रिकार्डो, डेव्हिड : (१८ एप्रिल १७७२–११ सप्टेंबर १८२३). सनातनवादी परंपरेतील थोर अर्थशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म लंडन येथे एका ज्यू कुटुंबात झाला; मात्र काही काळानंतर त्यांचे कुटुंब
हॉलंडमध्ये स्थायिक झाले. रिकार्डोचे वडील हुंड्या आणि सरकारी रोखे यांची खरेदी-विक्री करणारे दलाल होते. रिकार्डो हे वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी वडिलांच्या व्यवसायात प्रवेश केला आणि थोड्याच काळात त्यांनी प्रचंड संपत्ती मिळविली. त्यांना काही धार्मिक अडचणींमुळे आपला पंथ सोडावा लागला. परिणामी त्यांच्या वडिलांनी त्यांना जातिबहिष्कृत केले. त्यांना साहित्य आणि विज्ञान – विशेषत: गणित, रसायनशास्त्र आणि भूगर्भशास्त्र – या क्षेत्रांत रुची निर्माण झाली; मात्र शिक्षणाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले.
रिकार्डो यांना बँक व्यवसायात निर्माण होणाऱ्या समस्यांमुळे अर्थशास्त्र विषयात स्वारस्य वाटू लागले; परंतु त्यांनी इ. स. १७९९ मध्ये ॲडम स्मिथ या थोर अर्थशास्त्रज्ञाने लिहिलेला ॲन इन्क्वायरी इंटू द नेचर अँड कॉझिझ ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स हा ग्रंथ वाचला. त्या ग्रंथामुळे ते इतके प्रभावित झाले की, त्यानंतर अखेरपर्यंत अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यात त्यांनी आपला वेळ घालविला. साक्षेपी विचार, आकडेमोड करण्यातील प्रावीण्य आणि दीर्घ परिश्रम करण्याची तयारी या त्यांच्या गुणांमुळे त्यांना व्यवसायात आणि आर्थिक समस्यांचा वेध घेण्यात मोठेच यश मिळाले. इ. स. १८२१ मध्ये त्यांनी ‘पोलिटिकल इकॉनॉमी क्लब’ ही संस्था स्थापन केली. तत्पूर्वी रिकार्डो यांची इ. स. १८१९ मध्ये ब्रिटिश संसदेचा सभासद म्हणून निवड झाली.
ॲडम स्मिथ यांनी प्रस्थापित केलेल्या सनातनवादाची परंपरा रिकार्डे यांनी हिरिरीने पुढे चालविली. शासनाने आर्थिक व्यवहारांत हस्तक्षेप करू नये, खाजगी मालमत्तेवरील व्यक्तीचा हक्क अबाधित राखावा, हे सनातनवादाचे पायाभूत विचार होते. रिकार्डो यांनी आपले अर्थशास्त्रीय विवेचन या पायाभूत चौकटीच्या अनुषंगाने केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर मुक्त व्यापाराचा त्यांनी पुरस्कार केला. स्मिथ यांनीही मुक्त व्यापाराचा पुरस्कार केला; मात्र या बाबतीत काही प्रमाणात व्यावहारिक तडजोड त्यांना मान्य होती. इतर राष्ट्रांच्या आयातकरविषयक धोरणाला प्रत्युत्तर म्हणून एखाद्या राष्ट्राने आयातकराचे हत्यार काही काळ उपयोगात आणले, तर त्यांना त्याची हरकत नव्हती. देशांतर्गत उद्योगधंद्यांच्या संरक्षणासाठी ती उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे स्मिथ यांचे मत होते. या बाबतीत रिकार्डो तडजोड करायला तयार नव्हते. शासनाने अर्थव्यवहारात हस्तक्षेप करू नये, या धोरणाचा रिकार्डो हे स्मिथपेक्षाही अधिक जोरदार पुरस्कर्ते होते.
