(सनबर्ड). एक लहान व आकर्षक पक्षी. सूर्यपक्ष्यांचा समावेश पॅसेरिफॉर्मिस गणाच्या नेक्टॅरिनिइडी पक्षिकुलात केला जातो. जगात त्यांच्या १५ प्रजाती आणि १३२ जाती आहेत. भारतात त्यांच्या तीन जाती आढळून येतात. हिमालयात समुद्रसपाटीपासून १,७०० मी. उंचीपर्यंत आणि दक्षिण भारतातील डोंगरात समुद्रसपाटीपासून २,४०० मी. उंचीपर्यंत ते आढळतात. सूर्यपक्षी हे बागा, शेते, मळे व झुडपात राहतात. संस्कृत भाषेत सूर्यपक्ष्याच्या नराला ‘शिंजिर’ आणि मादीला ‘शिंजिरिका’ म्हणतात. भारतात सूर्यपक्ष्याची सिनिरिस एशियाटिका (जांभळा सूर्यपक्षी) ही जाती सर्वत्र दिसून येते. पुढील वर्णन याच सूर्यपक्ष्याचे आहे –

जांभळा सूर्यपक्षी (सिनिरीस एशियाटिका)

जांभळ्या सूर्यपक्षाच्या शरीराची लांबी १० सेंमी.पेक्षा कमी असून तो चिमणीपेक्षाही लहान असतो. चोच लांब, अणकुचीदार, बाकदार व काळी असून पाय काळे असतात. विणीच्या हंगामात नराचे संपूर्ण डोके, मान, पाठ, गळा, छाती जांभळ्या रंगाची होते व त्यात हिरव्या, निळ्या छटा दिसतात. पंख तपकिरी काळे असतात; शेपटी निळसर काळी असते; छातीवर एक तांबूस तपकिरी आडवा पट्टा असतो; पोटाकडची बाजू मंद जांभळट काळी असते. विणीचा हंगाम नसताना नराचा रंग मादीच्या रंगासारखा होतो; परंतु त्याच्या हनुवटीपासून पोटापर्यंत जांभळ्या रंगाचा पट्टा असतो. मादीची वरची बाजू, पंख, डोके आणि मान हिरवट तपकिरी असते. पोटाकडची बाजू पिवळी, तर शेपटी गडद तपकिरी असते. नर व मादी वेगवेगळे दिसतात. नर मादीपेक्षा मोठा असून त्याची शेपटी लांब असते. बहुतेक जातींतील नराचे रंग भडक व आकर्षक असतात.

सूर्यपक्ष्याची जीभ लांब व बारीक नळीसारखी असून तिने तो सर्व प्रकारच्या फुलातील मकरंद चोखून घेतो. फूल मोठे असले तर फुलातील मधाच्या कपाच्या वर चोचीने भोक पाडून त्यातून तो मकरंद शोषून घेतो. त्यासाठी त्याची चोच वळलेली असते. काही वेळा तो फांदीवर बसून मकरंद मिळवितो. मकरंद हे त्याचे मुख्य अन्न असले, तरी काही वेळा तो फुलांवरील कीटक व फळे खातो.

जांभळ्या पाठीचा सूर्यपक्षी (लेप्टोकोमा झेलोनिका)

सूर्यपक्षी दिनचर असतात. सामान्यपणे ते जोडीने किंवा लहान थव्याने आढळतात. त्यांचे उड्डाण वेगवान आणि सरळ असते. सूर्यपक्ष्याचा आवाज कानाला गोड वाटतो. विणीच्या हंगामात एखाद्या ठिकाणी बसून नर आपले पंख खाली-वर करत सुरात गात बसतो. प्रजननकाळ एप्रिल–जून असा असतो. त्याचे घरटे सुरेख असून मोठ्या कौशल्याने बनविलेले असते आणि जमिनीपासून सु. २ मी. उंचीवर एखाद्या काटेरी वेलीला किंवा झुडपाला टांगलेले असते. या लोंबत्या घरट्यात येण्याजाण्यासाठी एका बाजूस वाटोळे भोक असून त्याच्यावर पोस्टाच्या पेटीसारखे झाकण असते. मादी २-३ पांढरी अंडी घालते; त्यांवर करडे ठिपके असतात. फक्त मादी घरटे बांधते आणि अंडी उबविते. नर व मादी दोघेही पिलांना भरवितात. बंदिवासात त्यांचा आयु:काल सु. १२ वर्षे आढळून आला आहे. पळस, बाभूळ आणि धायटी या वृक्षांचा प्रसार घडून येण्यात सूर्यपक्ष्यांचा मोठा हातभार लागतो.

लोटेनचा सूर्यपक्षी (सिनिरिस लोटेनियस)

भारतात सूर्यपक्ष्याच्या आणखी दोन जाती मुख्यत: आढळतात. त्यांची शास्त्रीय नावे लेप्टोकोमा झेलोनिका (जांभळ्या पाठीचा सूर्यपक्षी) आणि सिनिरिस लोटेनियस (लोटेनचा सूर्यपक्षी) अशी आहेत. जांभळ्या पाठीचा सूर्यपक्षी (लेप्टोकोमा झेलोनिका) या जातीच्या नराचे डोके, वरचा भाग व छाती धातूसारखी चकचकीत हिरवी, नारिंगी, किरमिजी आणि जांभळी अशा रंगांची असते. बूड निळसर जांभळे असते. खालचा भाग गर्द पिवळा असतो. मादी जांभळ्या रंगाची दिसते, परंतु हनुवटी व गळा राखट पांढरा आणि खालचा भाग गर्द पिवळा असतो. लोटेनचा सूर्यपक्षी (सिनिरिस लोटेनियस) ही जाती जांभळ्या सूर्यपक्ष्यासारखी सि. एशियाटिका दिसत असली, तरी शरीर व चोच दोन्ही किंचित जांभळ्या सूर्यपक्ष्यापेक्षा लांब असतात. ही जाती भारत आणि श्रीलंका या देशांत दिसून येते. नर बहुधा झाडांच्या शेंड्यावर किंवा तारांवर बसून गाताना दिसतात. या जातीतील नर आणि मादी दोघेही घरटे बांधतात आणि पिलांचे संगोपन करतात.