बंदोपाध्याय, बिभूतिभूषण : (१२ सप्टेंबर १८९९–१ सप्टेंबर १९५०). जागतिक ख्यातीचे बंगाली कांदबरीकार. चोवीस परगणा जिल्ह्यातील मुरारिपूर गावी जन्म. बनग्राम हायस्कूलमधून १९१४ साली ते शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले व कलकत्त्याच्या रिपन कॉलेजमधून १९१८ साली बी. ए. झाले. हुगळी जिल्ह्यातील जांगिपाडा गावच्या शाळेत प्रथम शिक्षक म्हणून लागले. त्यानंतर सोनारपूर हरिनाभि स्कूल, कलकत्त्याचे खेलात्चंद्र मेमोरियल स्कूल व शेवटी बरॅकपूरजवळील गोपालनगर हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. मध्यतरी भागलपूरच्या खेलात् घोष इस्टेटचे उप-तालुकाधिकारी म्हणून काही काळ त्यांनी काम केले.

या इस्टेटचे काम बघत असताना भागलपूरला लिहिलेली पथेर पाँचाली (१९२९) हीच बिभूतिभूषण यांची प्रथम कादंबरी होय. याशिवाय कथा, कादंबऱ्या, शिशुसाहित्य इ. प्रकारांतील त्यांचे पन्नासाहून अधिक ग्रंथ प्रकाशित आहेत. यांपैकी मेघमल्लार (१९३१), मौरीफूल (१९३२), जात्राबदल (१९३४), ताल नवमी (१९४४) हे कथासंग्रह आणि अपराजित (१९३१), दृष्टीप्रदीप (१९३५), आरण्यक (१९३८), आदर्श हिंदू हॉटेल (१९४०), देवयान (१९४४), केदार राजा (१९४५), इछामती (१९४९) या कादंबऱ्या विशेष महत्त्वाच्या आहेत. वंगदेशाच्या मातीत रूजलेला चौफेर अनुभव व तितकीच स्वाभाविक सहजसुंदर भाषाशैली या गुणांच्या संगमामुळे विभूतिभूषणांचे साहित्य वाचकाला मोहून टाकते. पथेर पाँचाली, अपराजितआरण्यक या तीन कादंबऱ्या त्यांच्या सर्वश्रेष्ठ कलाकृती होत. विशेषतः पथेर पाँचाली  या कादंबरीवर सत्यजित रे यांनी चित्रपट काढल्यामुळे ही कादंबरी विश्वविख्यात झाली. इछामती  कादंबरीला लेखकाला मृत्यूनंतर रवीद्र पुरस्कार लाभला.

बिभूतिभूषण हे जातिवंत कविप्रवृत्तीचे निसर्गप्रेमी लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. निसर्गसौंदर्याची व विराटतेची नसन् नस त्यांच्या साहित्यात मोकळी झालेली दिसते. तसेच पुनर्जन्म आणि आत्म्याची अमरता या हिंदू धर्मातील गृढतत्त्वांवर त्यांचा विश्वास होता. सौंदर्यपिपासू वृत्ती व आध्यात्मिक गूढवाद यांचे सुंदर मिश्रण त्यांच्या लेखनात आढळते. व त्यामुळे लेखक अनेकदा आपल्याला आपल्या दैनंदिन सुखःदुखाच्या प्रश्नांमधून एका विलक्षण चिंतनाच्या अमर्याद प्रदेशात घेऊन जातो. दीन-दारिद्री ग्रामीण जीवनावरच प्रामुख्याने लिहिणाऱ्या बिभूतिभूषणांनी या देशातील रासवट सौंदर्य व तितकीच खोल रूजलेली गहन आध्यात्मिकता यांची सांगड घालण्यात यश मिळविले आहे. मानवी जीवनातील आदिम प्रवृत्ती व अंतिम श्रेय यांचे इतके सखोल चिंतन बिभूतीभूषण सादर करतात, की त्यांच्या कथावस्तूला एकाच वेळी भूत-वर्तमान भविष्य या तिन्ही काळांची विशाल परिमाणे लाभून जातात आणि हे सारे इतक्या सहज सुलभ पध्दतीने व्यक्त होते, की अनेकदा लेखकाचे यामागचे कर्तृत्व व कष्ट अजिबात जाणवू नयेत. बिभूतिभूषण यांच्या पथेर पाँचालीचा इंग्रजीत तारापद मुखर्जी व टी. डब्ल्यू. क्लार्क यांनी साँग ऑफ द रोड (१९६८) हिंदीत मन्मथनाथ गुप्ता यांनी पथेर पाँचाली (१९५७) नावाने तसेच तेलुगू, गुजराती, मलयाळम्, तमिळ इ. भारतीय भाषांतही तिचे अनुवाद झाले आहेत. त्यांच्या आरण्यक  कादंबरीचाही हिंदीत हंसकुमार तिवारी यांनी (१९५७) आणि मराठीत शं. बा. शास्त्री यांनी (१९६४) आरण्यक  याच नावाने अनुवाद केला आहे. शिवाय गुजराती, मळयाळम्, पंजाबी इ. भाषांतही तिचे अनुवाद झाले आहेत. याशिवाय त्यांच्या इतरही काही कादंबऱ्यांचे हिंदी, तेलुगू, गुजराती इ. भाषात अनुवाद झाले आहेत.

घाटसीला येथे ते निधन पावले.

संदर्भ :

  • Datta, Amresh (Edi.), Encyclopaedia of Indian Literature, Sahitya Akademi, New Dehli.