सृष्टीतील सजीव व निर्जीव पदार्थाला आयुर्वेदामध्ये ‘द्रव्य’ असे म्हटले जाते. या द्रव्यांमध्ये काही विशिष्ट गुण असतात. त्यामुळे ती द्रव्ये काही विशिष्ट कार्य करण्यास सक्षम असतात. सृष्टीतील सर्व द्रव्ये पांचभौतिक म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पंचमहाभूतांपासून उत्पन्न झालेली आहेत व शरीरदेखील तसेच उत्पन्न झालेले आहे. म्हणून या सृष्टीतील सर्व द्रव्यांचा उपयोग औषध म्हणून करता येतो.

सर्व द्रव्ये पंचमहाभूतांपासून बनलेली असली तरीही त्यात कुठले तरी एखादे महाभूत अधिक प्रमाणात आहे यावरून त्यांना पार्थिव (पृथ्वी महाभूत आधिक्यामुळे), आप्य (आप महाभूत आधिक्यामुळे), तेजस, वायवीय किंवा आकाशीय अशी नावे दिली जातात. या महाभूताधिक्यानुसार ती विविध रोगांमध्ये वापरली जातात. यांपैकी पार्थिव व आप्य ही द्रव्ये पचायला जड अर्थात गुरु असतात; तर तेजस, वायव्य व आकाशीय द्रव्ये ही पचण्यास हलकी अर्थात लघु असतात.

या द्रव्यांचे बाह्य दर्शनावरून विविध प्रकारे वर्गीकरण केले जाते. ज्यामध्ये चेतना असते ते चेतन द्रव्य व ज्यात चेतना नसते ते अचेतन द्रव्य. याशिवाय जांगम (प्राणिज), औद्भिद् (वृक्ष-वेली) आणि पार्थिव (खनिजे इ.) असेही तीन प्रकार होतात. तसेच जांगम व औद्भिद् द्रव्यांचेही चार-चार प्रकार होतात.

आयुर्वेदामध्ये द्रव्यांचे वर्गीकरण बाह्य दर्शनावरून करण्यापेक्षा रोग्याच्या उपचारांच्या दृष्टिकोनातून व त्यांच्या कार्यानुसार करण्यास अधिक महत्त्व दिले आहे. आचार्य चरकांनी कार्यानुसार ५० गटांमध्ये त्यांना विभाजित केले आहे, या गटांना ‘महाकषाय’ असे म्हणतात. उदा., जीवनीय, बृंहणीय, लेखनीय इत्यादींपैकी एका महाकषायातील एक द्रव्य किंवा एकाहून अधिक द्रव्ये रोगांच्या अवस्थेनुसार वापरली जातात.

या द्रव्यांबद्दल अधिक माहिती देणाऱ्या ग्रंथांना ‘निघण्टु’ असे म्हटले जाते. यांमध्ये द्रव्यांची विविध नावे व त्यांची गुणकर्मे यांचे विवेचन केले आहे. आयुर्वेदाच्या ज्या शाखेत द्रव्यांच्या गुणधर्मांचे वर्णन केले जाते त्या शाखेस ‘द्रव्यगुणशास्त्र’ असे म्हणतात.

संदर्भ :

  • चरकसंहिता — सूत्रस्थान, अध्याय १ श्लोक ४८, ५२.
  • चरकसंहिता — सूत्रस्थान, अध्याय ४ श्लोक ८.

समीक्षक : जयंत देवपुजारी