पेस्टालोत्सी, योहान हाइन्रिक (Pestalozzi, Jahann Heinrich) : (१२ जानेवारी १७४६ – १७ फेब्रुवारी १८२७). प्रसिद्ध स्विस शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा जन्म झूरिच येथे झाला. ते पाच वर्षांचे असतानाच त्यांचे वडील वारल्याने त्यांची आई होट्झ हिने त्यांचा सांभाळ केला. आईच्या उत्कृष्ट संस्कारामुळेच त्यांच्यात प्रेम, जिव्हाळा, सहानुभूती, ऋजुता, औदार्य इत्यादी नैतिक मानवीय गुणांचा विकास झाला. बालशिक्षणात मातृवात्सल्याचे महत्त्व व मनोविकासात मातेचे मार्गदर्शन त्यांना स्वानुभावाने पटले होते. त्यांचे आजोबा शेजारच्या गावी धर्मोपदेशक होते. त्यांनी आपल्या आजोबांसोबत फिरताना तेथील शाळा, रहिवासी लोक, शेतकरी, कारखान्यातील बालकामगार यांना जवळून पाहीले. गरीब, दिनदुबळे, अनाथ, आजारी अशा लोकांना भेटी दिल्या. तेव्हा लहानपणापासूनच गरीबांबद्दल सहानुभूती वाटून दरिद्री जीवनाचा अनुभव त्यांना दलितांची सेवा करण्यास प्रेरक ठरला. त्यांच्या उद्धारासाठी धर्मोपदेशक होणे हाच मार्ग उत्तम असे त्यांना वाटू लागले; पण त्यांचे पहिलेच प्रवचन अयशस्वी झाल्याने त्यांनी धर्मोपदेशक बनण्याचे सोडून दिले. तसेच लोकांचे अज्ञान, समस्या व स्वत:मधील मदत करण्यासाठीची असमर्थता यांचा ठसा त्यांच्यावर उमटला. यावर लोकांच्या वाजवी हक्कांचे समर्थन करण्यासाठी वकिली हाच एक मार्ग, असे वाटून ते वकिलीकडे वळले; पण प्रतिकूल परिस्थितीमुळे कायद्याचा अभ्यास करणे त्यांना जमले नाही. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर पेस्टालोत्सी यांनी काही दिवस स्विस पाप्युलर गॅझेट या वृत्तपत्राचे संपादन करून त्याद्वारा शैक्षणिक व राजकीय सुधारणेचा पुरस्कार केला. याच काळात प्रसिद्ध विचारवंत झां झाक रूसो यांचे सामाजिक करार व एमिल हे ग्रंथ वाचल्याने त्यांतील विचारांचा त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला. त्यांची ‘मला शिक्षणाला मानसशास्त्रीय बैठक करून द्यायची आहे’ ही प्रतिज्ञाच होती.
पेस्टालोत्सी यांनी इ. स. १७६९ मध्ये ॲना शूलथेस या युवतीबरोबर विवाह केला. त्यांनी आपल्या प्रयोगाला सुरुवात करण्यापूर्वी सुरुवातीस स्वत:च्या मुलाला एमिलच्या धर्तीवर शिकविण्यास सुरुवात केली. त्यानंतर न्यूहॉफ (स्वित्झर्लंड) येथे इ. स. १७७५ मध्ये स्वत:च्या शेतामध्ये अनाथाश्रमाची उभारणी करून त्यांनी आपल्या शिक्षण प्रयोगास आरंभ केला. २० गरजू व निराधार मुलामुलींना तेथे ठेवून त्यांना आपल्या मुलांप्रमाणे वागविले. सुरुवातीला या मुलामुलींना बायबलचे तोंडी धडे देऊन त्यामधील काही गोष्टी मुखोद्गत केल्यात. त्यामुळे मुलांच्या शरीर, मन, नीतीमत्ता यांत सुधारणा झाली. त्यानंतर त्यांना शेती व बागकाम आणि मुलींना घरकाम, शिवणकाम, कशिदा, गृहकाम यांचे व्यावसायिक शिक्षण दिले. त्याबरोबरच