वस्तूचे मूल्य कसे ठरते, हा अर्थशास्त्रातील एक महत्त्वाचा विषय होय. स्मिथ यांचे मूल्यविवेचन श्रममापनावर आधारलेले होते. वस्तूची बाजारपेठेतील तत्कालिक किंमत, मागणी व पुरवठा यांवर अवलंबून असली, तरी दीर्घकाळात ठरणारी वस्तूची किंमत उत्पादन परिव्ययाशी निगडित असते. हा उत्पादन परिव्यय त्या वस्तूच्या उत्पादनासाठी किती श्रम खर्ची पडतात यावर अवलंबून असतो, या मृल्यनिर्धारण सिद्धांताचा रिकार्डो यांनी पाढपुरावा केला; मात्र त्यांनी मुख्यत: राष्ट्रीय उत्पन्नाचे विभाजन कसे करावे, या विषयाची चर्चा करताना आपला स्वत:चा ठसा उमटविला. राष्ट्रीय उत्पन्नात भर घालणाऱ्या उत्पादनघटकांचे मोबदले कोणत्या तत्त्वांवर ठरविले पाहिजे, याविषयीचे त्यांचे विवेचन मूलभूत स्वरूपाचे होते. आपली विभाजनाची योजना त्यांनी थोडक्यात पुढील शब्दांत मांडली आहे : ‘नफा वेतनदरावर अवलंबून असतो; वेतनदर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर अवलंबून असतो, तर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रामुख्याने अन्नधान्याच्या किमतीवर अवलंबून असतात. अन्नधान्याचे विनिमयमूल्य श्रममापनावर आधारित उत्पादन परिव्ययानुसार ठरत असते. दीर्घकाळात वेतनदर अन्नधान्याच्या विनिमय मूल्यानुसार निश्चित होत असतात. खंड फक्त अधिक सुपीक व उत्पादक भूमीला मिळतो, सर्वांत कमी सुपीक जमिनीला खंड मिळत नाही.ʼ
रिकार्डो यांचा भूमीचा ‘खंड सिद्धांत’ हा विशेष प्रसिद्ध आहे. ‘जमिनीच्या मूलभूत आणि अविनाशी शक्तीच्या उपयोगासाठी जमीन मालकाला जमिनीतील उत्पादनाचा जो हिस्सा द्यावा लागतो, तो खंड होय’, असे रिकार्डो म्हणतात. इमारती, कुंपण, पाणीपुरवठ्याच्या सोयी या रूपाने जमीन मालक जमिनीवर गुंतवणूक करीत असेल, तर त्यांसाठी त्याला मिळणारे जादा उत्पन्न खंडात समाविष्ट करता येणार नाही. जमिनीवर उगवलेल्या झाडांचे लाकूड खोदलेल्या खाणीतील खनिज यांपासून मिळणारे उत्पन्न म्हणजे खंड नव्हे. हे दोन्ही प्रकारचे अतिरिक्त उत्पन्न नफ्याच्या स्वरूपाचे असते. जमिनीच्या जन्मजात व अविनाशी गुणांसाठी मिळणारे उत्पन्न हेच खऱ्या अर्थाने खंड होय, असा रिकार्डो यांचा आग्रह होता. घटत्या उत्पादन फलाच्या गृहीतावर आधारलेला त्यांचा सिद्धांत पुढीलप्रमाणे : ‘सर्व जमीन सारखीच सुपीक नसते, म्हणूनच खंडाचा उद्भव होतो. एखाद्या निर्जन प्रदेशात माणसे प्रथमच वसती करायला येतात, तेव्हा सर्वांत सुपीक जमीन ते प्रथम लागवडीखाली आणतात; कारण जमीन निसर्गत: जेवढी अधिक सुपीक, तितके अधिक उत्पादन मिळण्याचा संभव अधिक. या जमिनीवर केलेला उत्पादनखर्च भरून निघाला पाहिजे, एवढ्या