सर्वंकषवाद : विसाव्या शतकात सर्वंकषवादाचा उदय झाला. नाझी जर्मनी, मुसोलिनीच्या काळातील इटली, स्टॅलिनच्या काळातील सोवियत युनियन, युनियन पीपल्स रिपब्लिकन ऑफ नोर्थ कोरिया, सौदी अरब अशी काही महत्त्वाची उदाहरणे सर्वंकषवादाची आहेत. सर्वंकषवाद ही एक विचारप्रणाली आहे. तसेच हा एक शासनाचा प्रकार आहे. हा शासनाचा प्रकार सामाजिक जीवनाच्या सर्वांगावर नियंत्रण करणारा किंवा करू इच्छिणारा आहे. हा शासन प्रकार समाज जीवनामध्ये खाजगी व सार्वजनिक राजकीय व सामाजिक असा फरक करण्यास नकार देतो. मूलग्राही विचारांमधून सर्वस्पर्शी नियंत्रण निर्माण होते. मूलग्राही विचारानुसार उद्दिष्ट ठरते. उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी समाजातील अन्य घटक दुय्यम करून राजकीय घटकांचे वर्चस्व निर्माण होते. समाजाच्या सर्वच घटकांना राजकारण व्यापून टाकते. विचारप्रणालीचा हत्यार म्हणून सर्वंकष व्यवस्थेत उपयोग केला जातो. एक पक्ष स्थापन केलेला असतो व त्याच्या हातात सर्व सत्ता एकवटलेली असते. लोकांनुरंजनवादी नेतृत्व व एका पक्षाच्या माध्यमातून समाजावर अधिकार प्रस्थापित केला जातो. सर्वंकषवाद सामूहिक व व्यक्तिगत जीवनातील सर्व घटकांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो. अनेकसत्तावादाच्या विरोधातील चळवळ राबवितो. या माध्यमातून नेतृत्त्व वाढवले जाते. राज्याचे शत्रू म्हणून आपण आणि इतर असा अंतराय निर्माण केला जातो.

सर्वंकषवाद ही संकल्पना बेनिटो मुसोलिनी यांनी घडवली आहे (१९२०). परंतु नंतर राज्यशास्त्रज्ञांनी ही संकल्पना विवेचन करण्यासाठी वापरली आहे. इटालियन तत्वज्ञानी जियोव्हानी जेंटील यांनी सर्वंकषवाद हा शब्दप्रयोग वापरला. त्यांनी १९२० मध्ये फॅसिस्ट राज्याचे वर्णन करण्यासाठी ही संकल्पना वापरलेली होती. विशेषता तुलनात्मक राज्यशास्त्र आधुनिक राजकीय व्यवस्थांचे वर्णन करण्यासाठी ही संकल्पना वापरते. सार्वजनिक व खाजगी वर्तणुकीचे नियमन राज्यसंस्था करते. सर्वंकषवाद राज्याच्या रणनीतीचा संच आहे. त्याची एकच एक व्याख्या नाही. कार्ल पॉपर, आरंटहाना, कार्ल फ्रेडरिक, झिग्निव्ह ब्रोझिन्स्की आणि जुआन लिन्झ यांनी सर्वंकषवादाचे विवेचन केले आहे. अधिकृत राज्य विचारसरणीच्या समर्थनासाठी राज्य नियंत्रित राजकीय व्यवहार, असहिष्णुता, दडपशाही, व्यवसायावरील कामगारांचे, चर्च व कामगार संघटनांचे नियंत्रण असा युक्तिवाद केला जातो. नागरी समाजाच्या विरोधातील ही राज्य पुरस्कृत चळवळ असते. गुप्त पोलिस यंत्रणाचा राजकीय सत्तेसाठी उपयोग केला जातो. तसेच राज्य नियंत्रित प्रसारमाध्यमे देखील असतात. राज्य प्रसारमाध्यमांच्या प्रशासनावर सर्वंकष नियंत्रण ठेवते. जनसंपर्काच्या साधनांवर संपूर्ण बंधन आणून हा पक्ष सर्वंकष वैचारिक व राजकीय नियंत्रण ठेवतो. या विचारात सैन्य, राजकीय नेते, उद्योगपती अशा अनेकांचा समावेश केला जातो. हे तिन्ही घटक सत्ता आणि प्रभावी स्पर्धा करतात. नागरी समाज पूर्णपणे ऐच्छिक नागरी व सामाजिक संस्था असते. नागरी समाज राज्याच्या राजकीय वर्चस्वाला नाकारते. परंतु सर्वंकषवाद नागरी समाजाच्या या स्वरूपाला नकार देतो.

