पॉल, संत : (सु. ५—सु. ६७). ख्रिस्ती प्रेषित, विशेषत: बिगर यहुदी समाजाचे प्रेषित (Apostle of the Gentiles) म्हणून संत पॉल ओळखले जातात. ते जन्माने ज्यू होते. त्यांचे मूळ नाव शौल (देवाला अर्पण केलेला). शौल हे नाव जुन्या काळच्या एका राजाच्या नावावरून प्रख्यात झालेले. आशिया मायनरमधील सिलिसिया प्रांतातील तार्सूस या नगरीत हिब्रू कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ते बेंजामिनच्या कुळातील परुशी (ख्रिस्तपूर्व कर्मठ यहूदी लोकांचा वर्ग) होते. ज्यू असूनही त्यांच्या वडिलांनी स्वकर्तृत्वाने रोमन नागरिकत्व मिळवले होते. सुरुवातीला तार्सूस येथे व पुढे जेरूसलेम येथे गॅमालिएल नावाच्या प्रख्यात ज्यू धर्मशास्त्रवेत्त्याजवळ पॉल यांनी अध्ययन केले (बायबल−प्रेषितांची कृत्ये २३:३). ते ज्यू धर्माचे कट्टर पुरस्कर्ते व ख्रिस्तद्वेष्टे होते. येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवले, तेव्हा ते जेरूसलेममध्ये असावे, असे मानले जाते; तथापि त्यांनी येशू ख्रिस्तास प्रत्यक्ष पाहिले नव्हते, असे अभ्यासक मानतात. ‘डीकन’ हे पद मिळालेले ख्रिस्ताचे अनुयायी संत स्टीफन यांचा दगड मारून वध करणाऱ्या ज्यू मारेकऱ्यांची वस्त्रे राखणारा, असा बायबलमध्ये त्यांचा प्रथम उल्लेख आढळतो (बायबल−प्रेषितांची कृत्ये ७:५,८).
ख्रिस्तप्रणीत नव्या धर्मास त्यांचा कडवा विरोध असल्यामुळे दमास्कसला ख्रिस्तानुयायांचा उच्छेद व छळ करण्यासाठी हुकूमनामा घेऊन जात असता वाटेत त्यांच्यासमोर सु. ३५ मध्ये दिव्य प्रकाश चमकला (बायबल−प्रेषिताची कृत्ये ९:३) आणि ‘शौला… शौला, तू माझा छळ का करतोस?’ अशी वाणी त्याला ऐकू आली. ‘तू कोण आहेस?’, शौलाच्या ह्या प्रश्नास, ‘तू ज्याचा छळ करतोस, तोच मी येशू आहे’, असे उत्तर त्यांना मिळाले व दमास्कस शहरात जाण्याचा आदेशही मिळाला. तीन दिवस त्यांची दृष्टी गेली होती; तथापि हनन्या (वृनन्या) नावाच्या एका ख्रिस्तानुयायाने त्यांना स्पर्श करून त्यांच्यासाठी प्रार्थना केल्यावर त्यांना पूर्ववत दृष्टी प्राप्त झाली. ह्या घटनेमुळे मत परिवर्तन होऊन ते ख्रिस्तानुयायी बनले. त्यांनी पॉल हे ग्रीक पद्धतीचे नाव धारण केले. पॉल म्हणजे कनिष्ठ. तीव्र विरोधास तोंड देऊन त्यांनी अतिशय जोमाने ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा प्रसार केला.
