फरीदसाहेब सतारमेकर : (१८२७ – १८९७). महाराष्ट्रातील तंतुवाद्यांचे एक आद्य प्रवर्तक. त्यांच्या जन्ममृत्यूच्या निश्चित तारखा उपलब्ध नाहीत. त्यांचा जन्म शिकलगार (सतारमेकर) घराण्यात मिरज (जि. सांगली) येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हुसेनसाहेब. त्यांचे फरीदसाहेबांच्या लहानपणीच निधन झाले. त्यानंतर फरीदसाहेब यांचे पालनपोषण त्यांचे वडीलबंधू मोईद्दिन यांनी केले. हे कुटुंब परंपरागत शिकलगार व्यवसाय करीत असे. तलवारी, भाले, बर्ची, लढाईत वापरली जाणारी शस्त्रे ते बनवीत. इंग्रजांच्या राजवटीत लढाईची शस्त्रे कमी प्रमाणात लागू लागली, त्यामुळे यांनी कात्र्या, चाकू, सुरे आणि सुतारकामात लागणारी शस्त्रे इत्यादी बनविण्यास सुरुवात केली. मोईद्दिन यांनी फरीदसाहेबांना ही विद्या शिकवून त्यात तरबेज केले.

फरीदसाहेबांना संगीतात रुची असल्याने हळूहळू त्यांनी सारंगीचा ढाचा, नाटकासाठी लागणारी तंतुवाद्ये, एकतारी इत्यादी वाद्ये तयार करण्यास सुरुवात केली. शिवाय सारंगीची खोकी, तमाशाला लागणारी वाद्ये व भजनी सुरसोटे जोडव्यवसाय म्हणून ते बनवीत असत. त्या काळी गवई लोक महाराष्ट्रात येताना उत्तर भारतातून तंबोरे, सतारी आणत. त्यांची गरजेनुसार दुरुस्ती फरीदसाहेब करून देत असत. वाद्यांच्या बनावटीकडेही त्यांचे बारीक लक्ष असे. त्यावेळी महाराष्ट्रात फारशी वाद्ये बनत नसत. तंबोरे, सतारी जयपूर, लखनौ, बनारसहून येत असत. ते खर्चाचे काम असे. त्यामुळे दूरदूरची वाद्ये फरीदसाहेबांकडे दुरुस्तीसाठी येत. त्यावेळी ते लक्षपूर्वक संपूर्ण वाद्य खोलून त्याचा अभ्यास करीत. सुमारे वीस-बावीस वर्षांच्या मेहनतीने त्यांना वाद्यांची संपूर्ण बनावट लक्षात आली व त्यांनी स्वत: तंतुवाद्ये बनविण्यास सुरुवात केली. बऱ्याच प्रयत्नानंतर ते उत्तमप्रकारे तंबोरे, सतारी व दिलरूबे बनवू लागले आणि त्यांचे या बाबतीत खूपच नाव झाले. तंतुवाद्य बनविण्याचे त्यांनी ज्यावेळी ठरविले, त्यावेळी सरस, रंग, लाख, पॉलिश, त्यासाठीची हत्यारे यांची वानवा होती. कुणी साधू बैरागी आला तर भिक्षा घालून त्याच्याकडील तुंबा घेणे, चांभाराकडील जोडे भिजवून सरस करणे, झाडांचा डिंक गोळा करून, तो मळून त्याची लाख करणे असे करत करत त्यांनी सुरुवातीस सामग्री जमा केली. मोईद्दिनसाहेबांकडून जव्हारी काढण्याची कला शिकून ते पारंगत झाले. छत्रीच्या तारा तापवून निरनिराळ्या आकाराच्या छिद्रांमधून खेचवून त्यांनी तारा तयार केल्या. स्पिरीटचा उपयोग करून पॉलिश तयार करण्यात ते तरबेज झाले आणि वाद्ये झळाळू लागली. पुढे फरीदसाहेबांचा नातू हुसेनसाहेबांच्या कारकीर्दीत मिरजेच्या वाद्यांची कीर्ती भारतभर झाली आणि देशभरातून त्याला मागणी येऊ लागली (१८९७). विष्णु दिगंबर पलुस्कर यांनी गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केल्यानंतर त्यांनी बहुतांश वाद्ये मिरजेहून मागविली होती. त्यांच्या अनेक शिष्य-प्रशिष्यांनीही ही परंपरा पाळली.

तंतुवाद्ये बनविण्याच्या या व्यवसायाचा पाया समर्थपणे घालून आणि ही विद्या पुढील पिढीला देऊन फरीदसाहेबांचे मिरज येथेच निधन झाले.

फरीदसाहेबांचा वारसा मिरजेतील अनेक तरुण कलाकार आता पुढे नेत आहेत. ते तंतुवाद्यनिर्मितीत अनेक आधुनिक प्रयोग करीत आहेत. पारंपरिक पद्धतीमध्ये तंतुवाद्यांना स्पिरिट मिसळून पिवळा, तपकिरी आणि बैंगनी रंग देत असत. त्याऐवजी आता विविध रंगामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेऊन ही वाद्ये आकर्षक पद्धतीने तयार करून मिळतात. त्यामुळे देशात आणि परदेशातदेखील येथील वाद्यांना मागणी आहे.

संदर्भ :

समीक्षक : सु. र. देशपांडे