आधुनिक तंत्रज्ञानातील आकाशवाणी, मुद्रणालये अशा साधनांचा उपयोग करून राज्य आपली विचारसरणी पसरवते व राज्य निरंकुश बनते. द ओपन सोसायटी अण्ड ईटस एनीम्स (१९४५) व द पावर ऑफ हिस्ट्रीसीझम  (१९६१) या ग्रंथात  कार्ल पॉपर यांनी सर्वंकषवाद टिकात्मक पद्धतीने स्पष्ट केला. आरंटहाना यांच्या द ओरिजिन ऑफ टोटलिटॅनिझम (१९५१) या ग्रंथात सर्वंकषवाद नवीन सरकारचे स्वरूप आहे हे त्यांनी स्पष्ट केले. निरंकुश राजवटीने जनतेला विचारप्रणाली म्हणून आव्हान दिले. त्यामध्ये भूतकाळ, वर्तमान काळ व भविष्याची उत्तरे दिली गेली होती. सर्वंकषवाद राजकीय इतिहास वंशसंघर्षाचा आहे असे चर्चाविश्व मानतो. वंश संघर्षाचा इतिहास हे सूत्र सर्वंकषवादाने मान्य केलेले असल्यामुळे शक्तीच्या कृतीला सर्वंकषवाद न्याय ठरवतो. एक विस्तृत मार्गदर्शक विचारसरणी, एक पक्ष, हुकुमशाही नेतृत्त्व, नियोजित माध्यमातून अर्थव्यवस्थेचे केंद्रीकरण व नियंत्रण ही तत्वे इटली, जर्मनी, रशिया, सौदी अरब येथे दिसून आली होती. सर्वंकषवाद व अधिसत्तावाद यात फरक केला जातो. नागरी समाज, धार्मिक संस्था व न्यायालय सर्वंकषवादाच्या विरोधात स्वायत्ततेची मागणी करते. त्यामुळे स्वायत्ततेच्या चळवळी सर्वंकषवादाच्या विरोधात उदयाला आल्या. राज्यशास्त्रामध्ये सामान्यत: केवळ दहशतवाद नव्हे तर मूलगामी सामाजिक परिवर्तनाचा विचार करणार्‍या विचारसरणीच्या पार्श्वभूमीवर,जनसमर्थनावर आधारित सर्वंकषवादाच्या विशिष्ट आधुनिक स्वरूपाचा संदर्भ घेण्यासाठी उपयोग केला जातो. सर्वंकषवाद, आधिसत्तावाद, हुकूमशाही आणि जुलूमशाही हे चारही शासन प्रकार आहेत. हे चारही शासन प्रकार लोकशाही आणि आधुनिक उदारमतवाद विरोधी भूमिका मांडतात. परंतु तरीही या चार प्रकारांमध्ये सूक्ष्म फरक आहे.

संदर्भ :

  • व्होरा, राजेंद्र,सुहास,पळशीकर (संपा), राज्यशास्त्रकोश, दास्ताने प्रकाशन पुणे.
  • Robyn, Driskell, Totalitarianism, Encyclopedia of social theory, the Wiley – Blackwell, 2017,
  • Canovan, Margaret, Totalitarianism, Encyclopaedia of philosophy Routledge.