एरिक स्टार्क मॅस्किन : (१२ डिसेंबर १९५०). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. मॅस्किन यांना अर्थशास्त्रातील ‘यांत्रिक अभिकल्प सिद्धांत’ (Mechanism Design Theory) या गणिती प्रणालीचा पाया रचल्याबद्दल प्रख्यात पोलिश-अमेरिकन अर्थतज्ज्ञ व गणितज्ज्ञ लिओनीड हुर्विक्झ (Leonid Hurwicz) आणि अमेरिकन अर्थतज्ज्ञ रॉजर मायरसन (Rojer Mayarson) यांच्या बरोबरीने २००७ मध्ये अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मॅस्किन यांचा जन्म न्यूयॉर्क सिटी शहरात एका बुद्धिप्रामाण्यवादी वृत्तीच्या ज्यू कुटुंबीत झाला. ते न्यू जर्सीतील अल्पाइन शहरात लहानाचे मोठे झाले. त्यांनी १९७२ मध्ये हार्व्हर्ड विद्यापीठातून गणित विषयात ए. बी. ही पदवी मिळविली. १९७६ मध्ये तेथूनच अर्थशास्त्रांशी संबंधित उपयोजित गणित विषयात पीएच. डी. ही पदवी त्यांनी प्राप्त केली. त्यानंतर लगेचच त्यांची केंब्रिज विद्यापीठाच्या जीझस कॉलेजमध्ये संशोधक-सहायक म्हणून नियुक्ती झाली. १९७७ मध्ये ते ‘Massachusetts Institute Of Technology’ (M.I.T.)मध्ये प्राध्यापक म्हणून रूजू झाले. १९८५ मध्ये पुन्हा त्यांची हार्व्हर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राचा लुइस बेर्कमन प्राध्यापकपदी नेमणूक होऊन २००० अखेर त्यांनी तेथेच अध्यापनकार्य केले. २००० मध्ये ते न्यू जर्सी येथील प्रिन्स्टन विद्यापीठाच्या ‘Institute Of Advanced Studies’मध्ये प्राध्यापक झाले. शिवाय त्याच काळात त्यांनी जेरूसलेम विद्यापीठातील ‘Institute Of Advanced Studies-Summer school’च्या संचालकपदीही काम केले. २०११ मध्ये ते पुन्हा हार्व्हर्ड विद्यापीठात अध्यापन व संशोधनकार्य करू लागले.

मॅस्किन यांचे संशोधनकार्य विविधांगी असून क्रीडा सिद्धांत, प्रोत्साहन अर्थशास्त्र, संविदा सिद्धांत अशा सामाजिक निवडक क्षेत्रांशी ते संबंधित आहे. ‘यांत्रिक अभिकल्प सिद्धांत’ तसेच ‘गतिकʼ किंवा ‘गतिशील क्रीडा’ (डायनॅमिक गेम्स) या त्यांच्या संशोधन निबंधांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली. अमेरिकेतील सार्वजनिक निवडणूकप्रक्रिया, आर्थिक विषमतेची कारणे व संमिश्र शैलसमूह निर्मिती हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख विषय. १९७० मध्ये सामाजिक निवड प्रणालीअंतर्गत अंमल सिद्धांत (Implementation Theory) क्षेत्रातही त्यांनी काम केले. त्यामुळे व्यक्तींना बाजारपेठांतील अनेक उपलब्ध पर्यायांपैकी सर्वोत्तम निवड कशी करता येईल व यासाठी कार्यपद्धती काय असावी यांबाबत चांगले मार्गदर्शन झाले. त्यानंतर १९८० मध्ये पर्याप्त लिलाव प्रक्रियेसंबंधी असलेल्या कोणत्या प्रकारच्या लिलाव अगर विक्रीपद्धतीमुळे शासनाला जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल, याबाबत त्यांनी संशोधन केले. त्यांच्या या क्षेत्रातील उत्कृष्ठ संशोधकार्यामुळे Bank Of Italy ने त्याचे मार्गदर्शन घेतले.