पॉल यांना अनेक वेळा दगडमार, लाठीमार व कारावास यांनाही तोंड द्यावे लागले. धर्मप्रचारार्थ त्यांनी दूरदूरच्या प्रदेशांत तीन वेळा प्रदीर्घ दौरे केले (इ. स. ४६ ते ४८, ४९ ते ५३ व ५४ ते ५८). पश्चिमेकडे सायप्रस-आशिया मायनरपासून यूरोपपर्यंत त्यांनी शुभवर्तमानाचे (Gospel) लोण पोहोचविले. अरबस्तानलाही त्यांनी भेट दिली. (बायबल−गलतीकरांस पत्र १:१७). अनेक लहानमोठे ख्रिस्ती समूह उभारण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी पार पाडले. ख्रिस्ताचे वरिष्ठ शिष्य व पॉल ह्यांच्यातही एका महत्त्वाच्या बाबतीत धार्मिक मतभेद होता. ख्रिस्त शिष्यांच्या मते ज्यू नसलेल्या लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारताना प्रथम ज्यू धर्मतत्त्वे स्वीकारावीत व सुंता करून घ्यावी. पॉल यांच्या मते व्यक्ती कोणत्याही धर्माची व देशाची असली, तरी तिला सरळ ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करून तारण प्राप्ती करून घेता येते. त्यांच्या या विचारप्रणालीमुळे त्यांस ‘बिगर यहुदी लोकांचा प्रेषित’ असे संबोधले जाते (बायबल−रोमकरांस पत्र ११:१३). शुभवर्तमानाचा प्रसार करणे व चर्चला स्थैर्य आणणे ह्या कार्यासाठी पोषक ठरणारी अनेक पत्रे पॉल यांनी आपल्या मित्रांना व चर्च संस्थांना उद्देशून लिहिली. ‘नव्या करारा’त अशा १३ पत्रांचा समावेश केला आहे. ख्रिस्ती ईश्वरविद्येची (Theology) उभारणी बहुतांशी ह्या पत्रातील विचारांवरच झालेली आहे.
पॉल यांना जन्मत:च रोमन नागरिकत्वाचे हक्क होते (बायबल−प्रेषिताची कृत्ये २२:२५,२९). न्यायालयीन कामात दिरंगाई झाल्यास ते थेट रोमचा सम्राट सिझर याच्याकडे कारवाईची अपेक्षा करी. सम्राट निरो याच्या अंमलात ख्रिस्ती अनुयायांचा जो अमानुष छळ झाला, त्यात पॉल यांनाही सु. ६७ मध्ये हौतात्म्य प्राप्त झाले, असे मानण्यात येते.
नंतरच्या ख्रिस्ती धर्म विकासावर संत पॉल यांचा अत्यंत व्यापक असा ठसा उमटला. येशू ख्रिस्ताचा व त्याच्या सुरुवातीच्या अनुयायांचा संदेश निश्चित अशा धर्मसिद्धांतांच्या स्वरूपात सर्वप्रथम मांडणारे तेच तत्त्वज्ञ होय. त्यांनी ख्रिस्ताच्या जीवनातील मुख्य घटना व त्याची शिकवण यांना सेमाइट व ज्यू विचारवंतांनी मांडलेल्या सिद्धांतांच्या धर्तीवर, पण अत्यंत सोप्या भाषेत ख्रिस्ती सिद्धांतांचे स्वरूप प्राप्त करून दिले. त्यासाठी त्यांनी आपल्या पद्धतशीर अध्ययनाचा व ख्रिस्तपूर्व ग्रीकांश (Hellenistic) पार्श्वभूमीचा उत्कृष्ट उपयोग करून घेतला. संत आल्बर्ट द ग्रेट, संत आन्स्लेम, संत थॉमस अक्वायनस इत्यादी धार्मिक तत्त्वज्ञांवर त्यांचा मोठा प्रभाव पडलेला दिसतो. ‘नव्या करारा’तील तेरा पत्रे (Epistles) ही संत पॉल यांची पत्रे असल्याची समजूत आहे; तथापि त्यांतील चार (१, २ ही करिंथिकरांस तसेच गलतीकरांस व रोमकरांस) पत्रे मात्र त्यांचीच असल्याचे सर्व बायबल अभ्यासक मानतात. उर्वरित पत्रांबाबत मात्र अभ्यासकांत मतभेद आहेत. ८० ते ९० च्या सुमारास लिहिलेल्या प्रेषितांची कृत्ये (Acts of the Apostles) ह्या संत लूककृत ग्रंथात त्यांचा मित्र संत पॉल यांच्या चरित्राचा बराच भाग आलेला असून अभ्यासक तो बराचसा प्रमाणभूत मानतात.
संदर्भ :
- Barclay, William, The Mind of St. Paul, Toranto, 1958.
- Buck, C. H.; Taylor, Greer, Saint Paul : A Study of the Development of His Thought, New York, 1969.
- Klawans, Jonathan, Impurity and Sin in Ancient Judaism, Oxford, 2004.
- Pollock, John, The Apostle : A Life of Paul, New York, 1969.
- Sanders, E. P. Paul and Palestinian Judaism, Minnesota, 1977.
- Wright, N. T. Paul and the Faithfulness of God, Minnesota, 2013.
- Wright, N. T. What Saint Paul Really Said, Michigan, 1997.
- https://www.ancient.eu/Paul_the_Apostle/
- https://www.biographyonline.net/spiritual/st-paul.html