घोष, निखिल अक्षयकुमार : (२८ डिसेंबर १९१८—३ मार्च १९९५). ख्यातकीर्त तबलावादक, संगीतज्ञ, लेखक, सक्षम गुरु आणि “संगीत महाभारती” या संस्थेचे संस्थापक. त्यांचा जन्म हिंदुस्थानातील तत्कालीन पूर्व बंगाल प्रांतातील बारिसाल (आताचे बांगला देश) येथे झाला. त्यांचे वडील अक्षयकुमार हे उत्तम सतार वाजवत असत. घरातील सांगीतिक वातावरणामुळे ते लहानपणीच संगीताकडे ओढले गेले. त्यांचे ज्येष्ठ बंधू पन्नालाल घोष हे प्रख्यात बासरीवादक होते. त्यांचा मोठाच प्रभाव त्यांच्यावर होता. गायन आणि वादन या दोन्हीवर निखिल घोष यांचे प्रभुत्व होते, त्यामुळे कोणती वाट स्वीकारायची याविषयी निश्चितता नव्हती; पण त्यांचे गुरु ज्येष्ठ तबलावादक अहमदजान थिरकवा यांच्या सूचनेनुसार त्यांनी तबलावादन निवडले. थिरकवा यांच्याकडून त्यांनी तालीम तर घेतलीच; पण त्या बरोबरच अमीर हुसेनखाँ, ज्ञानप्रकाश घोष यांच्याकडून देखील संगीताचे शिक्षण प्राप्त केले. त्यांच्या संगीतावर तसेच व्यक्तिमत्त्वावर गुरुजनांचा मोठा प्रभाव होता.

तबलावादन हे केवळ गती आणि कौशल्य दाखविण्याचे वाद्य नसून वेगळा काव्यमय आणि लालित्यपूर्ण अनुभव देणारे साधन असावे, असे निखिल घोष यांचे मत होते आणि त्या दृष्टीने त्यांनी मोठी साधना करून त्यात सिद्धी मिळविली. स्वतंत्र वादन आणि साथसंगत यात त्यांनी असामान्य कौशल्य मिळविले. बंधू पन्नालाल यांच्याबरोबरीनेच त्या काळातील सर्व नावाजलेल्या कलाकारांबरोबर त्यांनी समर्थपणे आणि माधुर्यपूर्ण साथ केली. तबल्याच्या सर्व घराण्यांच्या बंदिशी तितक्याच सफाईने ते सादर करीत. हिंदी चित्रपट क्षेत्रात त्यांनी सहसंगीत दिग्दर्शक म्हणूनही कार्य केले. त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य म्हणजे त्यांनी १९५६ साली स्थापन केलेली “संगीत महाभारती” ही संस्था होय. या संस्थेमार्फत त्यांनी गायन, सतार, तबला आदींचे शिक्षण देऊन अनेक उत्तमोत्तम शिष्य तयार केले. संगीत स्वरलिपीची (नोटेशनची) वेगळी पद्धत निर्माण करून संगीत विद्यार्थ्यांची मोठीच सोय त्यांनी केली. या संदर्भातील त्यांचे पुस्तक fundamental of Raga and Tala with a system of Notation हे त्यांनी १९६८ साली प्रकाशित केले. १९७४ साली “ट्राया” ग्रुप स्थापन करून त्याद्वारे त्यांनी जगभर संगीत विषयक कार्यक्रम केले.

निखिल घोष यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाकरिता भारत सरकारने १९९० साली “पद्मभूषण” या पुरस्काराने गौरविले. तसेच १९९५ साली त्यांना उस्ताद हाफिज अलीखाँ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या पश्चात तबला आणि सतारवादक नयन, सारंगीवादक ध्रुव आणि गायिका तुलिका ही अपत्ये आहेत. त्यांनी आणि निखिल घोष यांच्या एकनाथ पिंपळे, दत्ता यंदे, करोडीलाल भट, अनिश प्रधान या शिष्यांनी त्यांचा संगीताचा वारसा पुढे चालवला आहे. त्यांच्या स्मरणार्थ त्यांची कन्या तुलिका घोष यांनी “पंडित निखिल घोष फाऊंडेशन” या संस्थेची स्थापना केली असून या संस्थेमार्फत कलाकारांना प्रोत्साहनपर संगीताचे विविध कार्यक्रम केले जातात.

समीक्षक : सुधीर पोटे