प्रमाणात जमिनीवर निघालेल्या अन्नधान्याची किंमत ठरत असते. या जमिनीला खंड मिळत नाही, जमिनीतून निघालेल्या अन्नधान्याची किंमत उत्पादनखर्चाएवढीच असते. त्या प्रदेशातील लोकसंख्या वाढू लागते; बाहेरून आणखी काही लोक स्थलांतर करून कायमचे राहायला येतात. वाढत्या लोकसंख्येच्या अन्नधान्याच्या गरजा भागविण्यासाठी नवीन जमीन लागवडीखाली आणावी लागते. नव्याने लागवडीखाली आणण्यात आलेली जमीन दुय्यम दर्जाची, पहिल्या जमिनीच्या मानाने कमी सुपीक असते. उत्तम दर्जाच्या जमिनीवर उत्पादनासाठी जेवढा खर्च झाला असेल, तेवढ्याच उत्पादन खर्चात दुय्यम जमिनीतून कमी पीक निघते. म्हणजेच, दुय्यम प्रतीच्या जमिनीतून तेवढेच उत्पादन मिळविण्यासाठी अधिक उत्पादनखर्च करावा लागतो. बाजारात अन्नधान्याचे भाव वाढले, तरच दुय्यम दर्जाची जमीन लागवडीखाली आणणे परवडते. वाढत्या मागणीमुळे अन्नधान्याच्या किमती वाढतात. वाढता उत्पादनखर्च भरून निघतो. प्रथम दर्जाच्या जमिनीचा उत्पादनखर्च भागून त्या जमीन मालकाला अतिरिक्त उत्पन्न मिळते. हे अतिरिक्त उत्पन्न म्हणजे ‘खंड’ होय. दुय्यम दर्जाच्या जमिनीला खंड मिळत नाही. जेव्हा लोकसंख्येत आणखी भर पडते, अन्न धान्याला असलेली मागणी वाढते, तेव्हा तिसऱ्या दर्जाची जमिनीला खंड मिळू लागतो आणि प्रथम दर्जाची जमीन ज्याच्या मालकीची आहे, त्याला मिळणाऱ्या खंडात आपोआप आणखी वाढ होतेʼ.
रिकार्डो यांचा हा खंडविषयक सिद्धांत अर्थशास्त्रात महत्त्वाचा सिद्धांत म्हणून गणला जातो. जमिनीच्या दर्जात फरक असल्यामुळे खंड निर्माण होतो. सर्व जमीन सारखीच सुपीक असती, तर खंड निर्माण झाला नसता, असे रिकार्डो यांचे म्हणणे होते. शेवटी लागवडीखाली आणलेल्या जमिनीचा (सीमांत जमिनीचा) केवळ उत्पादनखर्च भागत असतो. त्याहून अधिक सुपीक जमिनींना जो खंड मिळतो त्याचे कारण कमी प्रतीची जमीन लागवडीखाली आणण्याची गरज निर्माण झाली, हे होय. अधिक सुपीक जमीन धारण करणाऱ्यांना खंड मिळविण्यासाठी काहीही करावे लागत नाही. ती त्यांची अनर्जित मिळकत (अनर्जित उत्पन्न) होय. रिकार्डो यांच्या खंड सिद्धांतात अनेक दोष असल्याचे आधुनिक अर्थशास्त्रज्ञांनी दाखवून दिले असले, तरी पाश्चात्त्य देशांत अनेक पुरोगामी, समाजवादी विचारवंतांच्या विवेचनाला त्या सिद्धांताने खतपाणी घातले. ‘खंड म्हणजे जमीनमालकाला विनासायास मिळणारे अनर्जित उत्पन्न होय’, हा त्यांचा निष्कर्ष समाजवाद्यांना महत्त्वाचा वाटतो. अनेक देशांत जमीनदारी नष्ट करावी, अशी मागणी पुढे आली; जमिनीचे राष्ट्रीयकरण करावे असाही विचार मांडला गेला. याचे मूळ रिकार्डो यांच्या खंड सिद्धांतात शोधता येईल.
