जीवनसत्त्व ई याचे रासायनिक नाव टोकोफेरॉल (Tocopherol) असे आहे. हे मेदविद्राव्य असून ऑक्सिडीकरण विरोधक गुणधर्माचे आहे. याची आठ मेदविद्राव्य संयुगे निसर्गत: आढळतात. त्यापैकी ४ टोकोफेरॉल व ४ टोकोट्रायईनॉल (Tocotrienols) आहेत. ही दोन्ही प्रकारची संयुगे अल्फा (α), बीटा (β), गॅमा (γ) व डेल्टा (δ) या संरचनेच्या स्वरूपात आढळतात. संयुगांमधील क्रोमॅनॉल वलयी शृंखलेमध्ये (Chromanol ring) असणाऱ्या मिथिल गटाच्या संख्येवरून आणि त्यांच्या स्थानांवरून हे प्रकार ठरवले जातात.
१९२२ मध्ये हर्बर्ट एवेन्झ (Herbert Evans) आणि कॅथरिन बिशप (Katharine Bishop) यांनी ई जीवनसत्त्वाचा शोध लावला. त्यांनी या जीवनसत्त्वाला ‘ॲन्टीस्टरिरिलिटी फॅक्टर X’ (Antisterility factor) असे नाव दिले. कारण वंध्यत्त्व दूर करण्याचे मुख्य कार्य या जीवनसत्त्वामुळे होते. शरीरामधील चयापचय प्रक्रियांमध्ये तयार होणाऱ्या मुक्त मूलकांना (Free radicals) हायड्रोजन अणू देण्याचे कार्य हे टोकोफेरॉल करतात. म्हणजेच त्यांचे क्षपण करतात. त्यामुळे यांचे कार्य ऑक्सिडीकरण विरोधक (Antioxidants) असते. प्रजननक्षमता विकसित करण्यासाठी तसेच वृषण आणि अंडाशयाच्या योग्य विकासासाठी आणि त्यांच्या सुरळीत कार्यांसाठी या जीवनसत्त्वाची आवश्यकता असते.
क्रोमेनच्या दुहेरी वलयामधील हायड्रॉक्सिल गट पेशीतील हायड्रोजन मुक्त मूलकांचे क्षपण करत राहतो. हा घटक जलद्वेषी (Hydrophobic) शृंखलेच्या साहाय्याने पेशी पटलामधून जाऊ शकतो. टोकोफेरॉलमधील हायड्रोकार्बन शृंखला संतृप्त प्रकारची असते. टोकोट्रायईनॉलमधील शृंखलांमध्ये ३ दुहेरी बंध असून ते असंतृप्त प्रकारचे आहेत. आहारात उपलब्ध असणारे ई जीवनसत्त्व हे मोठ्या प्रमाणात गॅमा टोकोफेरॉल या स्वरूपात असते, मात्र अल्फा टोकोफेरॉल या स्वरूपात असणारे ई जीवनसत्त्वच अधिक परिणामकारक असल्याचे आढळले आहे.
प्रौढ व्यक्तींसाठी दररोज सुमारे १५-२० मिलिग्रॅम (मिग्रॅ.), तर लहान मुलांना प्रतिदिनी १५-१७ मिग्रॅ. एवढे ई जीवनसत्त्व आवश्यक असते. दररोज ३०० मिग्रॅ.पेक्षा अधिक ई जीवनसत्त्वाचे सेवन हे युरोपियन तज्ञांनी धोकादायक ठरवले आहे.
वनस्पतिजन्य स्रोत : प्रती १०० ग्रॅ. वनस्पतिजन्य पदार्थांमध्ये पुढीलप्रमाणे जीवनसत्त्व ई असते — गव्हांकुर तेल – १५० मिग्रॅ., मोहरी तेल – ४४ मिग्रॅ., सूर्यफूल तेल – ४१ मिग्रॅ., करडई तेल – ३४ मिग्रॅ., बदाम – २६ मिग्रॅ. तसेच अवकाडो, किवी, पपई, खोबरेल तेल, ऑलिव्ह तेल, पालक, ढोबळी मिरची, ब्रोकोली, शेंगदाणे, मका, पिस्ता, अक्रोड इत्यादी पदार्थांमधूनही ई जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर मिळते.
प्राणिजन्य स्रोत : प्राणिजन्य अन्न स्रोतांमध्ये मात्र ई जीवनसत्त्व कमी प्रमाणात आढळते. उदा., मासे १ – २.८ मिग्रॅ., शिंपले १.७ मिग्रॅ., लोणी १.६ मिग्रॅ., अंडी १.१ मिग्रॅ.
ई जीवनसत्त्व कमतरता : मानवामध्ये ई जीवनसत्त्वाची कमतरता सहसा जाणवत नाही. कारण विविध प्रकारच्या अन्नातून हे जीवनसत्त्व मिळत राहते. परंतु, टोकोफेरॉलच्या चयापचय क्रियेमध्ये जनुकीय दोष उद्भवले किंवा ई जीवनसत्त्वाच्या शोषण क्रियेत बाधा आली, तरच ई या जीवनसत्त्वाची कमतरता जाणवते. ई जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे चेतावेगांचे वहन मंदावते. शरीरातील अवयवांमध्ये परस्पर समन्वयाचा अभाव जाणवतो. स्नायूंची, दृष्टीपटलाची कार्यक्षमता कमी होते, शुक्राणू निर्मिती होत नाही तसेच वंध्यत्त्व येते.
ई जीवनसत्त्व आधिक्य : अनेक प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये असलेल्या ई जीवनसत्त्वाच्या अधिक प्रमाणामुळे संपर्क त्वचारोग (Contact dermatitis) होतो. तसेच ई जीवनसत्त्वाच्या अधिक सेवनामुळे रक्तस्राव होण्याचे प्रमाण वाढते.
ई जीवनसत्त्वाच्या नियमित सेवनाने हृदयविकार, काही कर्करोग, दृष्टिदोष, विस्मरण अशा विकृती आटोक्यात राहतात व प्रतिकारक्षमता सुधारते.
पहा : जीवनसत्त्वे, जीवनसत्त्व ई (पूर्वप्रकाशित).
संदर्भ :
- https://www.livescience.com/51543-vitamin-e.html
- https://ods.od.nih.gov/factsheets/VitaminE-HealthProfessional/
समीक्षक : नंदिनी देशमुख