वाचन, पाठांतर, गणित यांचीही जोड दिली. त्यामुळे पुस्तके व माहिती म्हणजे शिक्षण नव्हे, हे त्यांना यातून समजले. तसेच गरीब मुलांना योग्य शिक्षण दिल्यास ते सन्मार्गाला लागून आपला चरितार्थ चालवतील असा विश्वास त्यांना वाटू लागला; मात्र विद्यार्जनासोबत सूतकताईसारखे काम करून विद्यार्थी स्वावलंबी करण्याचा त्यांचा इ. स. १७८० मधील प्रयोग प्रारंभी अयशस्वी ठरला. ते पूर्ण कर्जबाजारी झाल्याने तसेच शेतकरी, व्यवस्थापक, व्यापारी, शिक्षक, परोपकार अशा विविध भूमिका न जमल्यामुळे हा प्रयोग बंद झाला. या निराशेतूनच त्यांनी इ. स. १७८० मध्ये ‘द ईव्हनिंग अवर्स ऑफ ए हार्मिट’ (इं. शी.) हा ग्रंथ पतीपत्नीच्या कथारूपाने लिहिला. या ग्रंथामध्ये पत्नीने आपल्या दुर्व्यसनी नवऱ्यात योग्य परिवर्तन कसे घडवून आणले, याचे वर्णन आहे. एका सर्वसामान्य खेडवळ स्रीचे साधेसुलभ विचार खेड्यात सुधारणेस कारणीभूत झाले. या प्रयोगाची सरकारने दखल घेऊन पेस्टालोत्सी यांना वाङ्मय महत्त्वाचे स्थान दिले. प्रस्तुत ग्रंथ पेस्टालोत्सी यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाची गुरूकिल्ली समजला जातो. त्यांच्या या जर्मन कथेवरील आधारित वैचारिक कादंबरित शिक्षणविषयक मौलिक विचार आढळतात. त्यांनी १८०१ मध्ये हाऊ ‘हाऊ गर्ट्रूड टीचेस हर चिल्ड्रेन’ (इं. शी.) नावाची मूलग्राही शैक्षणिक विचारांना चालना देणारी दुसरी कादंबरी लिहिली.
पेस्टालोत्सी यांनी इ. स. १७९८ मध्ये पुन्हा स्तांझ या खेडेगावी एक शाळा व अनाथालय सुरू करून शिक्षकी रूपाने आपले शिक्षणविषयक प्रयोग सुरू केला. त्यांनी मुलांमध्ये लवकरच विश्वास संपादन करून त्यांच्यात शारीरिक, बौद्धिक, नैतिक सुधारणा घडवली. कोणताही मदतनीस, पुस्तक, साधने इत्यादीविना त्यांनी शिक्षणाचे काम निर्धाराने, स्वानुभवातून, अवलोकनातून व निरीक्षणातून सुरू केले. धर्म, नीती, संयम, परोपकार, सहानुभूती व कृतज्ञता यांची व्यवहारातून, आचारातून म्हणजेच जीवनातून शिकवण दिली. अंकगणित व भाषा या विषयांची ओळख वस्तुंच्या साहाय्याने; तर इतिहास व भूगोल हे विषय संभाषण, विविध नकाशे व नमुने, प्रात्यक्षिकांतून निरीक्षण करून चर्चेद्वारे शिकविले. शिक्षणात शब्दांना गौण स्थान देऊन अभ्यास व कृती यांचा त्यांनी समन्वय साधला. अभ्यास व हस्तव्यवसाय, शाळा व कारखाने यांचा जवळचा संबंध आणला. त्यांनी प्रत्यक्ष अनुभव, प्रयोग, कृती यांचा शिक्षणकार्यात उपयोग करून घेतला; परंतु वर्षाच्या आतच फ्रेंच सैनिकांसाठी हॉस्पिटलला त्यांची जागा दिल्यामुळे त्यांना आपले प्रयोगस्थळ सोडावे लागले. या कामाच्या ताणामुळे ते आजारी पडले. आपले शैक्षणिक कार्य चालू ठेवण्यासाठी त्यांना नोकरी शोधावी लागली. जगाला शिक्षणाचे उत्तम धडे देणारा महापुरुष नोकरीत कमी पडला. त्यांना मुलांची मन समजली; पण मोठ्यांची मने (खोटी मने) उमगली नाहीत.
