व्यक्ती आजारी पडल्यानंतर दवाखान्यामध्ये दोन प्रकारे उपचारासाठी दाखल होते.
- नियमित प्रवेश ( Routine Admission)
- आपत्कालीन प्रवेश (Emergency Admission)
नियमित प्रवेश पद्धतीमध्ये रुग्ण ओपीडी केस पेपर काढून उपचार घेण्याकरीता दाखल होतो, तर आपत्कालीन प्रवेश पद्धतीमध्ये रुग्णास अचानक तीव्र स्वरूपात एखादा शारीरिक त्रास होऊ लागल्याने (उदा., हृदयाघात, मज्जाघात, अपघाती जखम इ.) तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले जाते. या दोन्ही प्रकारच्या प्रवेश पद्धतीमध्ये रुग्ण व त्याचे नातेवाईक रुग्णकक्षामध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचा संपर्क प्रथम परिचारिकेशी होतो. रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याचे उपचार, विविध तपासण्या, शस्त्रक्रिया इत्यादींमध्ये पूर्णवेळ परिचारिका त्यांच्यासोबत असते व मार्गदर्शन करते.
रुग्ण दवाखान्यात दाखल होत असताना परिचारिका खालील बाबी लक्षात ठेवतात :
- रुग्णास दवाखान्यातील वातावरण व आजूबाजूचे लोक हे सर्व अनोळखी असतात, त्यामुळे त्याच्या मनात एक प्रकारची भीती व चिंता असते.
- दवाखान्यात उपचारासाठी दाखल होणारी प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र आहे .
- दाखल झालेल्या रुग्णांच्या दैनंदिन सवयी व वागणुकीमध्ये बदल झालेला असतो.
- आजारी पडणे हा प्रत्येक व्यक्तीसाठी नवीन अनुभव असल्याने व्यक्तीचा शारीरिक व मानसिक ताण वाढलेला असतो .
रुग्णाच्या या सर्व बाबींचा विचार करून परिचारिका रुग्ण दवाखान्यात दाखल झाल्यापासून त्याची आस्थेने विचारपूस करते, हसतमुखाने स्वागत करते व मायेने काळजी घेते.
नियमित प्रवेश पद्धती : नियमित प्रवेश पद्धतीने दाखल झालेल्या रुग्णाविषयी परिचारिकेची भूमिका : या पद्धतीमध्ये ओपीडीमध्ये डॉक्टरांकडून तपासणी करून पुढील उपचारासाठी रुग्ण कक्षात दाखल झालेला असतो. रुग्ण स्वतः चालत आला असल्यास त्याचे हसत मुखाने स्वागत करून त्याला बसण्यास सांगावे. त्याचा केस पेपर पाहून त्याच्या आजाराविषयी प्राथमिक अंदाज घ्यावा. पेपरवरील संपूर्ण माहिती भरलेली आहे की नाही ते पहावे. जसे की रुग्णाचे नाव, वय, लिंग, व्यवसाय, उत्पन्न, पत्ता, जवळच्या नातेवाईकाचे नाव व पत्ता, दूरध्वनी क्रमांक, दाखल क्रमांक (Indoor Number), दाखल दिनांक व वेळ इत्यादी.
रुग्णाच्या केसपेपरवर डॉक्टरांनी काही तातडीचे आदेश लिहिले असल्यास जसे की रक्ताच्या तपासण्या, एक्स-रे किंवा एखादी गोळी द्या असे लिहिले असल्यास प्रथम त्या सर्व सूचनांची अंमल बजावणी केली जाते. काही तातडीचे आदेश नसल्यास रुग्ण व नातेवाइकांशी संवाद साधून रुग्णाचा आजार याविषयी सखोल चौकशी करते. त्याच्या आजाराची लक्षणे कधी पासून सुरू झाली, यापूर्वी काही त्रास होता का? कुटुंबातील सदस्यांना या प्रकारचा आजार किंवा इतर काही अनुवंशिक आजार आहे का? रुग्णाचा व्यवसाय त्याचे उत्पन्न इत्यादीबाबत जाणून घेते.
