बद्रीनाथ महाराज तनपुरे : (३ एप्रिल १९४७). वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार. त्यांच्यावर संत गाडगे महाराजांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव आहे. बद्रीनाथ महाराज यांचे पूर्ण नाव बद्रीनाथ कुशाबा तनपुरे असे असून त्यांचा जन्म मौजे दगडवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे झाला. त्यांचे वडील कुशाबा बाभजी तनपुरे हे भागवत धर्माचे प्रचारक होते. ते सामाजिक समतेचे पुरस्कर्ते होते. वडील कुशाबाजी आणि मातोश्री रुक्मिणीबाई यांच्या भागवत संप्रदायाच्या विचारांचे संस्कार बद्रीनाथ महाराजांवर झाले. करंजीघाट येथील हनुमान मंदिरातील गव्हाणेबाबा यांचे गुरूछत्र बद्रीनाथ महाराजांना लाभले. त्यांनी मराठी विषयात बी. ए. ही पदवी संपादन केली. वारकरी शिक्षण संस्था, सिद्धबेट आळंदी येथे त्यांनी अध्यात्माचे शिक्षण घेतले. वेद,उपनिषदे,गीता, भागवत , ज्ञानेश्वरी, सकल संत गाथा या आध्यात्मिक वाड्मयाचा त्यांनी अभ्यास केला. श्री क्षेत्र काशी येथील संस्कृत विद्यापीठातही त्यांनी अध्ययन केले.
चारोधाम मंडप ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त व्यवस्थापक म्हणून त्यांनी प्रारंभी कार्य केले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात हजारो कीर्तने केली तसेच आपल्या कीर्तन सेवेतून अध्यात्मिक समतेचा संतांचा विचार लाखों भविकांपर्यंत त्यांनी पोहचविला. पंढरपूर येथील प्रसाद शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी भुषविले. आध्यात्मिक तत्त्वज्ञान प्रसाराबरोबर त्यांनी शिक्षण क्षेत्रातही महत्वाचे कार्य त्यांनी बजावले. मौजे खांडगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे त्यांनी श्री संत तनपुरे बाबा विद्यालयाची स्थापना करून अध्यक्षपद सांभाळले. अध्यात्मिक तसेच शैक्षणिक संस्थांचे जाळे त्यांनी अहमदनगर आणि पंढरपूर येथे उभे केले आणि या संस्थांची धुरा अध्यक्ष म्हणून यशस्वीरीत्या सांभाळली. श्री संत तनपुरे महाराज मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर, पंढरपूर, श्री संत तनपुरे बाबा उच्च माध्यमिक विद्यालय ( कला शाखा ), मौजे खांडगाव, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर, सद्गुरू वुमेन्स कॉलेज ऑफ बी. सी. ए., खांडगाव अशा संस्थांची उभारणी त्यांनी केली. महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. सन २००० सालात श्री संत नामदेवराय षठय शतकोत्तर सोहळ्यानिमित्त घुमान ( पंजाब ) येथे संत नामदेवराय गाथा पारायणाचा सोहळा बद्रीनाथ महाराज यांनी हजारो भक्तांसह आयोजित केला. श्री शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे संत तुकाराम महाराज अध्यासन सुरू व्हावे म्हणून त्यांंनी विशेष प्रयत्न केले. गोपाळपूर, पंढरपूर येथे मातोश्री वृद्धाश्रम प्रकल्प १९९७ पासून सुरू करून तेथे निराधार, गोर गरीब वृद्ध महिलांना, पुरुषांना आश्रय दिला जातो. सुमारे १०० वृद्ध या प्रकल्पाचे लाभार्थी आहेत. बद्रीनाथ महाराज परमार्थ महाधन या त्रैमासिकाचे संपादक आहेत. श्री संत तनपुरे महाराज संस्थेच्या वतीने गेली ७० वर्षे निराश्रीतांना, कृष्ठरुग्णांना मोफत अन्नदान केले जाते. बद्रीनाथ महाराज गेली ४० वर्षे कीर्तनाच्या माध्यमातून व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करीत आहेत. श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे संपादन त्यांनी केले आहे. २००५ साली त्यांना पहिला शनिरत्न पुरस्कार प्राप्त झाला. २००७ साली समाजसेवेबद्दल ब्रह्मदेवदादा माने पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. वारकरी सेवा भूषण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे २०१० साली कीर्तन समाज प्रबोधन पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सन २०१२ मध्ये संत गाडगेबाबा सेवाभावी पुरस्कार तसेच २०१३ मध्ये वैष्णवरत्न पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. वारकरी संप्रदायातील पुरोगामी विचारसरणीचे समाजभिमुख कीर्तनकार म्हणून बद्रीनाथ महाराज यांनी लौकिक प्राप्त केला आहे.
संदर्भ : क्षेत्रसंशोधन