काही काळानंतर त्यांनी बर्गडॉर्फ येथे स्तांझ येथील कार्य पुढे चालू केले. विद्यार्थ्यांना पाठ्यवस्तू सुलभतेने समजण्यासाठी त्यातील क्लिष्टता कमी करून सोप्याकडून कठीणाकडे, क्रमाक्रमाने शिकविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. भाषा शिक्षणात मनोरंजकता, गणितात वस्तुंचा उपयोग, भूमितीत विविध आकृत्यांचा उपयोग करून सुलभ व मनोरंजकतेने ते शिकवीत. पेस्टालोत्सी यांच्या मते, ‘शिक्षणाची सुरुवात व्यक्तीपासून व्हावी. शिक्षण मानसिक विकासास अनुरूप असे असावे. बालकांचा स्वाभाविक व स्वयंस्फूर्त विकासात येणारे अडथळे दूर केल्यास त्यांचा आंतरिक शक्तीचा विकास होईल. ज्ञानाची सोप्या घटकात विभागणी करून त्यांची तर्कशुद्ध मांडणी व कनिष्ट प्रतिच्या विद्यार्थ्यांचासुद्धा नैतिक, शारीरिक, स्वाभाविक, सुसंघटीत, सुसंवादी, मानसिक इत्यादी विकास घडावा, अशी शिक्षणाची रचना असावी. म्हणून शिक्षण हे समाजसुधारणेचे साधन आहे. असा विकास प्रत्यक्ष अनुभवाने साधतो. अनुभव घेण्याचे साधने इंद्रिय होत. निरीक्षणातूनच ज्ञान प्रक्रिया होते आणि त्यातून इंद्रियांचा विकास होतो, हाच शिक्षणाचा पाया आहे’. त्यांनी शिक्षणाचा व अध्यापनाचा मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करून पुढच्या काळात विस्तार पावलेल्या कल्पनांचा व अध्यापनपद्धतींचा पाया रचला.
पेस्टालोत्सी हे ईश्वरभक्त असले, तरी शिक्षणात धर्माची शिकवण नसावी, असे त्यांचे मत होते. ‘अनुभवातून शिक्षण हेच खरे शिक्षण’ त्यांच्या या तत्त्वामुळे त्यांनी शिक्षण हे मानसशास्त्रमय केले असे म्हटले जाते. रूसोप्रमाणे शिक्षण ही एक नैसर्गिक, ऐंद्रीय प्रक्रिया आहे, असे त्यांचे प्रतिपादन होते. शिक्षण म्हणजे बालकाच्या शक्तीचा व क्षमतेचा नैसर्गिक, प्रगतिशील आणि समतोल विकास होय, अशी त्यांनी व्याख्या केली. ‘लर्निंग बाय हेड, हँड आणि हार्ट’ हे त्यांचे ब्रीद वाक्य असून ब्रीदाप्रमाणे शिक्षणात बालकाचा मेंदू आणि हात यांबरोबरच त्यांच्या हृदयाचाही उपयोग करून घेतला पाहिजे असे म्हणतात. शिक्षण ही नैसर्गिक प्रक्रिया असल्याने ती केवळ श्रीमंताची मिरासदारी नसून प्रत्येक मनुष्यमात्राचा तो हक्क आहे. शिक्षणाच्या माध्यामातून बालकांची व्यक्तिगत सुधारणा व्हावी एवढाच उद्देश नसून मनुष्यजातीचा अभ्युदय (भरभराट) व्हावयास पाहिजे, असे त्यांचे सांगणे होते. अध्ययन हे संवेदनांमार्फत चांगले होते. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात डोळे, कान, हात यांचा उपयोग केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या अध्यापन पद्धतीत निरीक्षणाला महत्त्व आले. अध्ययनात विचारालाही स्थान असते, याकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष झाले.
