मूग ही वर्षायू वनस्पती फॅबेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव विग्ना रेडिॲटा आहे. ती मूळची भारतीय उपखंडातील असून भारत, चीन आणि दक्षिण आशियातील काही देशांत तिची लागवड होते. हिमालयात ती वन्य स्थितीत आढळते. तसेच आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि राजस्थान या राज्यांत तिची लागवड केली जाते.

मूग (विग्ना रेडिॲटा) : (१) पाने व शेंगांसहित वेल, (२)फुले व शेंगा असलेली फांदी व (३) बिया

मुगाची शिंबावंत वेल ४५–१२० सेंमी. उंच वाढते. तिच्या खोडावरील काही टोकाकडील वरच्या फांद्या आधाराभोवती वेढे घालत वर चढतात. पाने संयुक्त व त्रिदली असून पर्णदलांचे देठ लांब असतात. पर्णदलांचा आकार अंडाकृती असून ती क्वचित खंडित असतात. त्यांच्या तळाशी लहान उपपर्णे असतात. फुले लहान आणि पोपटी किंवा पिवळी असून ती लांब वृंतावर झुबक्याने येतात. एका झुबक्यात १०–२५ फुले असतात. फळे म्हणजेच शेंगा ५–१० सेंमी. लांब, बारीक, सरळ, दंडगोलाकार, काहीशा लवदार किंवा गुळगुळीत असतात. प्रत्येक शेंगेत १०–१५ गोलसर, हिरव्या, गडद हिरव्या, पिवळ्या/तपकिरी किंवा जांभळट तपकिरी बिया असतात. या बियांनाही मूग म्हणतात.

भारतात मूग हे सर्वत्र वापरले जाणारे कडधान्य असून ते पौष्टिक आहे. मुगाच्या १०० ग्रॅ. दाण्यांमध्ये ६% कर्बोदके, ३% प्रथिने, -जीवनसत्त्व आणि ब-समूह जीवनसत्त्वे असतात. यांखेरीज पोटॅशियमयुक्त खनिजे अधिक प्रमाणात असतात. अनेक खाद्यपदार्थांत मुगाचा उपयोग करतात. वरणासाठी डाळ किंवा दाण्यांना मोड आणून उसळ व आमटी करतात. मुगाच्या डाळीपासून खिचडी, हलवा, पिठाचे लाडू इ. विविध खाद्यपदार्थ बनविले जातात. मुगाची डाळ शीत व पित्तशामक असून पचायला हलकी असते. मुगाचे सार ज्वर आलेल्या व्यक्तीस त्याची तहान भागविण्याकरिता देतात किंवा अन्न म्हणून देतात. काही लोक त्वचेच्या विकारावर, अर्बुदावर व गळूवर आणि पू लवकर बाहेर पडावा यांसाठी शेंगेचे चूर्ण लावतात.

चीनमध्ये मुगाच्या दाण्यांपासून टँग्यूई हे गोड पक्वान्न बनवितात. इंडोनेशियामध्ये मूग, साखर, नारळाचे दूध आणि किंचित आले टाकून खिरीप्रमाणे गोड पदार्थ तयार करतात. हाँगकाँगमध्ये साल काढलेल्या मुगाच्या दाण्याची पेस्ट करून त्यापासून आइसक्रीम तयार करतात. फिलिपीन्समध्ये मासे तसेच कोळंबी मुगाच्या दाण्यांबरोबर एकत्र शिजवून कालवण बनवितात.

प्रतिक्रिया व्यक्त करा