रिकार्डो यांचा वेतनविषयक सिद्धांत म्हणजे स्मिथ यांचा उपजीविका सिद्धांत आणि मॅल्थस यांचा लोकसंख्याविषयक सिद्धांत यांचे मिश्रण होय. श्रमिकाला किमान दर्जाचे राहणीमान ठेवण्यासाठी जितक्या पैशाची गरज आहे, तेवढ्याच प्रमाणात वेतनदर राहतील, असे रिकार्डो यांचे प्रतिपादन होते आणि ते स्मिथच्या विचारांशी मिळतेजुळते होते. वेतनदर उपजीविकेस आवश्यक असणाऱ्या रकमेहून वर गेले, तर श्रमिक लवकर लग्न करून अधिक मुले होऊ देईल, श्रमिकांची संख्या वाढेल आणि वेतनदर उपजीविका प्रमाणापर्यंत खाली येतील. उलटपक्षी वेतनदार उपजीविकेस आवश्यक असलेल्या पातळीच्याही खाली गेले, तर अनेक श्रमिक अविवाहित राहतील, श्रमिकांची संख्या घटेल आणि वेतनदर पुन्हा उपजीविका पातळीपर्यंत वाढतील, ही सनातनवाद्यांनी विचारसरणी रिकार्डो यांना मान्य होती. वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्याच्या किमती जसजशा वाढत जातील, तसतसे त्या प्रमाणात वेतन वाढवावे लागेल, अशी पुस्ती रिकार्डो यांनी जोडली. रिकार्डो यांचा वेतनविषयक सिद्धांत हा पूर्ण स्पर्धा, श्रमिकांना असणारी मागणी व श्रमिकांचा पुरवठा या गृहीतांवर आधारलेला आहे. वेतनदरावर रूढी व दयाबुद्धी यांचा होणारा परिणाम त्यांनी विचारात घेतलेला नाही. सरकारने कायदे करून वेतनदर ठरविण्यास त्यांचा विरोध होता. श्रमिकांच्या कार्यक्षमतेत फरक असतो, सर्व श्रमिक सारखेच कुशल वा अकुशल नसतात अशा अनेक कारणांमुळे वेतनदरांत भिन्नता निर्माण होते, या गोष्टींची रिकार्डो यांना जाणीव नव्हती. या सर्व वैगुण्यांमुळे त्यांची वेतनदराविषयी मते अर्थशास्त्राच्या इतिहासात दुर्लक्षित राहिली.
रिकार्डो यांनी ‘वेतन आणि नफा यांमधील प्रमाण व्यस्त असतेʼ, असे म्हटले आहे. वेतनदर कमी झाला, म्हणजे नफ्यात वाढ होते आणि वेतनदर वाढला की, नफा घटतो. वेतनदर अन्नधान्याच्या किमतीवर अवलंबून असतो. कृषिपद्धतीत सुधारणा झाली, म्हणजे जमिनीची उत्पादक शक्ती वाढते. अन्नधान्य उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल्याने किमती खाली येतात. परिणामी वेतनदर कमी होतो आणि नफ्यात वाढ होते. वाढता नफा भांडवल उभारणीस साहाय्यभूत ठरतो. भांडवल गुंतवणूक वाढल्याने साहजिकच श्रमिकाला असलेली मागणी वाढते आणि वेतनदर वर जातो. लोकसंख्या वाढू लागते, अन्नधान्याच्या किमती वर जातात आणि त्या प्रमाणात वेतनदर वाढतो. वेतन वाढले की, नफ्याचे प्रमाण कमी होते.
रिकार्डो यांच्या मते ‘कृषिक्षेत्रातील नफा अन्य उद्योगधंद्यांमधील नफा नियंत्रित करतो. शेतीव्यवसायातील नफ्याचे प्रमाण घटले, म्हणजे अन्य व्यवसायांतील नफाही घटू लागतो. याचे कारण उघड आहे. अन्नधान्याच्या किंमती वाढल्या की, अन्य उद्योगधंद्यांना कामगारांचे वेतन वाढविणे भाग पडते. परिणामी उद्योगधंद्यांना मिळणारा नफा घटतो. व्याज नफ्यात समाविष्ट असते, असे रिकार्डो यांचे मत असल्याने व्याजदराविषयीचे विवेचन त्यांच्या लेखनात आढळत नाही.
