जेम्स अलेक्झांडर मिर्लीझ : (५ जुलै १९६३). स्कॉटीश अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे सहमानकरी. मिर्लीझ यांना आर्थिक प्रेरणा प्रणाली/सिद्धांत विकसित केल्याबद्दल १९९६ मध्ये अर्थतज्ज्ञ विल्यम स्पेन्सर व्हिक्रेय (William Spencer Vickrey) यांच्याबरोबरीने अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार प्राप्त झाला.

मिर्लीझ यांचा जन्म स्कॉटलंडमधील मिन्नीगॅफ (कुरकुडब्राइटशर) येथे झाला. १९४१ – १९५४ या काळाच त्यांचे उच्च माध्यमिकपर्यंतचे शिक्षण न्यूटोन स्टेवॉर्ट येथील प्राथमिक शाळा व डग्लस एवॉर्ट हायस्कूल येथे झाले. १९५४ – १९५७ या काळात एडिंबर्ग विद्यापीठ येथून त्यांनी गणित व नॅचरल फिलासॉफी या विषयांतील एम. ए. ही पदवी संपादन केली. पुढे १९६३ मध्ये ट्रिनिटी कॉलेज केंब्रिज येथून ‘Optimum Planing For a Dynamic Economicʼ या विषयावर प्रबंध सादर करून त्यांनी पीएच. डी. पदवी प्राप्त केली. केंब्रिज येथे शिकत असताना ते अतिशय बुद्धिमान व क्रियाशील विद्यार्थीवक्ता म्हणून प्रसिद्ध होते. भारतीय अर्थतज्ज्ञ व नोबेल विजेते अमर्त्य सेन (Amartya Sen) यांचा सहाध्यायी असताना ‘केंब्रिज अपोस्टलेसʼ या वादविवाद मंडळाचा ते सदस्य होते.

मिर्लीझ यांनी १९६२-६३ मध्ये नवी दिल्ली येथील M. I. T. Center For International Studies या संस्थेत सल्लागार म्हणून काम केले. त्यानंतर १९६३ – १९६८ या काळात ते केंब्रिज विद्यापीठात अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. याच काळात त्यांनी कराची येथील Pakistan Institute Of Development Economics या संस्थेचा सल्लागार म्हणूनही काम केले. १९६८ – १९९५ या काळात ते ऑक्सफर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र विषयाचा प्राध्यापक होते. त्यानंतर केंब्रिज विद्यापीठात पुन्हा रुजू होऊन त्यांनी राजकीय अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन केले. बर्कली, येल व एम. आय. टी. अशा विद्यापीठात ते अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम करीत. १९९८ मध्ये त्यांना सर किताबाने सन्मानित करण्यात आले.

मिर्लीझ यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात कार्यरत असताना आर्थिक प्रणाली (Economics Models) या विषयावर अनेक शोधनिबंध प्रसिद्ध केले. हेच संशोधनकार्य त्यांना नोबेल पारितोषिक मिळण्यास कारणीभूत ठरले. जेव्हा वित्तीय बाजारपेठासंबंधी अपूर्ण किंवा असममित (Asymmetrical) माहिती उपलब्ध असते, तेव्हा अर्थव्यवस्थेतील बचतीचा दर इष्टतम (Optimum) राहावा यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या परिस्थितीचा त्यांनी अभ्यास केला. विल्यम व्हिक्रेय यांच्या ग्रंथातील नैतिक जोखीम/संकट (Hazard) व पर्याप्त करप्रणाली ही दोन्ही तत्त्वे त्यांनी अधिक स्पष्ट केली. नैतिक संकट याचा अर्थ असा की, जेव्हा दुसऱ्या व्यक्ती जोखीम पत्करण्यास तयार असतात, तेव्हाच विशिष्ट व्यक्ती जादा जोखीम पत्करण्याची तयारी दर्शविते. जेव्हा व्यक्तीच्या कृतीमुळे तसेच असममित माहितीमुळे वित्तीय व्यवहारात बदल घडून येतात, तेव्हा परिस्थितीही बदलते व नैतिक संकटे उद्भवतात. त्यांनी १९७१ मध्ये अमेरिकन अर्थतज्ज्ञ पिटर ए. डायमंड (Peter A. Diamond) यांच्या सहकार्याने डायमंड-मिर्लीझ इफिशियन्सी थेरम विकसित केला.

