जॅक्सन, फ्रेड्रिक जॉर्ज (Jackson, Frederick George) : (६ मार्च १८६० – १३ मार्च १९३८). आर्क्टिक प्रदेशाचे समन्वेषण करणारे ब्रिटिश समन्वेषक. त्यांचा जन्म इंग्लंडमधील अ‍ॅल्स्टर लॉज येथे झाला. त्यांनी आपले शिक्षण एडिंबर्ग विद्यापीठाच्या डेनस्टोन महाविद्यालयात घेतले. इ. स. १८८६-८७ मध्ये त्यांनी देवमाशांच्या शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या जहाजांच्या साहाय्याने आर्क्टिक महासागरातून पहिली सफर केली. इ. स. १८९३ मध्ये त्यांनी स्लेज गाडीने सायबीरियातील गोठलेल्या टंड्रा प्रदेशातून ओबपासून ते पेचोरापर्यंतचा सुमारे ४,८०० किमी.चा प्रवास केला. इ. स. १८९४ – १८९७ मधील जॅक्सन-हार्म्सवर्थ या आर्क्टिक मोहिमेचे नेतृत्व जॅक्सन यांच्याकडे होते. या सफरीत त्यांनी ‘फ्रान्त्स जोझफ लँड’ या आर्क्टिक महासागरातील रशियन द्वीपसमूहाचे समन्वेषण केले. फ्रान्त्स जोझफ हे खंड नसून द्वीपसमूह असल्याचे त्यांनी दाखवून दिले. तत्पूर्वी ते सलग खंड असावे, असे मानले जाई. या सफरीदरम्यान इ. स. १८९६ मध्ये फ्रिट्यॉफ नॅन्त्सन आणि एफ. एच. योहानसन हे नॉर्वेजियन समन्वेषक उत्तर ध्रुवाकडील सफरीवरून परत येत असताना जॅक्सन यांना भेटले. ते दोघे तीन वर्षे चुकलेल्या अवस्थेत होते. तसेच या कालावधीत त्यांचा कोणाशीही कोणताही संपर्क नव्हता. सध्या आपण फ्रँझ जोसेफ लँड या प्रदेशावर असल्याचे जॅक्सन यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. जॅक्सन यांच्या मदतीमुळे ते दोघे नॉर्वेजियन समन्वेषक आपल्या घरी परतू शकले. जॅक्सन यांना त्यांच्या समन्वेषणाच्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल ‘डॅनिश रॉयल ऑर्डर ऑफ सेंट ओलाव्ह’ हा पहिल्या दर्जाचा किताब देऊन गौरविण्यात आले (इ. स. १८९८). तसेच इ. स. १८९९ मध्ये पॅरिस जिऑग्रफिकल सोसायटीने सुवर्णपदक देऊन त्यांचा गौरव केला.

जॅक्सन हे नंतरच्या काळात आफ्रिकेतील प्रवासासाठी प्रसिद्धीस आले. बोअर युद्धकाळात त्यांनी दक्षिण आफ्रिकेत कर्तव्य बजावले. त्यामुळे त्यांना कॅप्टनपद मिळाले. ऑस्ट्रेलियातील वाळवंटी प्रदेशातूनही त्यांनी प्रवास केला. जॅक्सन यांनी आपल्या प्रवासाचा वृत्तांत दी ग्रेट फ्रोझन लँड (इ. स. १८९५) आणि ए थाउजंड डेज इन दी आर्क्टिक (इ. स. १८९९) या पुस्तकांमधून प्रकाशित केला.

जॅक्सन यांचे लंडन येथे निधन झाले.

समीक्षक : वसंत चौधरी