रिकार्डो यांनी आर्थिक विकासासंबंधी शास्त्रशुद्ध सिद्धांत मांडलेला नाही; परंतु त्यांच्या लेखनातून आणि तत्कालीन अर्थशास्त्रज्ञांशी त्यांनी केलेल्या पत्रव्यवहारांतून त्या विषयावरील त्यांचे विचार समजून येतात. आर्थिक विकास भांडवल उभारणीवर प्रामुख्याने अवलंबून असतो, यावर त्यांनी भर दिला आहे. भांडवल उभारणीसाठी बचतीचे आणि नफ्याचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे. उत्पादन वाढविले आणि अनुत्पादक उपभोग कमी केला, तर भांडवल उभारणीस मदत होते. करभारामुळे गुंतवणुकीवर विपरीत परिणाम होतो. करामुळे मिळकत, नफा आणि भांडवल उभारणी घटते. म्हणून रिकार्डो यांचा कर लादण्यास विरोध होता. तांत्रिक प्रगती आणि वाढते यांत्रिकीकरण रिकार्डो यांना मान्य नाही. त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढते आणि घटत्या उत्पादनफल प्रवृत्तीस आळा बसतो; हे त्यांना मान्य असले, तरी हळूहळू कामगार बेकार होतील आणि एकूण अर्थकारणावर त्याचे प्रतिकूल परिणाम होतील, अशी भीतीही रिकार्डो यांनी व्यक्त केली आहे. वाढती लोकसंख्या आणि घटते उत्पादनफल या दुहेरी प्रवृत्ती अटळ असल्याने अखेरीस नफा शून्यावर येतो आणि स्थिर अर्थव्यवस्था अस्तित्वात येते. या अवस्थेत भांडवल उभारणीला वाव नसतो, वेतनदर उदरनिर्वाहाच्या पातळीवर स्थिर होतो आणि तांत्रिक प्रगतीला खीळ बसते. अशा प्रकारे आर्थिक विकासाची गतिशील प्रक्रिया स्पष्ट करताना रिकार्डो यांनी अचल प्रतिमानाचा उपयोग केला आहे. आधुनिक अर्थशास्त्रज्ञांना ते प्रतिमान सर्वथा मान्य नसले, तरी त्यांनी रिकार्डो यांच्या अनेक संकल्पना स्वीकारल्याचे दिसून येते.
रिकार्डो हे मुक्त व्यापाराचे पुरस्कर्ते होते. अनिर्बंध आंतरराष्ट्रीय व्यापार सर्व देशांना कसा फायदेशीर ठरतो, हे स्पष्ट करताना त्यांनी मांडलेला ‘तौलनिक उत्पादन परिव्यय सिद्धांत’ अर्थशास्त्रात मान्यता पावला आहे. स्मिथ यांनी आपल्या वेल्थ ऑफ नेशन्स या जगप्रसिद्ध ग्रंथात आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत श्रमविभागणीच्या तत्त्वावर विशद केला. प्रत्येक देशाला काही वस्तूंचे उत्पादन करणे निसर्गत: सोयीचे असते. जर परकीय राष्ट्र एखाद्या वस्तूचा स्वस्त दरात पुरवठा करीत असेल, तर ती वस्तू आपण जी वस्तू स्वस्त दरात पुरवू शकतो त्या वस्तूच्या बदलत्या खरेदी करणे हे दोन्ही राष्ट्रांना फायद्याचे ठरेल, असे स्मिथ यांनी म्हटले आहे. स्मिथ यांच्या या विधानात तथ्य असले, तरी त्या विधानाला काही मर्यादा आहेत. एका विविक्षित प्रमाणात मजूर वापरून एखाद्या देशाला अन्य देशांपेक्षा एखादी वस्तू अधिक प्रमाणात उत्पादन करता येते हे खरे; परंतु ज्या देशाला कोणतीही वस्तू अन्य देशांपेक्षा कमी खर्चात उत्पादन करता येत नसेल, तर त्या देशाला अन्य देशांशी व्यापार करताच येणार नाही, असा स्मिथ यांच्या विधानाचा अर्थ होतो.
रिकार्डो यांनी आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांताला अधिक निश्चित व अधिक स्वीकारार्ह रूप दिले. ग्रेट ब्रिटनसारखा एखादा देश गहू व मद्य या दोन्ही वस्तू तेवढ्याच खर्चात पोर्तुगालच्या मानाने अधिक प्रमाणात निर्माण करू शकेल. प्रश्न असा की, अशा परिस्थितीत दोन्ही देशांदरम्यान व्यापाराची शक्यता आहे का? स्मिथ यांनी याचे उत्तर दिले नाही. रिकार्डो यांनी ‘तौलनिक परिव्यय सिद्धांत’ मांडून परस्पर व्यापार दोन्ही देशांना फायदेशीर आहे, असे सिद्ध केले. ग्रेट ब्रिटन गहू व मद्य यांचे उत्पादन अनुकूल परिस्थितीमुळे पोर्तुगालपेक्षा जादा प्रमाणात करतो; दोन्ही वस्तू उत्पादित करणे पोर्तुगालला तोट्याचे आहे आणि गव्हाचे उत्पादन करणे अधिक तोट्याचे आहे. रिकार्डो यांच्या सिद्धांताप्रमाणे पोर्तुगालने मद्याच्या उत्पादनावर आपले उत्पादन घटक केंद्रित करणे दोन्ही देशांच्या दृष्टीने फलदायी ठरेल. जॉन स्ट्यूअर्ट मिल व अन्य सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी रिकार्डो यांच्या विवेचनाचा आधार घेऊन खुल्या व्यापाराचे समर्थन केले.
