केवळ अनुभवालाच प्रमाण मानणारा वाद. भारतीय संदर्भात अनुभववादाचा विचार केला, तर न्याय-वैशेषिक, सांख्य-योग, अद्वैत, मीमांसादी दर्शनांनी अनुभवाला प्रमाण मानले आहे. मात्र केवळ अनुभवच प्रमाण असतो, ही भूमिका एकट्या चार्वाकांनी घेतली. म्हणून चार्वाकांचे ‘प्रत्यक्षमेव प्रमाणम्, अनुमानं अप्रमाणम्’ हे म्हणणे विचारात घेऊन फक्त त्यांनाच अनुभववादी म्हटले जाते.

चार्वाकांनी कठोर व सौम्य असा दोन्ही प्रकारांचा अनुभववाद मांडलेला दिसतो. कठोर अनुभववाद्यांना प्रत्यक्षाखेरीज इतर कोणतेही प्रमाण मान्य नसते, तर सौम्य अनुभववादी व्यवहाराला धरून लोकप्रसिद्ध अनुमान स्वीकारतात व तत्त्वत: प्रचितीक्षम अशा अनुमानास त्यांची ना नसते.

न्यायमंजरीत जयंतभट्टाने अनुमानांचे दोन गटात वर्गीकरण केले आहे – उत्पन्नप्रतीती व उत्पाद्यप्रतीती. उत्पन्नप्रतीती अनुमान हे अनुभवनिष्ठ असते, म्हणून ते स्वीकारण्यास सौम्य अनुभववादी राजी असतात (मात्र ईश्वराविषयीचे व परलोकाविषयीचे उत्पाद्यप्रतीती अनुमान ते संपूर्णत: नाकारतात). त्याचप्रमाणे पुरंदराने म्हटल्याप्रमाणे लोकप्रसिद्ध अनुमान ते स्वीकारतात; मात्र लौकिकाला सोडून केलेले अनुमान नाकारतात.

अर्थात, अनुमानाचे प्रामाण्य नाकारले, तरी उपयुक्तता स्वीकारार्ह मानता येईल. एकंदरीत, प्रत्यक्ष प्रमाणवादी चार्वाकांची अनुभववादाची मांडणी करणारी सुत्रे किंवा साहित्य अपवादात्मक असले, तरी चार्वाक दर्शनाच्या प्राचीन व अर्वाचीन मांडणीतून त्यांचा अनुभववाद स्पष्ट होतो. अनुभववादातून ‘चतुर्भूतात्मकं जगत्’ मानणारा जडवाद, स्वभाववाद व उपभोगवाद ओघाने येतो.

आक्षेप : चार्वाकांच्या अनुभववादावर घेतलेले आक्षेप पुढीलप्रमाणे आहेत :

चार्वाक परगावी गेल्यावर त्याची पत्नी विधवा होते काय? असा परखड सवाल टीकाकारांनी विचारलेला आढळतो. प्रत्येक वेळी ‘बाप दाखव, नाहीतर श्राद्ध कर’ अशी रोखठोक भूमिका घेऊन चालत नाही. कठोर अनुभववाद म्हणूनच समाधानकारक वाटत नाही. लोकप्रसिद्ध अनुमान स्वीकारणे कसे आवश्यक आहे, हे स्पष्ट केले जाते. म्हणजेच पर्यायाने सौम्य अनुभववादाचा पुरस्कार केला जातो.

कठोर अनुभववादाऐवजी सौम्य अनुभववाद स्वीकारण्याचे आणखी एक कारण म्हणजे इंद्रियांना असणाऱ्या मूलभूत मर्यादा. इंद्रियांची शक्ती मर्यादित असते. अती दूरचे किंवा झाकलेले किंवा सूक्ष्म पदार्थांचे ज्ञान इंद्रियांमार्फत होत नाही. थोडक्यात, इंद्रियांमार्फत मिळालेले ज्ञान अपुरे व फसवे असू शकते. भ्रामक होत नाही. सांख्यकारिकेत म्हटल्याप्रमाणे अतिशय दूर असल्याने, अती जवळ असल्याने, इंद्रिय दोषाने, मन स्थिर नसल्याने, सूक्ष्मत्वामुळे, अडथळ्यांमुळे किंवा सदृश्य पदार्थांत मिसळल्याने वस्तू अस्तित्वात असूनही तिचा अनुभव कधीकधी येत नाही. थोडक्यात, इंद्रियांमार्फत मिळालेले ज्ञान अपुरे व फसवे असू शकते. भ्रामक अनुभव इंद्रियांद्वारा येतो. अनुभव इंद्रियांद्वारा येतो व इंद्रियानुभव अयथार्थ ठरतो, मात्र ह्या आक्षेपाचे निराकरण करून सौम्य अनुभववाद अबाधित राखता येतो.

निराकरण : जरी इंद्रियांच्या मर्यादामुळे अनुभव यथार्थ नसला, तरी हे लक्षात येते, ते इंद्रियांमुळेच. शिवाय अशा मर्यादित व भ्रामक अनुभवातील अयथार्थता जाणून यथार्थज्ञान प्राप्त होते, ते इंद्रियानुभवामुळेच. त्यामुळे प्रत्यक्ष प्रमाणाने जरी नेहमीच यर्थाथ ज्ञान मिळत नसले, तरी ही बाब लक्षात येते, ती प्रत्यक्षानुभवानेच. सुधारता येते तीही प्रत्यक्षानुभवानेच. त्यामुळे अशा आक्षेपांमुळे उलट अनुभववादास बळकटी येते व चार्वाकांच्या अनुभववादाचे समर्थन सहज शक्य होते.

संदर्भ :

  • Gokhale, Pradeep, Lokayat/Carvaka : A Philosophical Enquiry, New Delhi, 2015.
  •  Mittal, K. K. Materialism in India Thought, New Delhi, 1974.
  •  Shastri, Dakshinaranjan, A Short History of Indian Materialism, Sensationalism and Hedonism, Calcutta, 1930.
  •  आठवले, सदाशिव, चार्वाक इतिहास आणि तत्त्वज्ञान, वाई, १९८०.
  •  कुमठेकर, उदय, चार्वाकमंथन, पुणे, २००१.
  •  गोखले, प्रदीप, चार्वाकवाद व अद्वैतवाद, पुणे, १९८१.
  •  गोखले, प्रदीप, तत्त्वचिंतक चार्वाक, मुंबई, २०१३.
  •  चट्टोपाध्याय, देवाप्रसाद, चार्वाक/लोकायत, नवी दिल्ली, १९९०.
  •  साळुंखे, आ. ह. आस्तिकशिरोमणी चार्वाक, पुणे १९९२.

समीक्षक – मीनल कातरणीकर

प्रतिक्रिया व्यक्त करा