येशू ख्रिस्त यांच्या पवित्र नावाची आद्याक्षरमुद्रा. प्रत्येक देशाचा राष्ट्रध्वज असतो. अनेक कंपन्यांचे मानचिन्ह किंवा बोधचिन्ह असते. बोधचिन्हाला इंग्रजीत ‘एम्ब्लेम’ म्हणतात. ते प्रतिकात्मक असले, तर त्याला ‘सिम्बॉल’ म्हटले जाते. उदा., कबुतर हे शांतीचे चिन्ह मानले जाते. एखाद्या राजघराण्याचे कुलमानद्योतक म्हणजेच मानचिन्ह असेल, तर त्याला ‘कोट ऑफ आर्म’ म्हणतात आणि तेच चिन्ह आद्याक्षरमुद्रा उमटवलेले असले, तर त्याला ‘लोगो’ किंवा ‘मोनोग्रॅम’ संबोधिले जाते.

आयएचएस (IHS) किंवा जेएचएस (JHS) हे येशू ख्रिस्त यांच्या नावाचे आद्याक्षरमुद्रा उमटविलेले चिन्ह आहे. त्याच्यातून त्यांच्या नावाची आद्याक्षरमुद्रा स्पष्ट दिसून येत असल्याने IHS या बोधचिन्हाचा वापर ख्रिस्ती धर्मात सर्वत्र मोठ्या अभिमानाने केला जातो. विशेषत: मिस्साविधीत वापरल्या जाणाऱ्या पवित्र भाकरीवर (होस्टवर), वेदीवस्त्रांवर, मिस्सा बलिदान अर्पण करताना धर्मगुरू वापरत असलेल्या विधीवस्त्रांवर, तसेच अनेक धार्मिक पुस्तकांवर आणि धार्मिक वस्तूंवरही IHS चिन्ह कोरलेले पाहावयास मिळते.

जुन्या लॅटिन भाषेत J हे मुळाक्षर I मुळाक्षराप्रमाणेच लिहिले जाते. उदा., Jesus हा शब्द Iesus असा लिहिला जातो. त्यामुळे अनेक ठिकाणी JHS ऐवजी IHS असे लिहिलेले दिसून येते (क्रूसावर JNRI ऐवजी INRI). ग्रीक भाषेत येशू हा शब्द IHSOYS असा लिहिला जातो. यातील पहिल्या तीन आद्याक्षरांच्या संक्षिप्त रूपावरून येशू ख्रिस्त यांच्या नावासाठी सदर बोधचिन्ह तयार करण्यात आले.

लॅटिन भाषेतील Iesus हा शब्द ग्रीक भाषेतील Inoou’s किंवा Iisou’s या शब्दांचे लिप्यंतर (Transliteration) आहे आणि या शब्दाचा संदर्भ हिब्रू भाषेतील Yeshua या नावाशी लागतो. कुठल्याही इझ्राएली माणसाला येशू हे नाम हिब्रू भाषेत बोलायला सांगितले, तर तो Yeshu (येशू) असेच म्हणून दाखवेल. हे नाव ‘जुन्या करारा’तील Joshua या नावाशी मिळतेजुळते आहे. म्हणून मराठी भाषेत Jesus या शब्दासाठी येशू हेच नाव वापरले जाते.

पाश्चिमात्य संस्कृतीतून आणखी एक गोष्ट निदर्शनास येते. ती म्हणजे येशू ख्रिस्त यांच्या (Jesus) नावातील पहिली तीन आद्याक्षरे IHS ही ग्रीक मुळाक्षरे lota, eta, sigma या तीन अक्षरांवरून घेण्यात आली आहेत. त्याचा अर्थ येशू असाच होतो.

अशाप्रकारे IHS किंवा JHS हे येशू ख्रिस्त यांच्या पवित्र नावाचे संक्षिप्त रूप आहे. तरीही याला काही पंडितांनी गैरसमजुतीतून दुसरेही अर्थ दिले आहेत. उदा., JHS म्हणजे Jesus Hominum Salvator म्हणजे येशू मानवजातीचा तारणहार.

येशू ख्रिस्त यांच्या पवित्र क्रूसाच्या संदर्भात या बोधचिन्हाचा अर्थ पुढीलप्रमाणे सांगितला जातो : In Hoc Signo (Vinces) म्हणजे In this sign (thau shalt conquer) या चिन्हात तू विजयी होशील; तसेच J.H.S. म्हणजे In Hac (in this cross is salvation) म्हणजे ‘या क्रूसाठायी तारण आहे’.

अशाप्रकारे IHS किंवा JHS या ख्रिस्ती बोधचिन्हांचा अर्थ कोणी काहीही लावला, तरी ते चिन्ह म्हणजे येशू ख्रिस्त यांच्या नावाची आद्याक्षरमुद्रा आहे व ते ख्रिस्ती लोकांसाठी मानचिन्ह असल्याचे सर्वमान्य आहे.

संदर्भ :

  • Barker, Kenneth, Ed., The NIV Study Bible, Michigan, 1984.
  • Doyle, Charles Hugo, Reflections on the Passion, Milwaukee, 1956.
  • Maurice, Meschler, The Life of Our Lord Jesus Christ, London, 1961.
  • दहिवाडकर, अनिल, बायबल देवाचा पवित्र शब्द, पुणे, २०१२.

समीक्षक : फ्रान्सिस कोरिया