तात्त्विक चिंतन आणि तर्कशास्त्राचा साक्षेपी उपयोग, हे रिकार्डो यांच्या अनेक सिद्धांतांमागील प्रमुख आधार असल्याचे दिसून येते. आपल्या निष्कर्षांच्या पुष्ट्यर्थ ऐतिहासिक किंवा सांख्यिकीय पुरावे देण्याची काळजी त्यांनी घेतली नाही. आपल्या सिद्धांतांचा वस्तुस्थितीशी किती संबंध आहे, हे त्यांनी कधी पाहिले नाही. विचारवंतास आवश्यक असणारी सुसंगत विचारसरणी आणि सुस्पष्ट अभिव्यक्ती त्यांच्या लेखनात अभावानेच आढळते. रिकार्डो निराशावादी होते. ‘अर्थशास्त्र हे उदास वृत्तीचे शास्त्र असल्याचे’ तत्कालीन तत्त्ववेत्त्यांनी ठामपणे प्रतिपादन केले, त्यास रिकार्डो हे काही अंश जबाबदार होते. असे असले, तरी अर्थशास्त्राचा एक जनक आणि एकोणिसाव्या शतकातील एक महान अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांचे स्थान अबाधित आहे. त्यांच्या अनेक संकल्पना आजही वादविषय झाल्या आहेत. पिएरो स्राफा यासारखे आधुनिक अर्थशास्त्रज्ञ त्यांच्या सिद्धांतांची वेळोवेळी दखल घेतात. यांवरून रिकार्डो यांचे महत्त्व लक्षात येते. इ. स. १८२२ मध्ये त्यांची प्रोटेक्शन टू अँग्रिकल्चर ही पुस्तिका प्रसिद्ध झाली. नामवंत स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन रॅम्झी माकलक यांच्या मते ‘रिकार्डोने अन्य काही लेखन न करता केवळ ती एकच पुस्तिका लिहिली असती, तरी श्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञांत त्याची निश्चितपणे गणना झाली असतीʼ.
रिकार्डो यांनी अनेक ग्रंथ लिहिले असून त्यांपैकी काही ग्रंथ पुढील प्रमाणे : थ्री लेटर्स ऑन दि प्राइस ऑफ गोल्ड (१८०९), दि हाय प्राइस ऑफ बुलियन : अ प्रूफ ऑफ दि डिप्रीशिएशन ऑफ बँक नोट्स (१८१०), रिप्लाय टू मीस्टर बोसानक्वेस्ट प्रॅक्टिकल ऑब्झरवेशन्स ऑन दि रिपोर्ट ऑफ दि बुलियन कमिटी (१८११), एसे ऑन दि इन्फ्लुअन्स ऑफ अ लो प्राइस ऑफ कॉर्न ऑन द प्रॉफिट्स ऑफ स्टॉक (१८१५), प्रपोजल्स फॉर ॲन इकॉनॉमिकल अँड सिक्युअर करन्सी (१८१६), ऑन दि प्रिन्सिपल्स ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी ॲण्ड टॅक्सेशन (१८१७) प्लॅन फॉर दि इस्टॅब्लिशमेंट ऑफ अ नॅशनल बॅक (१८२३) इत्यादी.
रिकार्डो यांचे ग्लाउसेस्टर परागणयातील गॅटकोम पार्क येथे निधन झाले.
संदर्भ :
- Blaug, Mark, Ricardian Economics : A Historical Study, New Haven, 1958.
- Hollander, Jacob II. The Economics of David Ricardo, Toronto, 1979.
- Sraffa, Piero, Ed. The Works and Correspondence of David Ricardo, Cambridge, 1973.
- St. Clair, Oswald, A Key to Ricardo, New York, 1975.
समीक्षक : संतोष ग्या. गेडाम
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.