ॲबे फारिया : (३१ मे १७५६ – २० सप्टेंबर १८१९). प्रसिद्ध ख्रिस्ती धर्मोपदेशक व संमोहनशास्त्राचा अभ्यासक. पूर्ण नाव जोसे कस्टोडिओ दि फारिया. धर्मोपदेशक झाल्यानंतर ‘ॲबे फारियाʼ या नावाने परिचित. त्याचा जन्म उत्तर गोव्यातील बारदेश प्रांतातील कांडोलीम या गावी झाला. बारदेश प्रांतातीलच कोलवाळे गावचे कैतानो व्हितोरिनो दि फारिया हे त्याचे वडील आणि रोझा मारिया डिसूझा ही त्याची आई होती. या दोघांनी कातारिना नावाची एक मुलगीही दत्तक घेतली होती. अनंत शेणवी नावाच्या ख्रिश्चनधर्म स्वीकारलेल्या एका गौडसारस्वत ब्राह्मणाचे कैतानो हे वंशज होते. ते अगोदर पाद्री असून नंतर गृहस्थाश्रमी झाले. जोसेच्या जन्मानंतर सात ते आठ वर्षांनी ॲबे फारियाच्या आईवडिलांनी परस्परसंमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याची आई रोझा मारिया ही जुन्या गोव्यातील सेंट मोनिका कॉन्व्हेंट येथे नन म्हणून रुजू झाली. कालांतराने ती मठाधिपतीच्या पदापर्यंत पोहोचली, तर कैतानो यांनी धर्मशिक्षणासाठी पाठशाळेत (सेमिनरी) पुन्हा प्रवेश घेतला.
ॲबे फारिया पंधरा वर्षांचा असताना पुढील धार्मिक शिक्षणासाठी कैतानोंनी त्याच्यासह पोर्तुगालला जाण्याचा निर्णय घेतला (१७७१). त्याच वर्षी २१ फेब्रुवारी रोजी सेंट जोसे नावाच्या जहाजावरून नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ समुद्रप्रवासानंतर २३ नोव्हेंबर रोजी ते पोर्तुगालमधील लिस्बनला पोहोचले. तेथील पोपच्या प्रतिनिधीकडून रोमला जाण्यासाठी आवश्यक ती पत्रे मिळवल्यावर पितापुत्र रोमच्या दिशेने निघाले (१७७२). रोमला जाण्यामागचा कैतानो यांचा उद्देश तेथील कॅथलिकपंथीय धर्मशिक्षण घेऊन त्यात ‘डॉक्टरʼ ही सर्वोच्च पदवी मिळवणे हा होता. काही काळाने कैतानोंना ती पदवी मिळाली आणि ॲबे फारियाला रोममध्ये ठेवून ते लिस्बनला परतले (१७७७). तेथे हळूहळू त्यांचे राजघराणे व धर्मसत्तेतील वजन वाढू लागले. पुढे ॲबे फारियाने रोममध्ये धर्मशिक्षणात डॉक्टरेट मिळवली (१७८०). त्याचा प्रबंध त्याने पोर्तुगीज राजघराण्याला अर्पण केला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर तोही लिस्बनला परतला. लिस्बनमधील अनेक उच्चपदस्थ धर्मोपदेशक, राजपरिवार इत्यादींच्या उपस्थितीत जोसेचे एक प्रवचन आयोजित करण्यात आले होते, ते त्याने अस्खलितपणे दिले.
पुढे कैतानोंनी त्यांची किंवा त्यांच्या मित्रांची नेमणूक भारतातल्या एखाद्या चर्चमध्ये बिशपपदी होण्याकरिता प्रयत्न करूनही ती होऊ शकली नाही. तत्कालीन पोर्तुगीजांच्या वंशवादी धोरणामुळे या पदावर आणि एकूणच सरकार दरबारी भारतीय आणि मिश्रवंशीय लोकांची नेमणूक होत नसे. तत्कालीन भारतात असे मिश्रवंशीय पाद्री सु. तीन हजार होते. याविरुद्ध कैतानो-ॲबे फारिया हे पितापुत्र आणि इतर पाद्र्यांनी १७८७ मध्ये गोव्यातल्या आपल्या मित्रांना बंड करण्यास उद्युक्त केले. कैतानो-ॲबे फारिया यांचा खंदा समर्थक असलेल्या इग्नाशिओ पिंटो या वजनदार असामीच्या नावावरून यालाच ‘पिंटोंचे कारस्थानʼ असेही म्हणतात. याचा सुगावा लागताच पोर्तुगीजांनी ते बंड मोडून काढले. पोर्तुगालमध्ये हे समजल्यावर कैतानोंना तुरुंगात डांबले गेले. त्यानंतर ॲबे फारिया फ्रान्सला निसटला (१७८८).
