रामराज्य परिषद : सनातन हिंदू परंपरेवर विश्वास असलेल्या तसेच रामराज्याच्या आदर्श कल्पनेवर आधारलेल्या रामराज्य परिषदेची स्थापना जयपूर येथे एप्रिल १९४९ साली करण्यात आली. अखंड हिंदुस्थान हे रामराज्य परिषदेच्या पुरस्कर्त्यांचे मुख्य ध्येय होते. फाळणीनंतरच्या हिंदू हत्याकांडामुळे तसेच भारतात परतणाऱ्‍या हिंदू निर्वासितांवरील अत्याचारांच्या कहाण्या ऐकून पाकिस्तानविरूध्द क्षोभ निर्माण झाला होता. तसेच भारतातील काँग्रेस सरकारच्या प्रजासत्ताक राजकीय पध्दतीला आणि पाश्चिमात्य विचारसरणीवर आधारित असलेल्या संविधानाला त्यांचा सक्त विरोध होता. हिंदी भाषेचा अनिवार्य वापर, गोहत्याबंदी आणि जातिपरंपरेवर व अस्पृश्यतेवर त्यांचा विश्वांस होता. अस्पृश्यांच्या मंदिरप्रवेशाला त्यांचा विरोध होता. स्वामी करपात्री, स्वामी स्वरूपानंद सरस्वती आणि नंदलाल शर्मा यांच्याकडे रामराज्य परिषदेचे नेतृत्व होते. १९५१ साली एक लाखाच्यावर सभासद असल्याचा त्यांचा दावा होता. राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश या उत्तर भारतातील प्रांतांत परिषदेचा प्रभाव होता. १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळविल्यामुळे जनसंघाचे नेते श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी मार्च १९५२ मध्ये समविचारी विरोधी पक्षांची आघाडी स्थापन करण्यासाठी बैठक घेतली. तीत हिंदु महासभा आणि रामराज्य परिषद मुख्यत्वे करून एकत्र होते. जम्मू-काश्मीर येथे शेख अब्दुल्लांनी घेतलेल्या हिंदू विरोधी भूमिकेमुळे आणि जम्मू-काश्मीरच्या विलीनीकरणाच्या भूमिकेबाबत हे पक्ष विलीन झाले असते ; तथापि २३ जून १९५३ रोजी श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे निधन झाले. त्यामुळे विलीनीकरणाचा प्रश्नल तसाच राहिला. लोकशाही समाजवाद आणि जनतेत वाढणारी समाजिक जागृती यांमुळे या पक्षाला विशेष अस्तित्व नंतरच्या काळात राहिले नाही.

संदर्भ :

  • Mookerjee, Shyamaprasad, Why Bharatiya Jan Sangh ?  Delhi, 1957.