार प्रभाव जांबुवंतराव धोटे यांच्या व्यक्तीमत्त्वामुळे होता. १३ ऑक्टोबर १९७८ रोजी महाराष्ट्रातील फॉरवर्ड ब्लॉकची शाखा इंदिरा काँग्रेसमध्ये विलीन झाली.

संदर्भ :

  • Misra, B. B. The Indian Political Parties : An Historical Analysis of Political Behaviour upto 1947, Delhi, 1976.