प्रस्तावना : परिचर्या शास्त्राची जनक फ्लोरेंस नायटिंगेल यांनी सर्वप्रथमत “गुणवत्ता पूर्वक परिचर्या” या विषयाची संकल्पना मांडली. गुणवत्ता पूर्वक परिचर्या देण्याची प्रक्रिया काळानुरूप आणि नवनवीन वैद्यकीय संशोधनाप्रमाणे बदलत असते. गुणवत्ता पूर्वक परिचर्या म्हणजेच रुग्णाला देण्यात येणारी सेवा शुश्रूषा जी ठराविक मानकांन्वये (Set Nursing Standard) देण्यासाठी प्रशिक्षित परिचारिका कटिबद्ध असतात. ज्यामुळे रुग्णपरिचर्येचा अपेक्षित परिणाम दिसून येतो. अशा प्रकारची मानके खालील ३ प्रकारात विभागली जातात.

१.आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थेचा प्रकार, व्यवस्थापकीय संरचना (Structural standards)

२.परिचर्या देण्यासाठीची मानके (Nursing Intervention standards),

३.परिचर्या पुरविल्यानंतर अपेक्षित परिणाम (Desired patient out come)

परिचर्या मानके भारतीय परिचर्या परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित असतात. ही मानके म्हणजे आजारी व्यक्तीला देण्यात येणाऱ्या सेवांचे अपेक्षित मूल्यमापन करण्यासाठी दिलेली गुणात्मक विधाने किंवा प्रतिपादन केलेल्या संज्ञा होय. रोग्याची शुश्रूषा करताना प्राधान्य क्रमाने विविध उद्दिष्टे अध्यारूढ धरून सेवा दिली जाते. त्या उद्दिष्टांना प्रमाण मानून मूल्यमापन केले जाते .

परीचर्येतील मानकांचा हेतू : ( Purposes )

 •  रोग्याची शुश्रूषा करताना मार्गदर्शन करणे व सेवा देण्याची दिशा ठरविणे
 •  शुश्रूषा करताना सुरक्षित आणि असुरक्षित अशी मूलभूत मूल्यमापनाची तत्त्वे ठरविणे.
 •  परिचर्येचा गुणात्मक दर्जा सुधरविणे
 •  शुश्रूषा देताना त्याच्या नोंदी ठेवण्यात मदत करणे
 •  परिचर्या पर्यवेक्षक (Supervisor) यांनी इतर कार्यरत परिचारिकांना मार्गदर्शन करणे
 •  नेमून दिलेल्या विभागात परिचर्येसाठी लागणाऱ्या संसाधनांचा गरजेनुसार पूरवठा करणे
 •  परिचारिकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे

राष्ट्रीय मान्यताप्राप्त रुग्णालय मंडळ आणि आरोग्य सेवा प्रदाता (National Accreditation Board Of Hospital and Health Care Provider) यांनी परिचर्येची काही मानके स्पष्ट केलेली आहेत. “गुणवत्ता परिचर्येची हमी” या शीर्षकाखाली सुचविलेल्या काही प्रक्रिया आहेत, त्या खालील प्रमाणे .

 • परिचर्या प्रक्रियेची तपासणी ( Nursing Audit )
 • हकारी गट सदस्याकडून कामाचे पुनरावलोकन (Peer Review )
 • रुग्ण अहवालाचे परीक्षण करणे ( Patient care profile analysis)
 • गुणवत्ता पूर्वक परिचर्या निरीक्षण करणारी समिती /मंडळे (Quality Circles )
 • रुग्णाचे दिलेल्या सेवेविषयी समाधान तपासणे (Patient’s Satisfaction)
 • परिचारिकांना त्यांनी दिलेल्या सेवेविषयी अभिप्राय देणे
 • रुग्ण परिचर्येतील जोखमीचे व्यवस्थापन (रुग्णासाठी व परिचारिकेसाठी )

गुणवत्ता पूर्वक परिचर्या आणि परिचारिकेची भूमिका :

 • परिचारिकांमध्ये मानकांविषयी जागरूकता निर्माण करणे.
 • मानकांचा अभ्यास करणे, कृती करून मूल्यमापनात मदत करणे.
 • रुग्णालयातील विविध शुश्रूषा विभागातील समन्वयकाची भूमिका.
 • नवीन परिचारिकांसाठी प्रशिक्षण देणे.
 • सर्व परिचर्या सराव मानकांविषयी परिचारिकांशी संवाद साधणे.
 • विभागीय पर्यवेक्षक विविध शुश्रूषा विभागातील मूल्यमापन करणे.
 • इतर भूमिका : १) रुग्णसेवा केंद्रित परिचर्या (patient centred care), २) अपेक्षित परिणामात्मक रुग्ण शुश्रूषा (desired out come), ३) परिचारिका मानकांची जबाबदारी सातत्याने घेऊन त्याचा विकास करणे, ४) प्रात्यक्षिक परिचर्या व संशोधन यावर भर देणे.

