व्यवहारात दोष हा शब्द उणीव किंवा व्यंग या अर्थाने वापरला जातो. आयुर्वेदात मात्र दोष हा शब्द शरीर आणि मनाच्या क्रिया तसेच शरीरातील अवयवांची रचना यांसाठी प्राधान्याने कारणीभूत असलेल्या घटकांसाठी वापरला जातो. दोष मुळात दोन प्रकारचे असतात — शारीरदोष आणि मानसदोष. वात, पित्त व कफ हे तीन दोष व त्यांचे प्रत्येकी पाच प्रकार यांना शारीरदोष म्हणतात. मनाचा विचार करताना सत्त्व, रज, तम यांना मानसदोष म्हणतात. परंतु, केवळ दोष असा शब्द अधिकवेळा शारीरदोषांकडे निर्देष करतो. तर सत्त्व, रज, तम यांविषयी बोलताना मानसदोष असा उल्लेख मिळतो.
वात, पित्त, कफ हे तीन घटक शरीर व्यापार चालविण्यासाठी आवश्यक आहेत. उदा., अन्नाचे पचन होण्याची क्रिया पित्तामुळे (पाचक पित्त) होते. शरीराच्या ठिकाणी असलेले अनेक गुणात्मक भावही या तीन दोषांच्या परस्पर संयोगाने किंवा एकेकट्यानेही निर्माण होतात. शरीरातील प्रत्येक घटकाच्या ठिकाणी असणारी रचनात्मक वैशिष्ट्ये देखील वात, पित्त व कफ यांनी प्रेरित असतात. उदा., हाडांमध्ये असणारी सच्छिद्रता वाताच्या प्रेरणेने असते. मनाचा व्यापारही शारीरदोषांनी प्रभावित होतो.
दोषांच्या व्यापक कार्यक्षेत्रामुळे वात, पित्त, कफ यांपैकी एकाच्याही ठिकाणी विकृती निर्माण झाली, तर त्याच्याशी संबंधित शरीर घटकांमध्ये क्रियात्मक किंवा रचनात्मक विकृती निर्माण होते. थोडक्यात या तीन दोषांमधील संतुलन म्हणजेच शरीराचे संतुलन होय. मनुष्य शरीराची रोगी अथवा निरोगी अवस्था ही या संतुलनावर अवलंबून आहे. प्रत्येक दोषाचे असंतुलन झाल्यावर उद्भवणारी लक्षणे ‘क्षय’ आणि ‘वृध्दी’ या संज्ञांद्वारे वर्णिलेली आहेत. याला ‘दोषांच्या गती’ असे म्हणतात. दोषांच्या असंतुलनामुळे होणारी रोगनिर्मिती ही टप्प्याटप्प्याने होते. प्रत्येक टप्प्यावर उपचाराची संधी उपलब्ध असते, जी टप्प्यानुसार बदलते. उपचारांच्या दृष्टीकोनातून रोगनिर्मितीसाठी होणारा दोषांचा हा प्रवास ‘षट्क्रियाकाल’ या संज्ञेद्वारे वर्णिलेला आहे.
प्रत्येक मनुष्यात हे दोष एका विशिष्ट प्रमाणात (अनुपातात) असतात. याला ‘प्रकृती’ असे म्हणतात. हे प्रमाण स्त्री व पुरुष यांच्या बीज संयोगाच्या वेळी निश्चित होते आणि ते आयुष्यभर कायम राहते. ही प्रकृती विशिष्ट परिक्षणाद्वारे ओळखता येते.
पहा : दोष, दोषांच्या गती, प्रकृती, मानसदोष, षट्क्रियाकाल.
संदर्भ :
- चरक संहिता—सूत्रस्थान, अध्याय १ श्लोक ५७, अध्याय १७ श्लोक ११२,११७.
- सुश्रुत संहिता—सूत्रस्थान, अध्याय २१ श्लोक ३६, शारीरस्थान अध्याय ४ श्लोक ६३.
समीक्षक – जयंत देवपुजारी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.