आयुर्वेदामध्ये विविध धातू, उपधातू, प्राण्यांची शिंगे, समुद्रातील कवचवर्गीय पदार्थ इत्यादींना औषध म्हणून वापरताना त्यांची भस्म करून वापरायला सांगितली आहेत. सोने, चांदी, लोखंड, अभ्रक, शंख, शिंपले इत्यादी पदार्थ तत्काळ औषध म्हणून वापरता येत नाहीत. त्यासाठी त्यांच्यावर प्रक्रिया करून ती भस्म स्वरूपात औषध म्हणून वापरली जातात. आयुर्वेदात भस्म प्रक्रियेचे खालील तीन टप्पे सांगितले आहेत.

(१) शुद्धिसंस्कार : निसर्गात सापडणारे धातू विशिष्ट प्रकारे धुवून किंवा स्वच्छ करून घेतली जातात. नंतर यात तेल, ताक, गोमुत्र यांसारखी द्रव्ये वापरली जातात.

(२) अग्निसंस्कार/पुटसंस्कार : याचा अर्थ ठराविक स्वरूपाचे ठराविक तापमानाचे अग्नी वारंवार देणे. यालाच जारण व मारण अशा आणखी प्रकारात विभागले आहे. या प्रक्रियेला पुटपाक प्रक्रिया म्हणतात. याला पुट देणे असेही म्हटले आहे. अभ्रक इत्यादीसारख्या धातूला भस्म तयार करताना शंभर किंवा हजार वेळा सुद्धा पुट द्यायला सांगितले आहे. ज्यामुळे चिकित्सेमध्ये वापरताना त्याचे गुण अधिक प्रमाणात वाढवले जातात.

(३) अमृतीकरण : ही प्रक्रिया काही भस्मांवर केली जाते. यामुळे त्या भस्माच्या गुणांची वाढ होते आणि ते संपूर्ण दोषरहित होते असे सांगितले आहे.

अभ्रक भस्म : विविध प्रकार.

आयुर्वेदीय रसतंत्राचे मुख्य ध्येय नुसते रासायनिक कल्प बनवणे नसून निरिंद्रिय द्रव्यांना शक्यतो सेंद्रियत्व प्राप्त करून देऊन सेंद्रिय रासायनिक कल्प बनवण्याचे आहे.

भस्मे तयार करण्याचे प्रमुख ५ प्रकार पडतात –

(i) पारा, हिंगुळ इत्यादींची धातूंवर उष्णतेच्या साहाय्याने प्रक्रिया करून भस्मे तयार करणे.

(ii) वेगवेगळ्या वनस्पतींची धातूंवर उष्णतेच्या साहाय्याने प्रक्रिया करून भस्मे तयार करणे.

(iii) हरताळ, मन:शील, गंधक इत्यादी तीक्ष्ण गुणाच्या पदार्थांची धातूंवर उष्णतेच्या साहाय्याने प्रक्रिया करून भस्मे तयार करणे.

(iv) सज्जीक्षार किंवा इतर क्षारीय पदार्थांनी मारण करून भस्मे तयार करणे.

(v) धातूंच्या अन्य विरोधी धातूंच्या साहाय्याने मारण करून भस्मे तयार करणे.

या प्रत्येक प्रकारांनी केलेल्या भस्मांचे शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात. उदा., (अ) पारा वापरून केलेली भस्मे सौम्य आणि शरीर धातूंना बळ देणारी आणि सर्वांत श्रेष्ठ सांगितली आहेत. (आ) वनस्पती वापरून केलेली भस्मे सौम्य, वनस्पतींचे गुणधर्म घेतलेली, लवकर शरीरात शोषली जाणारी आणि मध्यम गुणयुक्त अशी असतात. (इ) हरताळ, मन:शील इत्यादींनी संस्कार केलेली भस्मे तीक्ष्ण गुणांनी युक्त आणि शरीर धातूंना कमी सोसणारी म्हणून कायम काळजीपूर्वक वापरण्यास सांगितली आहेत. (ई) क्षार आणि इतर धातूंनी मारण केलेली भस्मे निकृष्ठ तसेच वापरायला हानिकारक असतात.

पहा : अमृतीकरण; जारण; पुटपाक; भस्मशुद्धीसंस्कार; भस्मे, आयुर्वेदीय; मारण.

संदर्भ :

  • कृष्ण गोपाल, रसतंत्रसार व सिद्धप्रयोगसंग्रह, भस्म प्रकरण, ठाकूर नाथूसिंह प्रकाशन, अजमेर, २०१०.

समीक्षक : अक्षय जोशी