गुणवत्ता पूर्वक परिचर्या देताना परिणाम करणाऱ्या बाबी : 

 • आवश्यक ती संसाधने, रुग्ण सेवा विभाग, आर्थिक बळ, वस्तू आणि उपकरणे इ. बाबींची योग्य ती पूर्तता न होणे तसेच असंतुलन किंवा कमतरता असणे.
 • प्रशिक्षित व उच्च शिक्षित परिचारिका उपलब्ध नसणे.
 • मान्यता स्वीकृती व्यवस्थापन (Accreditation System) नसणे.
 • प्रासंगिक/अकस्मात घटना अहवाल पद्धती नसणे (Incidental Report System).
 • आवश्यकते नुसार निरंतर किंवा सातत्य पूर्वक प्रशिक्षण उपलब्धता नसणे.
 • कामगिरी म्हणजेच दिलेल्या सेवेचे /शुश्रूषेचे मूल्यांकन न होणे.

भारतीय परिचर्या परिषदेने गुणात्मक परिचर्या प्रशिक्षण देण्यासाठी आणि गुणात्मक रुग्ण सेवेची प्रक्रिया राबविणे साठी विकसित केलेली मूलभूत तत्‍त्वे (Quality Assurance – as per Indian Nursing Council; INC) :

 • रुग्ण/ शुश्रूषा घेणाऱ्या व्यक्तीला चांगली आणि सुरक्षित सेवा मिळावी. त्यांचा एक व्यक्ती म्हणून आदर करावा. सेवा देतांना कुणावरही अन्याय होऊ नये. सर्व दुर्बलांना संरक्षण मिळावे.
 • रुग्ण सेवा देताना त्या त्या आरोग्य संस्थेच्या संरचनेची व व्यवस्थापनेची प्रस्थापित मूल्ये तसेच परिचर्येतील नितीमूल्यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा दिली जाते.
 • रुग्ण सेवा देताना परिचर्येतील मानकांना उपयोगात आणण्याची जबाबदारी घेणे.
 • रुग्ण सेवा देणाऱ्या इतर सर्व सदस्यांबरोबर एक महत्‍त्वाचा सदस्य म्हणून काम करणे.
 • रुग्ण सेवा देताना लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करून गुणात्मक रुग्ण सेवेची प्रक्रिया राबविताना सामाजिक अपेक्षांचे भान ठेवावे.
 • शुश्रूषा सेवेचे नियोजन करताना रुग्णाचा त्यात महत्‍त्वाचा असा सहभाग असावा.
 • परिचर्या व्यवसायातील विकासासाठी प्रयत्नशील असावे.
 • व्यवसायाभिमुखता राखताना मान्यता स्वीकृती, कायदेशीर बाबी आणि राजकारण या सर्व संकल्पना व्यवस्थितपणे समजावून घ्याव्यात .

गुणात्मक रुग्ण सेवेचा हेतू  ( Purposes of Quality Assurance) :

 • गुणात्मक रुग्ण सेवेची हमी प्रक्रिया राबविताना रुग्ण, समाज, परिचर्या परिषद  आणि व्यवस्थापन यांच्या अपेक्षा काय आहेत याचे भान ठेवावे.
 • परिचारिकांनी आरोग्य सेवा देताना रुग्ण व व्यवस्थापन यांच्याशी प्रामाणिक व वचनबद्ध असावे.

गुणात्मक रुग्ण सेवेची ध्येये  ( Goals of Quality Assurance) :

 • रुग्णांमध्ये त्यांना गुणात्मक सेवा दिली जात आहे याविषयीचा आत्मविश्वास वाढीस लागावा.
 • व्यवस्थापनात गुणात्मक सेवा देण्यासाठी वचनबद्धता वाढविण्यासाठी प्रयत्न करावा.
 • परिचर्येमधील रुग्ण सेवेतील दस्तऐवज लिखाणाच्या (record keeping) प्रक्रियेत सुधारणा करावी.
 • गुणात्मक रुग्णसेवा देताना संसाधनांचा आर्थिक दृष्टीने –प्रभावात्मक उपयोग करण्यात यावा.

