युद्धाच्या आघाडीवर वेगवेगळ्या हालचाली आणि कारवाया सातत्याने चालू असतात. भावी कारवायांची पूर्वतयारी, योजनेच्या आराखड्यांची आखणी, शत्रूच्या ठावठिकाण्याविषयी आवश्यक माहिती गोळा करण्याचे काम, रसदपुरवठा वगैरे कारवायांकरवी दोन्ही प्रतिस्पर्धी सैन्ये रणभूमीवर आपली सज्जता वाढविण्यात सदैव व्यग्र असतात. अशा अनेक प्रकारच्या कारवायांपैकी युद्धभूमीवर ‘गस्त घालणे’ ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. ती एक व्यापक आणि सर्वसमावेशक प्रक्रिया असून तीत आघाडीवरील सैन्याची टेहळणी, युद्धनौकांचे परिभ्रमण, चाच्यांविरुद्ध केलेली बचावात्मक कारवाई आणि विमानातून केलेली टेहळणी या सर्वांचा समावेश होतो. त्याबरोबरच आजच्या आधुनिक आणि नवनव्या विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानांमुळे अनेक प्रकारची माहिती रणभूमीवर चालकविरहित विमानांचा वापर करून किंवा अंतराळातील उपग्रहामार्फत प्राप्त केली जाऊ शकते.

गस्त ही संज्ञा अनेक अर्थांनी वापरली जाते; तथापि ही नोंद मात्र आघाडीवरील लष्कराच्या सैनिकांच्या गस्तीपर्यंतच मर्यादित आहे. लष्कराचे सैनिक जमिनीवर पायी, चिलखती गाड्यांचा वापर करून; हेलिकॉप्टरमधून, विमानातून छत्रीधारी सैनिकांना अपेक्षित स्थळी पोहचवून तसेच वाळवंटात उंटांचा वापर करून विविध प्रकारे गस्त घालू शकतात. युद्धाच्या आघाडीवर असे अनेक भाग असतात की, जिथे वेगवेगळ्या कारणांमुळे सैन्य तैनात केले जाऊ शकत नाही. अतिप्रतिकूल हवामानामुळेसुद्धा काही भागांत सैन्य तैनात करणे सोयीस्कर नसते, भारताच्या पश्चिमी आणि उत्तरी सीमांवर दुर्गम आणि अतिउंच पर्वत-शिखरांवर सैन्याच्या चौक्या उभारल्या जातात. बर्फाच्छादित प्रदेशात हिवाळ्यात त्यांतील काही चौक्या माघारी आणल्या जातात किंवा पिछाडीला कमी उंचीच्या भागात त्यांना तात्पुरते तैनात केले जाते. त्या जागी सीमासंरक्षणात काहीशी पोकळी निर्माण होते. कारगिलच्या युद्धापूर्वी पाकिस्तानी सैन्याने अशाच रिकाम्या जागांच्या संधीचा उपयोग करून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी केली होती. अशी परिस्थिती टाळण्यासाठी ज्या भागातून चौक्या मागे घेतल्या आहेत, त्या भागात नियमितपणे गस्त घालणे फार महत्त्वाचे असते.

गस्त घालणाऱ्या तुकड्यांची पुढील चार प्रमुख उद्दिष्टे असू शकतात : १) माहिती मिळविण्यासाठी, २) संरक्षणात्मकवजा कारवाईसाठी, ३) इच्छित जागी किंवा प्रदेशावरील आपली मालकी प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने उपस्थिती दाखविण्यासाठी आणि ४) शत्रूवर अनपेक्षित हल्ला करून त्याचा नायनाट करण्यासाठी. या शेवटच्या कारवाईला ‘डावपेची पँजर’ असे म्हणतात.