रुग्ण दवाखान्यात दाखल असताना त्याची मानसिक स्थिती सांभाळणे महत्त्वाचे असते. कारण बहुतेक वेळा रुग्ण कुटुंबातील महत्त्वाची व कमावती व्यक्ती असेल तर त्याचा परिणाम रुग्णाच्या कुटुंबावर सुद्धा झालेला असतो. अशावेळी परिचारिका रुग्णाची मानसिक व आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन रुग्णांच्या आरोग्यासाठी आवश्यक असा व रुग्ण लवकरात लवकर बरा होऊन घरी जाईल अशा प्रकारे परिचर्या व्यवस्थापन आराखडा (Nursing Care Plan) तयार करते.
त्यानंतर अगोदरच तयार करून ठेवलेला बिछाना, परीट घडीच्या स्वच्छ धुतलेल्या अंथरूण-पांघरूण व रुग्णालयाचे कपडे रुग्णास देते. त्याचे जेवण झाले नसल्यास त्याला जेवण उपलब्ध करून देते व डॉक्टरांच्या आदेशानुसार आवश्यक सर्व औषधोपचार व चाचण्या सुरू करते. रुग्णाची आवश्यकतेनुसार आजाराच्या अनुषंगाने डोक्यापासून पायापर्यंत शारीरिक तपासणी तंत्राचा (Observation, Palpation, Auscultation, Percussion) वापर करून तपासणी केली जाते. आजाराविषयीची सर्व माहिती, रुग्णाच्या आहाराविषयी सवयी, आवड – निवड इतर चांगल्या – वाईट सवयींची माहिती घेऊन रूग्णाच्या केस पेपरवरील परिचर्या तक्त्यावर सर्व नोंदी घेऊन तापमान, नाडी, श्वसन, रक्तदाब, वजन व उंची इत्यादी सर्व तपासून नोंद केली जाते.
रुग्ण व नातेवाइकांना आजाराविषयी, करण्यात येणाऱ्या उपचार, विविध तपासण्या, शस्त्रक्रिया या सर्वांविषयी सविस्तर माहिती देते. त्यांच्या काही शंका असल्यास त्यांचे निरसन करते. साधारण किती दिवस दवाखान्यात राहावे लागेल याची पूर्ण कल्पना देते. उपचारासाठी किती खर्च अपेक्षित आहे याचीही कल्पना देते संपूर्ण माहिती दिल्याने उपचारादरम्यान रुग्ण व नातेवाईकांचे संपूर्ण सहकार्य मिळते. आवश्यक असेल त्या ठिकाणी म्हणजेच एखादे इंजेक्शन देण्यापूर्वी, छोटीशी शस्त्रक्रिया किंवा तपासणी करण्यासाठी रुग्ण व नातेवाईकांची आवश्यकतेनुसार लेखी संमती घेते.
रुग्ण व नातेवाईकांना रुग्णकक्षातील सर्व सोयीसुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय, आंघोळीच्या पाण्याची सोय, शौचालय, स्नानगृह हे सर्व दाखवून देते. त्यानंतर रुग्णालयीन कामकाजाच्या वेळा यांमध्ये डॉक्टर तपासण्याची वेळ, औषध वाटपाची वेळ, जेवण व चहा न्याहारी मिळण्याच्या वेळा समजावून सांगते. आवश्यक असलेले सर्व साहित्य उपलब्ध करून देते.
रुग्णाची कक्षातील इतर रुग्णांसमवेत ओळख करून द्यावी. त्याच्या सारखाच आजार असलेल्या व तब्येतीत सुधारणा झालेल्या रुग्णांची उदाहरणे द्यावीत. म्हणजे रुग्णाचे मनोबल वाढते. तसेच मनोरंजनासाठी उपलब्ध असलेल्या साधनांची माहिती करून द्यावी उदाहरणात वर्तमानपत्र, टीव्ही, रेडियो, पुस्तके इत्यादी. रुग्णाच्या प्रवेशासंबंधी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व नातेवाईकांची गरज नसल्यास त्यांना घरी जाण्याची मुभा द्यावी. त्याचवेळी नातेवाईकांना भेटण्याच्या वेळा समजावून सांगाव्यात.