मॅस्किन यांनी आपल्या विविध प्रकारच्या आर्थिक सिद्धांतांद्वारे बाजारापेठांशी संबंधित घटकांचा अधिक लाभ कसा होईल, यासाठी कार्यपद्धती विकसित केली. तिचा वित्तीय क्षेत्राबरोबरच व्यवसाय – व्यवस्थापन व मतदार प्रवृत्तींचा अभ्यास करण्यासाठी फार उपयोग झाला. कार्यक्षम व्यापारपद्धती, नियमन योजना व निवडणूककार्यपद्धती यांबाबतचे उत्कृष्ठ मार्गदर्शन त्यामुळे अर्थतज्ञांना होऊ शकले. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र तसेच कायदा या क्षेत्रांत काम करणाऱ्यांना औद्योगिक संघटन, वित्त व विकास या संदर्भातील संशोधनासाठी त्यामुळे लाभ झाला. सध्या जगभर भेडसावत असलेल्या वित्तीय संकटांचा मुकाबला करण्यासाठी यांत्रिक अभिकल्प सिद्धांत या गणिती-अर्थशास्त्रीय प्रणालीचा नियमन व्यवस्था निर्माण करण्यासाठी व अर्थकारणाला कमीत कमी हानी पोहोचेल अशी व्यवस्था निर्माण होण्यासाठी उपयोग होईल, असे त्यांनी प्रतिपादन केले. त्यांच्या या सिद्धांताचा दूरसंदेशवहन क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी यशस्वीपणे व मोठ्या प्रमाणावर विनियोग केल्याचे दिसून येते. आपल्या संशोधनकार्यादरम्यान त्यांनी अन्य ठिकाणी दिलेली त्यांची पुढील व्याख्याने बरीच गाजली. चर्चिल लेक्चर्स-केंब्रिज विद्यापीठ, केनेथ ॲरो लेक्चर्स-स्टॅनफोर्ड विद्यापीठ, ॲल्फ्रेड मार्शल लेक्चर्स-यूरोपियन इकॉनॉमिक असोसिएशन, सियाटल लेक्चर्स-वर्ड, काँग्रेस, लिओनेल मेकेन्झी लेक्चर्स-युनिव्हर्सिटी ऑफ रॉचेस्टर.

https://www.youtube.com/watch?v=3RaMnwpy_L4

मॅस्किन यांचे लेखक व सहलेखक म्हणून लिहिलेले ग्रंथ पुढीलप्रमाणे : इन्सेंटिव्ह्ज स्केल इकॉनॉमीज, ॲण्ड ऑर्गनायझेशनल फॉर्म (१९९७ – सहलेखक), प्लॅनिंग सॉर्टेज, ॲण्ड ट्रान्स्फॉर्मेशन : एसेज इन हॉनर ऑफ जेनॉस कॉर्ने (२०००), इम्प्लिमेंटेशन ऑफ सोशल चॉइस (२०११), दि ॲरो इम्पॉसिबिलिटी थेरम (२०१४ – सहलेखक). यांव्यतिरिक्त त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.

मॅस्किन यांना नोबेल स्मृती पुरस्काराबरोबरच त्यांच्या संशोधनकार्याबद्दल पुढील सन्मान प्राप्त झाले : गुग्गेनहेइम छात्रवृत्ती (१९८०-८१), स्लोअन छात्रवृत्ती (१९८३ – १९८५), इकॉनॉमिक लेटर्सचे प्रमुख संपादक पद (१९९२), इकॉनॉमेट्रिक सोसायटी – अध्यक्ष (२००३), एरिक केम्पे अवॉर्ड (२००७), नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स – सदस्य (२००८), डॉक्टर ऑफ ह्यूमन लेटर्स, बार्ड कॉलेज (२००८), हार्व्हर्ड युनिव्हर्सिटी सेंटेनियल मेडल (२०१०).

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा