प्रस्तावना : वृद्धापकालीन परिचर्या शास्त्रात परिचारिका वयस्कर किंवा वृद्ध लोकांना सेवा पुरवितात. यामध्ये वृद्ध व्यक्ती, त्यांचे कुटुंब सदस्य आणि वयस्कर व्यक्ती समूह यांना आरोग्य सेवा पुरविताना त्यांना आरोग्यदायी वार्धक्यासोबत अधिकाधिक कार्यक्षमता जपून त्यांचे आयुष्यमान वाढविण्यासाठी मदत करतात. १९७० पासून वार्धक्य परिचर्येची संकल्पना बदलून वृद्धापकालीन परिचर्या शास्त्र (Gerontological nursing) असे संबोधन्यात येते व ही परिचर्येची एक स्वतंत्र शाखा मानली जाते.

परिचर्येचा मुख्य हेतु : वयस्कर लोकांच्या आरोग्य समस्या सोडवून आरोग्याच्या गरजा पूर्ण करणे व कार्यक्षम आयुर्मान वाढविणे. वयस्कर लोकांचे वाढलेले आयुर्मान आणि त्यांची  लोकसंख्या हा आरोग्यसेवेचा मोठा भाग व्यापणारी लोकसंख्या ठरू शकत आहे. कारण तरुण व्यक्तीपेक्षा वयस्कर व्यक्ती आरोग्य सेवा अधिक प्रमाणात वापरतात.

वृद्धापकाळ एक प्रक्रिया (Aging Process) : वार्धक्य प्रक्रिया ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात घडणारी घटना असते. व्यक्ती तरुण असताना शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या वाढत असतो त्यासोबत परिपक्वता येते. माणसाच्या वयाच्या साधारण ३० वर्षे पर्यंत हे अव्याहत पणे चालू असते. यावेळी त्या व्यक्तीत जास्तीत जास्त कार्यक्षमता प्राप्त होते. काही बाबतीत ही कार्यक्षमता आयुष्यभर वाढत राहते. आजच्या काळात साधारणपणे वयवर्ष ६५ च्या व्यक्ती आरोग्यदायी, आनंदी व स्वावलंबी आढळतात. परंतु काही व्यक्तींमध्ये कार्यक्षमता कमी होत जाते. वैद्यकीय व परिचर्या गट वृद्ध व्यक्तीकडे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व, अनुभवाचा एक स्त्रोत म्हणून आणि आरोग्य समस्यांकडे आव्हान या दृष्टीकोनातून बघते. या संकल्पनेतूनच वृद्धापकालीन परिचर्या शास्त्र या विशिष्ट प्रशिक्षणाची गरज असते.

वृद्ध व्यक्तीची सर्वंकष तपासणी : प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य तपासणीत पुढील बाबींचा समावेश केला जातो. बहुद्देशीय आरोग्य सेवा उदा. वैद्यकीय + मानसिक + एकंदरीत कार्यक्षमता व त्यात येणारे अडथळे इ. तपासणी करणे.

वृद्ध व्यक्तीचे आरोग्य मूल्यमापन हे इतर वैद्यकीय आरोग्य मानाच्या बाबतीत वेगळे असते कारण :

  • वृद्ध व्यक्तीच्या आरोग्य समस्या ह्या अनेकविध आणि क्लिष्ट असतात.
  • वृद्ध व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर त्यांच्या आयुष्याची गुणवत्ता ठरते.
  • वृद्ध व्यक्तीस आरोग्य सेवा देताना विविध आणि एकत्रित वैशिष्ट्यपूर्ण सेवांचा (Integreted & specialized) समावेश करावा लागतो.

वार्धक्यातील महत्‍त्वाच्या ५ समस्या : ( five ‘I’ in Geriatrics )

  • सर्व साधारण बुद्धिमत्तेचा ऱ्हास (I = Intellectual Impairment)
  • शारीरिक व मानसिक हालचाली मंदावणे (I = Immobility)
  • आत्मसंयमाचा / निग्रहाचा  अभाव (I = Incontinence)
  • आजाराचे निदान किंवा इलाज करताना निर्माण झालेल्या आरोग्य समस्या (I  = Iatrogenic disorders)
  • शारीरिक व मानसिक अस्थिरता (I = Instability)

वरील सर्व निरीक्षणे व अन्य तपासण्या केल्यानंतर वार्धक्य शास्त्रज्ञ व परिचारिका वृद्ध व्यक्तींसाठी /रोग्यांसाठी बहुद्देशीय आणि दीर्घ कालीन असे आरोग्य सेवेचे नियोजन करतात ज्यामध्ये खालील बाबींचा समावेश केला जातो.

  • प्राथमिक व आवश्यक आरोग्य सेवा शुश्रूषा ( Primary Health Care )
  • आरोग्य आणि पुनर्वसन सेवा. ( Health & Rehabilitation services )
  • गुंतागुंतीच्या आरोग्य समस्यांचे सेवा नियोजन आणि व्यवस्थापन करणे.( Intricate process health care management )
  • दीर्घकालीन उपाय योजना ( Long Term Health Care Plans)
  • उत्तम आरोग्य सेवेचे स्त्रोत किंवा संसाधने यांवर आधारित आरोग्य सेवेचे व्यवस्थापन
  • वार्धक्यातील आरोग्य समस्या सोडविताना उपलब्ध संसाधनांद्वारे सेवा पुरविणे.

वृद्धांमध्ये आढळणाऱ्या आरोग्य समस्या : या समस्या वृद्ध व्यक्तीच्या साधारणपणे शारीरिक, मानसिक व सामाजिक कार्यक्षमता कमी झाल्यामुळे आढळतात.

  • दृष्टी दोष : जवळचे अथवा लांबचे न दिसणे, मोती बिंदू , डोळे दुखणे, डोळ्यावरील एकदम येणारा प्रकाश झोत सहन न होणे इ.
  • ऐकण्यातील दोष : कमी ऐकू येणे, काही औषधांचा दुष्परिणाम झाल्यामुळे.
  • हृदय क्रिया : छातीत धडधड होणे, दम लागणे, रक्त दाब वाढणे, जुनाट हृदय रोग असणे, रक्त वाहिन्या टणक होणे इ.
  • फुप्‍फुस : जुनाट खोकला, श्वास घेण्यास त्रास, न्यूमोनिया, दमा इ.
  • पचन संस्था : स्वाभाविक मल निस्सरण न होणे ( Constipation), अतिसार /जुलाब होणे, शरीरात द्रव कमतरता ( Dehydration ), विविध जीवनसत्‍त्वे किंवा क्षारांची कमतरता झाल्यामुळे रक्तक्षय सारखे आजार, आतडी किंवा गुदद्वाराचे कर्करोग इ.
  • मुत्र विसर्जन संस्था : वारंवार व अनियंत्रित लघवीचा त्रास, पुरुषांमध्ये अष्ठीला ग्रंथीचा कर्करोग इ.
  • स्नायू व हाडे : सांधेदुखी, स्नायू दुखी, पाठ दुखणे, संधिवात (Arthritis) हाडाचा ठिसूळपणा, हाड निखळणे/तुटणे (Fracture) इ.
  • चेता संस्था (Neurological ) : तात्पुरती मूर्च्छा येणे (Syncope) क्षमतेची क्षती (Transient loss) जसे बोलणे /ऐकणे, चालणे, अचानकपणे रक्तदाब कमी होणे, झटके येणे, हार्टॲटक, स्ट्रोक, स्मृतीभ्रंश, झोप न येणे इ.
  • हात –पाय : सूज येणे, दुखणे, संधिवात, हातापायात पेटके (Cramps) येतात.
  • शारीरिक वजन : जास्त होणे /लठ्ठ पणा किंवा वजन कमी होणे /कृश होणे.

स्वाभाविक वृद्धत्वामधील होणारे बदल : केस पातळ व पांढरे होणे, सर्वच इंद्रियांची कार्यक्षमता कमी होणे, शरीरावर सुरकुत्या येणे, पाचक रसांची पचन संस्थेत कमतरता, लघवीचे प्रमाण वाढते, चव, वास व स्पर्श यातील ज्ञानात फरक, ऐकण्याची क्रिया मंदावते, लैंगिक आरोग्यात बदल होतात, स्त्रियांमध्ये ऋतुनिवृत्ती होणे, पुरुषांत शुक्रणुची कमतरता, झोपेचे प्रमाण कमी होणे, सामाजिक कमात कमी सहभाग, भावनिक असन्तुलन, आर्थिकदृष्ट्या परावलंबन इत्यादी. हे बदल विशेष करून धोकादायक नसतात.

वृद्ध व्यक्तीच्या परिचारिकेकडून अपेक्षा : परिचारिका खालील बाबी लक्षात ठेवते.

  • वृद्धास एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून संबोधावे. आजाराच्या नावाने नव्हे.
  • आपले म्हणणे ऐकणारे कोणीतरी असावे.
  • त्यांच्याकडे दुर्लक्ष न केल्यास ते आपल्या वेदना सहन करू शकतात.
  • त्यांची आठवण ठेवल्यास ते आनंदी असतात.
  • त्यांच्याशी त्यांना समजणाऱ्या भाषेत संवाद साधावा.
  • नियोजित शुश्रूषेविषयी व त्याचे परिणामांविषयी समजवावे.
  • स्वत:चा सहभाग असणारी व गुणात्मक आरोग्य सेवा मिळावी.
  • कुटुंब सदस्यांना (कदाचित ते पण वृद्ध) भावनिक आधार द्यावा .

वृद्धापकालीन परिचर्या निरोगीपण राखणे (Through Wellness & selfcare) :

परिचर्येच्या विविध प्रक्रिया :

  • आधारात्मक (Supportive nursing action) : वृद्ध व्यक्तीला आरोग्य समस्येतून बरे करण्यासाठी स्वावलंबी होण्याकरिता मदत करणे. उदा. वैयक्तिक स्वच्छता, आहार, व्यायाम इ. तसेच कुटुंबातील सदस्यांची मदत घेणे.
  • कार्यक्षमता वाढविणे (Generative nursing action) : वयस्क व्यक्तीला पुनर्वसनासाठी (Rehabilitative) सेवा पुरविणे. उदा., स्ट्रोक, पक्षाघात किंवा अपघातात अपंगत्व आलेले असल्यास रोजच्या दैनंदिन जीवनातील काम पार पाडण्यासाठी शारीरिक, मानसिक पुनर्वसन कुटुंब सदस्य किंवा सामाजिक संस्थेमार्फत करण्याचे नियोजन करून पूर्ण करणे.
  • संरक्षणात्मक प्रक्रिया (Protective nursing action) : विविध आजारांपासून संरक्षण करणे. आरोग्य शिक्षण देणे. इतर महत्‍त्वाचे बाबी उदा. डोळ्यांची तपासणी करून चष्मा वापरण्यास, गरज असल्यास कर्णयंत्र लावण्यास प्रेरणा देणे. चालताना आधारासाठी काठी वापरणे. आजारांसाठी मागोवा (follow up) तपासणी करणे. उदा., उच्च रक्तदाब, हार्ट डिसीज, मधुमेह इ.
  • उपचारात्मक प्रक्रिया (Curative nursing action) : औषध उपचार, वैद्यकीय सेवा पुरविणे. शुश्रूषा करताना रुग्णाच्या मानसिक व आध्यात्मिक गरजा पुरविणे.

  सारंश : परिचारिकेने वृद्धापकालीन परिचर्या देताना स्वतःला वृद्ध व्यक्तीच्या जागी समजून आरोग्य सेवा पुरवाव्यात, भावनिकता जपावी.  

संदर्भ :

  • ग्रीषा जोश, मेडीकल –सर्जिकल नर्सिंग.
  • एलिझाबेथ हरलोक, सायकॉलोजिकल ग्रोथ एंड डेव्हलपमेंट.