पेस्टालोत्सी यांनी इ. स. १८०० ते इ. स. १८०४ या काळात अनेक निवासी शाळा चालविल्या. इ. स. १८०५ मध्ये बर्गडॉर्फ येथील संस्था व्हर्डून येथे हलविली. येथील निवासी शाळेचे ते वीस वर्षे संचालक होते. येथे शाळेला फार प्रसिद्धी मिळाली. या शाळेत अनेक राष्ट्रांतील मुले शिक्षणासाठी व शिक्षक प्रशिक्षणासाठी येत. राजे, महाराजे, सरदार, मुस्तद्दी व अध्यापक अशी मंडळी युरोप, अमेरिका येथून येऊन त्यांच्या शाळेला भेट देत. त्यांच्या तत्त्वावर मुली, अनाथ मुले, मुकबधीर यांसाठी शाळा सुरू झाल्या. निरीक्षणात्मक पद्धतीत खूप प्रगती झाली व आजच्या प्राथमिक शाळेत दिसणाऱ्या वैशिष्ट्यांचा पाया येथे घातला गेला. व्यवहारात घडणाऱ्या प्रसंगांतून कर्म व नितीतत्त्वे आचरणात आणली जात. वरील शिक्षणातूनच पूरक अशा पेस्टालोत्सी यांनी शिक्षकांच्या प्रशिक्षणाला महत्त्व दिले. येथील शाळेत निरनिराळ्या देशांतील शिक्षक येऊन त्यांच्या पद्धतीचा अभ्यास करीत. आधुनिक प्रशिक्षण पद्धतीत अवलोकन, प्रयोग आणि चर्चा यांना आलेले महत्त्व पेस्टालोत्सीच्या मूळच्या प्रयोगात आहे. यावरून त्यांच्या कल्पनाशक्तीचे व दूरदृष्टीचे दर्शन होते. तेथेच त्यांनी आपल्या शैक्षणिक कल्पना प्रत्यक्षात उतरविल्या. पेस्टालोत्सीच्या व्हर्डून येथील शाळेत पुढे शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध पावलेले फ्रीड्रिख फ्रबेल आणि हर्बर्ट हे प्रशिक्षण घेऊन गेले. त्यांचा सतत वीस वर्षे जिद्द, चिकाटीने अविरत चाललेला हा प्रयोगही बंद पडल्यामुळे ते न्यूहॉफला परतले.
पेस्टालोत्सी यांना अनेक ठिकाणी सुरू केलेल्या शाळा बंद कराव्या लागलेल्या असल्या, तरी त्यांची कारणे प्रामुख्याने राजकीय-सामाजिक होती. त्यामुळे त्यांना मिळणारे आर्थिक साहाय्य कमी पडून शाळा बंद होत; मात्र त्यांच्या शिक्षणपद्धतीचा फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड या देशांप्रमाणेच कॅनडा आणि अमेरिकेतही प्रसार झाला. बालकाचा विकास जन्मापासूनच शिक्षणाने साध्य होतो. शिक्षण सार्वत्रिक व बालकेंद्रित असले पाहीजे. अर्थहीन पाठांतर व शब्दांची पोपटपंची यांमुळे शिक्षणाचा खरा उद्देश सफल होत नाही. त्यासाठी निसर्गाकडे जा, नैसर्गिकपद्धती अनुसरा, व्यक्तीच्या नैसर्गिक गरजा विचारात घेऊन शिक्षणाची पुनर्रचना करा, असे त्यांचे मत होते.
रूसो यांनी एमिल या ग्रंथात बालकेंद्रित शिक्षण कसे असावे, याचे वर्णन केले होते. पेस्टालोत्सी यांचेही विचार रूसो यांच्या विचारांशी जुळते असल्यामुळे त्यांनी हे विचार प्रत्यक्ष शिकविताना उपयोगात आणले. शाळेतील वातावरण आनंदाचे व प्रेमाचे असले पाहिजे, या त्यांच्या विचाराचा ठसा आधुनिक शिक्षणात उमटलेला दिसतो.
अध्यापनाची नवी पद्धत शोधून काढणे हे पेस्टालोत्सीचे ध्येय नसून दलितांचा उद्धार व मानवाचे कल्याण हा त्यांच्या शिक्षणप्रणालीचा हेतू होता. पेस्टालोत्सीच्या शैक्षणिक विचारांना आधुनिक शिक्षणप्रणालीत महत्त्वाचे स्थान आहे. एकोणिसाव्या शतकामध्ये राष्ट्रीय विचारप्रणालीनुसार शाळांची स्थापना करण्यास त्यांची तत्त्वे उपयुक्त ठरली.
पेस्टालोत्सी यांनी पुढील ग्रंथ लिहिले : लिओनार्द अँड गर्ट्रुड (१७८०); हाऊ गर्ट्रूड टीचेस हर चिल्ड्रेन (१८०१); बुच देर मॅटर (१८०३); लेटर्स ऑन इअर्ली एज्युकेशन (१८२७); लेटर्स ऑफ पेस्टालोत्सी ऑन दी एज्युकेशन ऑफ इन्फॅन्सी (१८३०); एडियेरिकल पोरूआ (१९२७); दी एज्युकेशन ऑफ मॅन : ॲफोरिझ्म (१९६९); फर्स्ट इयर टेक्स्टबुक ऑफ प्रायमरी एरिथ्मेटिक इत्यादी.
संदर्भ :
- Brubacher, J. S., History of the problems of Education, New York, 1947.
- Meyer, A., An Educational History of the Western World, New York, 1975.
समीक्षक : केशव भांडारकर