प्रत्येक क्षेत्रात त्या क्षेत्राशी निगडीत संशोधन महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. तसेच प्रत्येक क्षेत्रातील प्रगती ही त्या क्षेत्रातील संशोधनाशी निगडित असते. आधुनिक काळात व्यवस्था व कारभार या मध्ये येणाऱ्या अडचणी किंवा अडथळ्यांवर उपाय शोधण्यासाठी ही संशोधन उपयुक्त ठरते. संशोधन ही वस्तुस्थिती जाणून घेण्याची आधुनिक शास्त्रीय पद्धती आहे. आजच्या युगात प्रत्येक क्षेत्रातील सत्य वस्तुस्थिती व वस्तुस्थिती मधील नाते शोधण्यासाठीही संशोधन महत्त्वाची भूमिका पार पाडते.

परिचर्या हा एक अतिप्राचीन व्यवसाय आहे. हा व्यवसाय  रुग्णांच्या व समाजाच्या  सेवा कार्याशी संबंधित आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या व्याधींच्या रुग्णांना त्यांच्या गरजेनुसार परिणामकारक सेवा पुरविण्यासाठी त्यात सतत विकास व प्रगतीची आवश्यकता असते. उत्तम सेवा देणे व जुन्या आरोग्य सेवा आणि त्यांच्या पद्धतींत सुधारणा करण्यामध्ये संशोधन महत्त्वाची भूमिका पार पाडते. परिणामकारक शुश्रूषा व काळजी हे परिचर्या  व्यवसायाचे लक्ष्य आहे व त्यासाठी आरोग्य सुधारण्यासाठी लागणाऱ्या माहितीची गरज असते. ही माहिती शास्त्रोक्त पद्धतीने परिचर्या संशोधनामार्फत पुरवली जाते. संशोधन ही शुश्रूषा व्यवसायाची दूमड आहे. ही दूमड व्यवसायास मजबूत करण्यास मदत करते. तसेच परिचर्या व्यवसायाची  स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचे व  व्यवसाय अनुकूल प्रतिबिंब संवर्धन करण्याचे कार्य करते. संशोधनाचा हेतू जरी निरनिराळा असला तरीही मनुष्यप्राणी हा त्याचा केंद्रबिंदू असतो आणि तोच शुश्रूषा संशोधन अभ्यासाचा विषय बनतो.

परिचर्या संशोधन हे परिचारिकांनी करण्याच्या वेगवेगळ्या सेवाक्रिया व उपचार पद्धतींसाठी शास्त्रीय पुरावा निर्माण करून परिचर्या व्यवसायात शास्त्रीय ज्ञानाची भर घालते. परिचर्या संशोधनात पद्धतशीर आखणी करून एखाद्या निकडीच्या विषयावर सखोल अभ्यास केला जातो. अचूक माहिती मिळविण्यासाठी तर्कशास्त्रीयरित्या, पद्धतशीरपणे, औपचारिक तपासणी किंवा अभ्यास प्रक्रियांच्या दिशेने अभ्यास केला जातो. संशोधनात शास्त्रीय दृष्टिकोन व शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून एखाद्या प्रश्नावर तोडगा काढला जातो किंवा सध्या वापरात असणाऱ्या पद्धतींवर, शुश्रूषा क्रियांवर प्रश्नचिन्ह निर्माण करून त्या नव्याने विकसित केल्या जातात आणि त्यांना शास्त्रीय पाया देऊन त्या दृढ केल्या जातात. माहितीचा खात्रीशीर स्त्रोत मिळविण्यासाठी संशोधनात अनुमाणिक व अनुमानजन्य कारणमीमांसेचा समावेश केला जातो. साहित्याचे पुनरावलोकन व समालोचन करून वेगवेगळे सिद्धांत, गृहीतक आणि प्रमेय ठरवून त्यांची तपासणी केली जाते. शास्त्रीय संशोधन योजना मांडून वेगवेगळ्या पद्धती व  तंत्र अवलंबून माहिती व  निरीक्षणांचे परिणाम गोळा केले जातात व एकत्रित माहितीचे पृथ:करण करून त्याला स्पष्टीकरणात्मक अर्थ दिला जातो. सर्वात शेवटी हा सखोल अभ्यास व मिळवलेले निष्कर्ष सादर करून व प्रसिद्ध करून त्या शास्त्रीय माहितीचा व निष्कर्षांचा परिचर्या क्षेत्रात उपयोग केला जातो. तो उपयोग फक्त रुग्णसेवेशीच मर्यादित न ठेवता परिचर्या शिक्षण, परिचर्या व्यवस्थापन व प्रशासन आणि परिचर्या संशोधनात ही आवर्जून केला जातो.

अशा प्रकारे परिचर्या संशोधन हे कार्याची व व्यवसायाची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतेच तर व्यवसायाची सुधारणा व प्रगती यातही मोलाची भर टाकते. थोडक्यात आजच्या तंत्रज्ञानाच्या, विकासाच्या व स्पर्धेच्या युगात आरोग्य क्षेत्रात आपले स्थान टिकविण्यासाठी व उंचविण्यासाठी परिचर्या संशोधनाची अत्यंतिक गरज असून हे संशोधन परिचर्या क्षेत्राचे अविभाज्य अंग बनले आहे व याची मुळे आधुनिक परिचर्या व्यवसायाची जनक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या काळापासूनच ह्या व्यवसायात रुजलेली आहेत. एकविसाव्या शतकात त्यामध्ये दिवसेंदिवस आमूलाग्र प्रगती होत आहे.

संदर्भ :

  • सामंत कुसुम, शुश्रूषा  संशोधन, पुनर्मुद्रण २०११
  • बसवंत अप्पा बि. टी., नर्सिंग  रिसर्च, तिसरी आवृत्ती २०१४,
  • nursing research-wikipedia.org

समीक्षक : सरोज वा. उपासनी