जोइंदु : (इ. स. ६०० ते १००० च्या दरम्यान). अपभ्रंश भाषेतील परमप्पयासु आणि योगसार ह्या ग्रंथांचा कर्ता. आपल्या ह्या दोन्ही ग्रंथांत जोइंदूने स्वतःची चरित्रात्मक माहिती दिलेली नाही. त्याच्या काळासंबंधीही संशोधकांत मतभेद आहेत. आ. ने. उपाध्ये त्याचा काळ इसवी सनाचे सहावे शतक मानतात, तर राहुल सांकृत्यायन ह्यांच्या मते तो इ. स. १००० मध्ये होऊन गेला असावा. जोइंदू जैन होता हे त्याच्या ग्रंथांतील आशयावरून उघड होतेच तथापि अन्य धर्मपंथांसंबंधी त्याची भावना सहिष्णुतेचीच होती. शिवशंकर, विष्णू, बुद्ध, जिन, ब्रह्मदेव आणि सिद्ध हे एकच होत, असे योगसारात त्याने म्हटले आहे.
संदर्भ :योगसार