भारतातील परिचर्या व्यवसायाकरिता मानके (Nursing Practice Standards in India) : 

अ. क्र.   मानके         प्रक्रिया 
१       व्यावसायिक जबाबदारी
 • परिचर्या शुश्रूषा ‘गुणवत्ता हमी’ या प्रतिमानावर  आधारित असावी.
 • रुग्ण परिचर्या शुश्रूषा ही व्यावसायिक तत्‍त्वांवर आणि नितीमूल्यांवर आधारित असावी.
 • रुग्ण सेवा कायद्याच्या चौकटीत  राहून दिली जावी.
 • रुग्ण सेवा दिल्यांनतर त्या विषयीचे दस्तऐवज लेखन (recording system) व्यवस्थित आणि परिपूर्ण असावे.
 • प्रत्येक परिचारिका स्वःताच्या कृतीसाठी / दिलेल्या रुग्ण सेवेसाठी  जबाबदार असावी.
   परिचर्या सराव (Nursing practice)
 • प्रत्येक रुग्णास देण्यात येणारी सेवा ही ठराविक परिचर्या मानकाप्रमाणे देण्यात यावी
 • रुग्णास देण्यात येणारी सेवा परिचर्या प्रक्रिया या पद्धतीवर आधारित असावी.
 • रुग्ण सेवा ही संपूर्णपणे  सुरक्षित आणि  सुरक्षित वातावरणात पुरविण्यात यावी  .
 संवाद चातुर्य व अंतर वैयक्तिक संबंध (Inter personal   relationship)
 • परिचारिका रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचेशी सुसंवाद साधून रुग्ण व त्याचे कुटुंब यामध्ये चांगले वैयक्तिक संबंध प्रस्थापित करते .
 • परिचारिका व्यक्ती आणि समूह यांच्या मध्ये आरोग्य शिक्षण वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करते.
रुग्णाचा आदर करणे
 • परिचारिका रुग्ण सेवा देताना प्रत्येक रुग्णाची वैयक्तिक प्रतिष्ठा, स्वाभिमान जपण्याचा प्रयत्न करतात.
 • प्रत्येक रुग्णाला दिल्या जाणाऱ्या सेवेमधून रुग्ण सेवेचा त्याचा हक्क /अधिकार जपला जातो. विशेषता दुर्बल, असाह्य आणि असुरक्षित रुग्णाचे आरोग्याचे हक्क अबाधित ठेवणे.
 • परिचारिका रुग्ण सेवा देतांना लिंग संवेदन शीलता या संकल्पने नुसार स्त्री रुग्णांच्या आरोग्य समस्या आणि गरजा याकडे विशेष लक्ष पुरविणे.
परिचर्या व्यवस्थापन
 • परिचर्या व्यवस्थापनात उपयुक्त व परिणामकारक तत्‍त्वांचा उपयोग प्रतीत होणे गरजेचे असते
 • परिचर्या व्यवस्थापन गुणात्मक परिचर्येची हमी देणारे असावे.
 • परिचर्या व्यवस्थापनाची संरचना अशा प्रकारची असावी, ज्या मध्ये सर्व संसाधनाचा उपयोग करण्यात यावा.
 • परिचर्या व्यवस्थापन रुग्ण सेवा देताना कार्यरत संस्थेचा विकास करून त्या संस्थेच्या नियमाचे अनुकरण करताना परिचर्या व्यवसायातील वैधानिक बाबींचा त्यात समावेश करते.
 • परिचर्या व्यवस्थापन आणि प्रशासनाने कर्मचारी विकास
  व परिचारिकांसाठी कल्याणकारी योजना विकसित करण्यासाठी प्रयत्न करते.
व्यावसायिक प्रगती
 • परिचर्या व्यवसायातील प्रगतीसाठी सातत्य पूर्वक परिचर्या प्रशिक्षण उपलब्ध करून व्यावसायिक वृद्धी, स्वत:साठी आणि इतरांसाठी  करण्यात यावी.
 • परिचर्या व्यवसायातील रुग्ण सेवा ही अद्ययावत आणि प्रगतीवर आधारित वैद्यकिय सेवेशी निगडीत असावी.

सारांश : रुग्ण सेवेतगुणवत्ता पूर्वक रुग्ण परिचर्या हमी”  ही प्रत्येक परिचारिका, आरोग्य सेवा कर्मचारी आणि आरोग्य सेवा उपभोगता म्हणजेच आजारी /निरोगी व्यक्ती या सर्वांच्या दृष्टीने आज  महत्‍त्वाची आणि आवश्यक बाब ठरली साहे. परिचारिका आरोग्य सेवेत महत्‍त्वाची भूमिका बजावतात. म्हणून प्रत्येक परिचारिका गुणवत्तापूर्ण रुग्ण सेवेसाठी प्रशिक्षित व संवेदनशील असणे गरजेचे आहे .

संदर्भ :

 • Teaching Material for Quality Assurance Model by Indian Nursing Council