झेव्हिअर, संत फ्रान्सिस : (७ एप्रिल १५०६—३ डिसेंबर १५५२). भारतात व जपानमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसाराचे कार्य करणारे प्रख्यात स्पॅनिश जेज्वीट (जेझुइट) मिशनरी. जन्म स्पेनमध्ये नव्हारो येथे एका सरदार घराण्यात. पॅरिस विद्यापीठात तत्त्वज्ञान व धर्मशास्त्र ह्या विषयांचा अभ्यास करून १५३० मध्ये ते एम. ए. झाले. पॅरिस विद्यापीठात असतानाच त्यांचा इग्नेशिअस लॉयोला व पीटर फेबर यांच्याशी संबंध येऊन ह्या तिघांनी पुढाकार घेऊन ‘येशूचे स्नेही’ (Society of Jesus) हा व्रतस्थ धर्मगुरूंचा संघ स्थापन केला.

फादर झेव्हिअर यांनी १५४० पर्यंत या संस्थेचे चिटणीस म्हणून काम केले. नंतर पोर्तुगालचा राजा तिसरा जॉन याने त्यांना पूर्वेकडील पोर्तुगीज वसाहतींत मिशनरी म्हणून पाठविण्याची विनंती केली. प्रथम त्यांनी गोव्यात (१५४२−४५) आणि नंतर जपानमध्ये (१५४९−५१) ख्रिस्ती धर्मप्रसाराचे काम केले. भारत व जपान यांदरम्यानच्या अनेक देशांमध्ये हजारो लोकांना त्यांनी ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. नंतर चीनमध्ये मिशनरी कार्यासाठी जाण्याची त्यांची उत्कट इच्छा होती. चीनमध्ये जाण्याच्या हेतूने ते चीनजवळील सॅन्सिअन (सध्याचे शांगा-च्वान) बेटावर आलेदेखील; परंतु अचानक आलेला आजार उलटल्यामुळे त्यांचे तेथेच निधन झाले.

मूळस्थितीत राहिलेले त्यांचे शव तेथून पणजीजवळील जुने गोवे या नगरीत आणण्यात आले आणि येथील बाँ जेझूस कॅथिड्रलमध्ये ते ठेवण्यात आले. तेथे त्यांचे एक देखणे आसनही उभारण्यात आले असून १६९८ या वर्षी इटलीमधील फ्लॉरेन्स या नगरीतील कलाकारांना खास आमंत्रण करून इटालियन मार्बलमध्ये एक उंचीपुरी वेदी तयार करण्यात आली आहे. त्या वेदीवर एक चांदीने मढवलेली पेटिका ठेवण्यात आली आहे. या चांदीच्या पेटीत असलेल्या मृतदेहाचे दर्शन आपल्याला एरव्ही खालूनच घ्यावे लागते. ठरावीक कालांतराने हे शवदर्शनासाठी खुले करण्यात येते. अलीकडच्या काळात दर दहा वर्षांनी सदर मृतदेह सार्वजनिक दर्शनासाठी खुला केला जातो. फेब्रुवारी १७८२ पासून नोव्हेंबर २०१४ पर्यंत एकूण १७ प्रसंगी हा मृतदेह प्रत्येकी सुमारे दोन महिने भाविकांच्या दर्शनासाठी खुला ठेवण्यात आला होता. त्यांच्या थडग्याबाबत अनेक चमत्कार व अद्भूत घटना घडल्याच्या आठवणी लोकांत रूढ आहेत. ३ डिसेंबर रोजी त्यांचा ‘फीस्ट डे’ तेथे मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.

एक थोर अन्वेषक, महान मिशनरी व कुशल संघटक म्हणून संत झेव्हिअर यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते. ख्रिस्ती धर्मासाठी त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत अपार कष्ट सोसून आपले आयुष्य वेचले. जपानमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारा आद्य मिशनरी म्हणून तसेच ‘इंडिजचा प्रेषित’ म्हणून त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. १६२२ मध्ये इग्नेशिअस लॉयोला याच्यासोबत झेव्हिअर यांचे नाव ख्रिस्ती संतांच्या मालिकेत अंतर्भूत केले गेले. १९२७ मध्ये पोप महोदयांनी त्यांना ‘पेट्रन ऑफ ऑल मिशन्स’ असा किताब बहाल केला.

संदर्भ :

                                                                                                                                                         समीक्षक : कोरिया, फा. फ्रान्सिस