आपत्कालीन प्रवेश पद्धती : ज्यावेळी रुग्ण मध्यम ते गंभीर स्वरूपाचा आजारी असतो व अत्यवस्थ अवस्थेत तीव्र वेदनासहित कक्षात दाखल होतो. अशावेळी नियमित प्रवेशपद्धती मधील इतर सर्व सोपस्कार बाजूला ठेवून प्रथम रुग्णाची काळजी घेतली जाते. रुग्ण कक्षात कशाप्रकारे दाखल झाला आहे ते पहावे. नातेवाईकांनी धरून आणलेला आहे, व्हीलचेअरवर बसून आहे की स्ट्रेचरवर आहे? ते पहावे. प्रथम रुग्णाची जीवनावश्यक चिन्हे (Vital Signs) यामध्ये ताप, नाडी, श्वसन, रक्तदाब, वेदनेची तीव्रता इत्यादी तपासावे. डॉक्टरांनी केस पेपर वर आदेश दिले असतात ते तातडीने उपचार सुरू करावे. डॉक्टरांची सूचना नसल्यास त्यांना तातडीने बोलावून घ्यावे किंवा दूरध्वनीवर संपर्क साधावा. तोपर्यंत रुग्णाला बिछान्यावर घेऊन तातडीचे जीवनावश्यक उपचार सुरू करावेत. रुग्ण व नातेवाइकांना धीर द्यावा. तब्येतीविषयी पूर्ण कल्पना देऊन उपचार व तपासणी याबाबत आवश्यक त्या लेखी संमती घ्यावेत.
अशा रुग्णावर तातडीचे उपचार केल्यानंतर रुग्णाच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊ लागते. रुग्णाचा जीव धोक्यातून बाहेर आल्यानंतर नियमित प्रवेश पद्धतीमध्ये सांगितल्याप्रमाणे इतर सर्व परिचर्या शुश्रूषा पूर्ण करावी.
रुग्णाजवळील साहित्य : रुग्ण दवाखान्यात असताना उपचारादरम्यान विविध प्रक्रिया करण्यास अडचण येऊ नये व रुग्णाच्या जीवितास धोका उत्पन्न होऊ नये म्हणून त्याच्या अंगावरील सर्व चीजवस्तू, मौल्यवान धातूच्या वस्तू काढून त्याच्या नातेवाईकांकडे द्यावे. नातेवाईक नसल्यास किंवा रुग्ण बेशुद्धावस्थेत असल्यास अशा सर्व वस्तूंची यादी करावी. यादीमध्ये सर्व वस्तू, कागदपत्रे , धातूच्या वस्तू , घड्याळ, मोबाईल फोन यांची नोंद करावी. धातूचा उल्लेख सोने-चांदी असा न करता पिवळ्या किंवा पांढऱ्या धातूची वस्तू असा करावा. पैसे असतील तर नोटांचा नंबर लिहून यादी करावी सर्व साहित्य एका पिशवीत भरून त्यावर यादी लावावे व कक्षपरीसेविकेच्या ताब्यात द्यावे. यादीवर यादीकरणारी परिचारिका, कक्षपरीसेविका व एका साक्षीदाराची सही घ्यावी. रुग्ण शुद्धीवर आल्यानंतर किंवा जवळचा नातेवाईक हजर झाल्यास सर्व साहित्य त्यांच्या ताब्यात द्यावे, व ताब्यात मिळाल्याची सही घेऊन तो कागद केस पेपरला लावून ठेवावा.