काही गस्तप्रकार खालीलप्रमाणे :

  • टेहळणी गस्त (Reiki Patroll) : इष्ट उद्देशासाठी आवश्यक माहिती काढणे, हे अशा तुकड्यांचे मुख्य काम असते. शत्रूच्या हालचाली, कार्यपद्धत, मोर्चे किंवा युद्धभूमीवरील बदललेल्या परिस्थितीबाबत माहिती मिळविण्यासाठी या गस्तीचे आयोजन केले जाते. अशा तुकड्यांमधील सैनिकांची संख्या अत्यंत अल्प असते आणि त्यांना काम संपविण्यासाठी दिलेला वेळ मर्यादित असतो. लष्करी प्रक्रियेत हे सर्वांत जोखमीचे आणि कौशल्याचे काम समजले जाते.
  • संरक्षणात्मक गस्त (Protective Patroll) : आधी उल्लेख केल्याप्रमाणे आघाडीवरील रिकाम्या अथवा वादग्रस्त सीमेवरील भूभाग व्यापण्यापासून शत्रूला मज्जाव करण्यासाठी संरक्षणात्मक तुकड्या तैनात केल्या जातात. अशा तुकड्यांची संख्या टेहळणी गस्तीमधील पथकांपेक्षा बरीच अधिक असते. त्यांना तैनात करण्यामागील उद्देश, त्यांच्या कार्यकाळाचा अवधी वगैरे सर्व घटकांचा काळजीपूर्वक विचार करून नंतरच त्यांना या कामासाठी पाठविले जाते. अनेक वेळा दुर्गम प्रदेशात, अवघड ठिकाणी देशाचा हक्क किंवा सार्वभौमत्व जाहीर करण्यासाठी गरजेनुसार अशा तुकड्या तैनात केल्या जातात. तुकड्यांचा उद्देश काहीही असो, या तुकड्या स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सक्षम असणे आवश्यक असते.
  • डावपेची पँजर (Ambush) : आघाडीवर जेव्हा दोन प्रतिस्पर्धी सैन्ये समोरासमोर मोर्चे उभारतात, तेव्हा त्यांच्या दरम्यान असलेल्या भूभागावर आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी दोन्ही बाजू आटोकाट प्रयत्न करतात. त्यामुळे या कारवाईदरम्यान दोघांच्यात चकमकी होत राहतात. भारताच्या पश्चिमी सीमेवर, विशेषतः काश्मीरच्या ताबारेषेवर, अशी स्थिती अनेक वर्षांपासून कायम आहे. दोन्ही बाजूंच्या तुकड्या सातत्यपूर्ण गस्त घालत असतात. त्यांच्यावर अनपेक्षित जागी आणि वेळीच प्रहार करण्यासाठी डावपेची पँजर (सापळे) लावले जातात. शत्रूच्या गाफील तुकड्यांना अनपेक्षित ठिकाणी सापळ्यात पकडून त्यांची जबर हानी करायची, हे त्यामागचे उद्दिष्ट असते. त्यासाठी सापळे लावणारी तुकडी शत्रूच्या गस्त तुकड्यांच्या मार्गावर मोक्याची जागा पाहून ठरलेल्या वेळी त्यांना नकळत दबा धरून बसते आणि शत्रूची तुकडी त्या जागी आली की, अचानक हल्ला चढविते. एकदा काम झाले की, तत्परतेने ती जागा सोडली जाते. पायदळ आणि कमांडो यांचा हा विशेष कार्यभाग असतो. हे काम जोखमीचे असते. सैनिकी क्षमतेची ही बहुधा सर्वांत कसोटीची कामगिरी असते.

रणांगणावर कितीही आधुनिक तंत्रज्ञान अवतरले, तरी जमिनीवर आपले नियंत्रण ठेवण्यासाठी गस्त घालणे ही अत्यंत आवश्यक आणि जोखमीची प्रक्रिया आहे. त्याबरोबरच डावपेची पँजर ही पायदळाच्या व्यावसायिक कौशल्याची परिसीमाच आहे, असे म्हणावे लागेल.

संदर्भ :

  • Applegate, Rex, Scouting and Patrolling, Winchester Cir, 1999.

प्रतिक्रिया व्यक्त करा