मिर्लीझ यांचे सर्वांत महत्त्वाचे योगदान म्हणजे, पर्याप्त आयकर रचना व पुरोगामी करप्रणालीची नावीन्यपूर्ण मांडणी. व्यक्तींनी अधिक उत्पन्न मिळवावे यासाठी प्रेरणा देणारी करप्रणाली त्यांनी प्रस्थापित केली. त्यांच्या पुरोगामी विचारसरणीमुळे १९६० – १९७० या दशकांत ब्रिटनमध्ये आर्थिक कर आकारात व मध्यवर्ती केंद्रित अर्थव्यवस्थेच्या काळात ब्रिटिश लेबर पार्टीने त्यांची सल्लागारपदी नियुक्ती केली. शासनाने श्रीमंतांवर अधिक कर आकारणी करून उपलब्ध निधी गरिबांसाठी खर्च करावा, असा त्यांचा आग्रह होता; तथापि कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला वीस टक्क्यांपेक्षा जास्त सीमांत कर भरावा लागू नये, अशी सूचनाही त्यांनी केली. तथापि, शासनाने जादा उत्पन्नगटावर सीमांत करआकारणी केल्यास त्यांना उत्पादकता तसेच कार्यक्षमता दाखविण्यासाठी योग्य ती प्रेरणा मिळणार नाही व आर्थिक समानता व कार्यक्षमता यांचा मेळ घालणे कठीण होईल. सेवनकार्यावरील कर आकारणीबाबतही त्यांनी काम केले. पीटर ए. डायमंड यांच्या बरोबर संशोधन करीत असताना छोट्या देशांनी विदेशी व्यापारावर जकात लावू नये, उत्पादनावर नव्हे तर सेवनखर्चावर कर आकारणी करावी, अशी शिफारस त्यांनी केली. अधिक व्यवहारवादी भूमिकेतून करप्रणालीची काटेकोरपणे चिकित्सा होणे आवश्यक होते; परंतु आपणाकडून ते होऊ शकले नाही, ही खंतही त्यांनी व्यक्त केली.

मिर्लीझ यांचे स्वत: व सहलेखक म्हणून लिहिलेले ग्रंथ पुढीलप्रमाणे : ए न्यू मॉडेल ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ (१९६२ – सहलेखक), सोशल कॉस्ट बेनिफिट ॲनॅलिसिस (१९६९ – सहलेखक), प्रोजेक्ट ॲप्रेजल ॲण्ड प्लॅनिंग फॉर डेव्हलपिंग कंट्रीज (१९७४ – सहलेखक), इकॉनॉमिक पॉलिसी ॲण्ड नॉनरॅशनल बिहेविअर (१९८७), वेल्फेअर, इन्सेंटिव्ह्ज ॲण्ड टॅक्सेशन (२००६), डायमेंशन्स ऑफ टॅक्स डिझाइन : दि मिर्लीझ रिव्ह्यू (२०१०), टॅक्स बाय झाइन (२०११). शिवाय त्यांचे २३० पेक्षा जास्त संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत.

मिर्लीझ यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराव्यतिरिक्त त्यांच्या अर्थशास्त्रातील योगदानाबद्दल पुढील सन्मान लाभले : रॉयल इकॉनॉमिक सोसायटी – अध्यक्ष (१९८९ – १९९२), ब्रिटिश अकॅडमी व रॉयल सोसायटी  ऑफ एडिंबर्ग – छात्रवृत्ती, इकॉनॉमेट्रिक सोसायटीच – सदस्य, फॉरेन ऑनररी मेंबर ऑफ यूएस नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस पुरस्कार (१९९६).

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा