बंदोपाध्याय, शरद्विंदु : (३० मार्च १८९९–२२ सप्टेंबर १९७०). आधुनिक बंगाली कवी, रहस्यकथालेखक व पटकथाकार. बिहारमधील जौनपूर येथे जन्म. मोंघीर या जिल्ह्याच्या ठिकाणी प्राथमिक शिक्षणास प्रारंभ. कलकत्त्याच्या विद्यासागर कॉलेजमधून बी. ए. व पाटणा येथून कायद्याची पदवी परीक्षा ते उत्तीर्ण झाले. प्रथम तीन वर्षे मोंघीर येथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय करून स्वतःस लेखनव्यवसायास वाहून घेतले.

१९३८ सालापासून मुंबईच्या चित्रपट व्यवसायाशी त्यांचा संबंध आला व पटकथाकार म्हणून मुंबईतच ते स्थायिक झाले. यौवनस्मृति (१९२२) हा त्यांच्या स्फुट कवितांचा संग्रह आहे. ‘चंद्रहास’ या टोपणनावाने शनिवारेर चिठी  या पत्रकात ते विडंबनपर कविताही लिहीत असत परंतु एक रहस्यकथालेखक म्हणूनच ते वाचकांमध्ये जास्त प्रसिध्द पावले.

जातिस्मर (१९३३), डिटेक्टिव्ह (१९३७), चूयाचंदन (१९४२), कालकूट (१९४५), गोपनकथा (१९४५), छाया पथिक (१९४९), कानू कहे राई (१९५८) इ. कथासंग्रह त्यांच्या कथाकौशल्याचे द्योतक आहेत. बंधु (१९३७), पथ बेंधे दिल (१९४१), कालिदास (१९४३), कानामाछि (१९५२) इ. नाटकांमधून त्यांच्या संवादलेखन चातुर्याचा प्रत्यय येतो. ‘वोमकेशेर डायरी’ (१९३४) ही त्यांची अत्यंत लोकप्रिय रहस्यकथा आहे. ऐतिहासिक कहाण्या, अद्भूतकथा व सामान्य जीवनातील घटना घेऊन शरद्विंदु बंदोपाध्यायंनी आपल्या कथा लिहिल्या. त्यांच्या लेखनाचा कल बंकिमचंद्रांच्या ऐतिहासिक व अद्भुतरम्य लेखनाकडे दिसतो. त्यांच्या कथा व नाटके मनोरंजक आहेत.

मुंबई येथे ते निधन पावले.

संदर्भ :

  • Datta, Amresh (Edi.), Encyclopaedia of Indian Literature, Sahitya Akademi, New Dehli.