रुग्णाची कोणतीही चीजवस्तू, खराब झालेले कपडे असे काहीही फेकून देऊ नये. पोलीस केस संदर्भात एखादा रुग्ण असल्यास या सर्व वस्तू कोर्टामध्ये पुरावा म्हणून सादर केल्या जातात. त्यामध्ये जर काही फेरफार झाल्यास किंवा वस्तु हरवल्यास परिचारिका व रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा (Negligence) गुन्हा दाखल होऊ शकतो. सांसर्गिक आजाराचा रुग्ण असल्यास त्याचे कपडे, वस्तू निर्जंतुक करावे व नंतर बंदिस्त (Sealed) करून ठेवावे.
पोलीस केस संदर्भातील रुग्ण (Medico Legal Case) : काही वेळा रुग्ण पोलिसांमार्फत दवाखान्यात आणला जातो किंवा काही प्रकरणी रुग्ण दाखल झाल्यानंतर रुग्णांची पोलिसांना माहिती द्यावी लागते. जसे की अपघात झालेले रुग्ण, विषबाधा किंवा भाजलेले आणि सर्प दंश झालेले रुग्ण. अशावेळी एखादी घातपाताची शक्यता असल्याने पोलिसांना कळवावे लागते. असा रुग्ण आल्यास त्याचे प्राथमिक तपासणीचे नोंदी, उपचार, रुग्णाची स्थिती यासर्वांचे सविस्तर वर्णन केस पेपरवर नोंद करावे व लगेच पोलिसांना कळवावे.
रुग्णावर उपचार सुरु ठेवावे. नातेवाईक नसल्यास रुग्णाला विचारून त्यांचा पत्ता घ्यावा व संपर्क करावा. वर सांगितल्याप्रमाणे अशा रुग्णाचे साहित्य नातेवाईकांकडे न देता पोलिसांच्या ताब्यात घ्यावे त्याचा उपयोग पुढील तपासासाठी केला जाऊ शकतो. साहित्य ताब्यात दिलेल्या पोलिसाचे नाव व बक्कल नंबर नोंद करावा. तसेच अशा रुग्णाचे शारीरिक नमुने जसे की विषबाधेच्या रुग्णाची उलटी, रक्त नमुना, लघवी नमुना, बलात्काराची केस असल्यास स्त्रीच्या योनीमार्गातील स्राव इत्यादी घेऊन तपासणीसाठी योग्य लेबल लावून पाठवावेत व त्यांचे अहवाल जपून ठेवावे. पोलीस केस असलेल्या रुग्णाला बाहेरचे अन्नपदार्थ देऊ नये. अशा रुग्णाच्या केसपेपरवर पोलीस केस नंबर (MLC Number) नोंद आहे का? रुग्णाचा जबाब झालेल्या आहे की नाही? जबाब घेतलेल्या पोलिसांचे नाव व बक्कल नंबर आहे की नाही? ते पहावे, नसल्यास सदर माहिती पूर्ण करून घ्यावी.
कक्षातील नोंदी व अहवाल : रुग्णाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत उपरोक्त नमूद सर्व बाबी पूर्ण केल्यानंतर रुग्णाविषयी सर्व नोंदी रुग्णालयाच्या नियमानुसार विविध नोंदवहीमध्ये करावे. जसे की रुग्णाचा केस पेपर (Indoor Paper), तापाचा तक्ता (Temperature Chart), सेवन व विसर्ग तक्ता (Intake Output Chart), औषधोपचार तक्ता (Medication chart), दाखल पुस्तक (Admission Book), आहारपुस्तक (Diet Book), जनरल ऑर्डर पुस्तक (GOB), विशेष आजार असेल तर संबंधित नोंदवहीमध्ये सर्व माहिती भरावी.
अशाप्रकारे रुग्ण दवाखान्यात दाखल झाल्यानंतर त्याच्या उपचारासंबंधी जागृत राहून त्याला सर्व स्तरावर आवश्यक ते सहकार्य परिचारिकेचे कडून केले जाते व रुग्णाला लवकर बरा होईल याची काळजी घेतली जाते.
संदर्भ :
- Sr. Nancy, Principle and Practices of Nursing, Vol I.
- डॉ. एस. मोमीन, परिचर्या : शास्त्र, तंत्र व कला.
समीक्षक : कविता मातेरे