ॲबे फारिया पुढे पॅरिसमध्ये राहू लागला (१७८८). तेव्हा फ्रेंच राज्यक्रांती सुरू होती. फ्रेंच राजसत्ता उलथल्यानंतर फ्रेंच कन्व्हेन्शन नामक प्रजासत्ताक शासन १७९२ मध्ये स्थापन करण्यात आले. त्यांच्या कार्यकाळातील एकूण सामाजिक तरतुदींना जनतेकडून पाठिंबा मिळूनही कट्टर कॅथलिकविरोधी धोरणांमुळे फ्रान्समधील अनेक कॅथलिकपंथीय त्याविरुद्ध असंतुष्ट होते. त्यांनी व राजसत्तेच्या समर्थकांनी १७९५ फ्रेंच कन्व्हेन्शनविरुद्ध उठावही केला. या उठावात ॲबे फारियानेही कन्व्हेन्शनविरोधी सैन्याच्या काही तुकड्यांचे नेतृत्व केले होते. यानंतर १७९७ मध्ये मार्सेमध्ये त्याला अज्ञात कारणांसाठी अटक झाली. बराच काळ तुरुंगवास भोगल्यानंतर त्याची मुक्तता करण्यात आली. याच काळात त्याने संमोहनविद्येचा अभ्यास सुरू केला.
ॲबे फारिया मार्से येथेच तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून एक वर्षभर होता. १८१२ मध्ये त्याची निम्स येथील अकादेमीमध्ये प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. मार्सेमधील नोकरीपेक्षा निम्समधील पद कमी दर्जाचे असल्याने ॲबे फारियाने तेथील नोकरी सोडून पुन्हा पॅरिसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्याने पॅरिसमध्ये संमोहनविद्येची शिबिरे घेणे सुरू केले (१८९३). बहुतांशी उच्चकुलीन स्त्रिया व त्यांखेरीज काही खरेखुरे गरजूही येत. ॲबे फारियाच्या संमोहनविद्येचा सगळा भर सूचना देण्यावर होता. त्याच्याआधीचा पॅरिसमधील प्रख्यात संमोहनशास्त्रज्ञ फ्रान्झ मेस्मर याच्या मते, संमोहन हे ‘ॲनिमल मॅग्नेटिझम’ नावाच्या चराचरातल्या अज्ञात शक्तीमुळे शक्य होते. ॲबे फारियाने हा सिद्धांत पूर्णपणे नाकारून सूचना देण्याच्या ताकदीवर सगळा भर दिला.
ॲबे फारियाला प्रसिद्धी मिळाली असली तरी त्याला काही शत्रूही तयार झाले होते. त्याचे संमोहनविद्येतले प्रयोग ही फसवेगिरी असून स्वत: फारिया हा मोठा भोंदू असल्याचा प्रचार अनेकांनी चालवला. यांत सर्वांत प्रभावी व्हिक्टर जूय हा लेखक होता. गॅझेट डी फ्रान्स नावाच्या तत्कालीन वर्तमानपत्रात त्याने टोपणनावाने ॲबे फारियाची टर उडवणारे बरेच लिखाण केले. उत्तरादाखल फारियाने कधीही वर्तमानपत्रांत स्वत:चे म्हणणे न मांडल्याने त्याची बाजू लोकांसमोर आली नाही. बरीच टीका होऊनही फारियाची संमोहनसत्रे १८१६ पर्यंत चालू राहिली. त्या वर्षी पोतिर नावाचा एक नट त्याच्याकडे जाऊन त्याने संमोहनाखाली गेल्याचे नाटक केले व थोड्या वेळाने जागा होऊन त्याची टर उडवली. फारियाच्या शत्रूंनी याचे यथेच्छ भांडवल केले. त्याची थट्टा करणारे एक नाटकही पॅरिसमध्ये सादर करण्यात आले. त्याचा ॲबे फारियावर प्रतिकूल परिणाम होऊन त्याला अखेरीस आपले संमोहनविद्येचे प्रयोग बंद करणे भाग पडले. एका लहानशा कॉन्व्हेंटमध्ये तो प्रार्थना सांगण्याच्या कामावर लागला. हा त्याच्यासाठी मोठाच धक्का असूनही डगमगून न जाता त्याने स्वत:चे संमोहनविद्येतले सिद्धांत नीट स्पष्ट करून सांगणारे एक पुस्तक फ्रेंचमध्ये लिहिले. या पुस्तकाचे प्रकाशन होण्याआधीच २० सप्टेंबर १८१९ रोजी तो मरण पावला. पॅरिसमधील मोन्ते मार्त्र स्मशानभूमीत त्याला दफन करण्यात आले. ॲबे फारियाचे संमोहनशास्त्रावरचे पुस्तक १९०६ साली प्रकाशित करण्यात आले. पुढे त्याचा इंग्रजी अनुवादही झाला. त्याचे संमोहनाबद्दलचे बहुतेक सिद्धांत आधुनिक विज्ञानाने स्वीकारलेले आहेत.
अलेक्सांडर ड्युमा याच्या द काउंट ऑफ माँटे क्रिस्टो या प्रसिद्ध कादंबरीतील ॲबे फारिया हे पात्र प्रत्यक्षातील ॲबे फारियावरच आधारित आहे. याखेरीज गोवा व पोर्तुगालमध्ये अनुक्रमे त्याचा पुतळा व त्याचे नाव दिलेला रस्ताही आहे.
संदर्भ :
- Dalgado, D. G. Memoir sur la vie de Abbe Faria, Explication de la charmante legend du chateau d’If dans le Roman Monte-Christo, Published by Henri Jouve, Paris, France, 1906.
- Perry C. ‘The Abbé Faria: A Neglected Figure in the History of Hypnosisʼ, Hypnosis at its bicentennial, pp.37-45, Springer, Boston, Massachusetts, USA, 1978.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर