घोष, पन्नालाल : (२४ जुलै १९११—२० एप्रिल १९६०). प्रख्यात बासरीवादक. त्यांचा जन्म बारिसाल (बांगला देश) येथे झाला. त्यांचे वडील अक्षयकुमार घोष हे उत्तम सतारिये होते. वयाच्या चौदाव्या वर्षीच पन्नालाल बासरीकडे आकृष्ट झाले. पुढे १९३४ मध्ये त्यांनी मास्टर खुशी महम्मद या संगीतकारांचे शिष्यत्व पतकरले. ‘सराईकेला नृत्यमंडळी’त ते काही काळ संगीत दिग्दर्शक होते. तीबरोबरच १९३८ मध्ये त्यांना यूरोपचा प्रवास घडला. गिरिजा शंकर चक्रवर्ती ह्यांच्याकडे १९३९ मध्ये आणि पुढे १९४७ च्या सुमारास उस्ताद अल्लाउद्दीनखाँ ह्यांच्याकडे त्यांनी संगीताचे अधिक शिक्षण घेतले. चित्रपट क्षेत्रात ते १९४० ते १९४४ ह्या काळात संगीत दिग्दर्शक म्हणून होते व पुढेही तेथेच १९५६ पर्यंत बासरीवादक होते. या काळात त्यांनी बासरीवादनाचे स्वतंत्र कार्यक्रमही केले. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रात १९५६ पासून ते वाद्यवृंद निर्देशक होते.
पन्नालाल घोष हे बासरीवादनाच्या क्षेत्रातील एक युगप्रवर्तक होत. वेणुवादनाला भारतात दीर्घकालीन इतिहास असला, तरी बासरीवादनाला एक स्वतंत्र व स्वायत्त दर्जा मिळवून देण्यात त्यांचा फार मोठा वाटा होता. ख्यालगायनातील आलापासारखे विलंबित संगीतविस्तार आणि सतार, सरोद इत्यादी तंतुवाद्यातील ‘झाला’ सारखे द्रुत वादनप्रकार या दोहोंना बासरीवादनात अंतर्भूत करून त्यांनी या वाद्याची सांगीतिक विकसनक्षमता विस्तृत केली. यासाठी त्यांनी संशोधन करून मोठ्या व्यासाची, अधिक लांबीची व परिणामतः अधिक स्वरक्षेत्राची बासरी तयार केली. अर्ध, पाव इ. स्वरांतरे आणि मींडकामासारखे संगीतालंकार त्यांनी बासरीवादनातून यशस्वी करून दाखविले. संगीत दिग्दर्शक आणि रचनाकार म्हणूनही त्यांनी कीर्ती मिळविली. त्यांच्या इतजार, बसंत ह्या चित्रपटांतील संगीतरचना व ‘आशा’, ‘बागेश्री’, ‘ऋतुराज’, ‘कलिंगविजय’, ‘भैरवी’, ‘ज्योतिर्मय अमिताभ’ इ. वाद्यवृंदरचना गाजल्या आहेत. त्यांच्या शिष्यगणांत हरिप्रसाद चौरसिया, देवेंद्र मुर्डेश्वर, बेडा देसाई इ. प्रसिद्ध बासरीवादकांचा समावेश होतो.
पन्नालाल यांचे दिल्ली येथेच निधन झाले.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.