स्टीफन्स, फादर थॉमस : ( १५४९ – १६१९ ). ख्रिस्ती मराठी कवी-साहित्यिक. जन्माने इंग्रज. शिक्षण विंचेस्टर येथे. थॉमस स्टीव्हन्स तसेच पाद्री एस्तवाँ या नावांनीही परिचित. या ख्रिस्ती कवीविषयी तारखेच्या आधारे अवघ्या दोनच महत्त्वाच्या घटना कागदोपत्री आपणास ठामपणे सांगता येतात. २४ ऑक्टोबर १५७९ या दिवशी ते भारतभूमीत पदार्पण केले त्याचा उल्लेख व त्यांनी क्रिस्तपुराण  हे महाकाव्य जे इ. स. १६१४ मध्ये पूर्ण केले, त्याचा त्यांनी स्वत: त्या महाकाव्याच्या शेवटी केलेला उल्लेख. त्यांचा जन्म इंग्लंडच्या बुल्टशर परगण्यातील बोस्टन येथे झाला. त्यांच्या जन्माची तसेच मृत्यूची नक्की तारीख अद्यापही उपलब्ध नाही; तसेच त्यांना कुठे पुरले गेले, हेही सांगण्यात येत नाही. तथापि, मराठी साहित्यातील एक अग्रगण्य कवी म्हणून ते पुढे आले. इ. स. १६१६ मध्ये या मराठी महाकाव्याची छापील आवृत्ती तत्कालीन तांत्रिक अडचणींमुळे रोमन लिपीत प्रकाशित झाली.

१०,९६२ इतक्या प्रचंड संख्येच्या ओव्या असलेल्या भल्यामोठ्या महाकाव्याचे वरदान या एका परदेशी प्रतिभावंताने मराठी साहित्यविश्वाला दिले, ही एक अभूतपूर्व अशी बाब आहे. त्या महाकाव्याच्या मागे त्यांच्या जीवनातील दोन महत्त्वाच्या घटना प्रामुख्याने कारणीभूत असाव्यात. पहिली घटना ही जी फादर स्टीफन्स यांना त्यांच्या जन्मभूमीत इंग्लंडमध्ये पाहायला मिळाली व दुसरी घटना गोवा येथे त्यांच्या कर्मभूमीत पाहायला मिळाली.

ज्या देशात फादर स्टीफन्स यांचा जन्म झाला, त्या इंग्लंडमध्ये कॅथलिक व प्रॉटेस्टंट या एकाच धर्माच्या दोन पंथांच्या अनुयायांत परस्परद्वेषाचे थैमान माजले होते. तसेच ज्या गोव्याच्या भूमीत त्यांनी आपल्या मिशनरी कार्याला सुरुवात केली, त्या मडगावजवळील कुंकोळी गावात ख्रिस्ती आणि हिंदू या दोन भिन्न धर्मांच्या अनुयायांत तशाच प्रकारचे वैर चालू होते. त्यात फादर थॉमस आक्वाविवा हे कॅथलिक धर्मपंडित त्यांच्या चार सहकाऱ्यांसह १५ जुलै १५८३ रोजी जीवे मारले गेले होते व भर पावसाळ्यात तळ्यात तरंगणाऱ्या त्या धर्मोपदेशकांची प्रेते दफन करण्याचे काम फादर थॉमस स्टीफन्स या तरुण ख्रिस्ती धर्मगुरूसमोर आले होते. ‘धर्म जर परस्परप्रेमाची शिकवण देत असेल, तर दोन धर्मांच्या अनुयायांमध्ये असा वैरभाव का?’ हा प्रश्न ते स्वत:ला वारंवार विचारू लागले व त्यातून क्रिस्तपुराण  नावाचे महाकाव्य आकार घेऊ लागले.

दरम्यान गोव्यात रायतूर येथे ६ सप्टेंबर १५५६ रोजी गलबतातून योगायोगाने उतरलेल्या छपाईच्या यंत्राद्वारे ते अनेक वाचकांपुढे यायला हवे, हा विचारही ओघाने पुढे आलाच. फादर स्टीफन्स यांनी बायबलमधील ‘जुना करार’ आणि ‘नवा करार’ यांचे निरूपण आपल्या महाकाव्यात अनुक्रमे ‘पुराण पहिले’ व ‘पुराण दुसरे’ यांत समाविष्ट केले. ‘पुराण पहिले’त बायबलमधील ‘जुना करार’ गुंफलेला आहे; तर ‘पुराण दुसरे’ या विभागात ‘नव्या करारा’चे चित्र उभे केले गेले आहे.

क्रिस्तपुराण रचनेमागची भूमिका : पोर्तुगीज राज्यकर्ते जेव्हा गोव्याला आले, तेव्हा ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या बांधवांना त्यांचे आधीचे हिंदू धर्मातील ग्रंथ वाचण्यावर राज्यकर्त्यांकडून बंदी आली. कीर्तनावरदेखील बंदी आली. ती पोकळी भरून काढण्यासाठी साहजिकच नवख्रिस्ती ब्राह्मणांनी फादर स्टीफन्स यांच्याकडे विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन बायबलचे निरूपण करणारी एक प्रवचनमालिका सुरू झाली. जी सलग ९० रविवार चालली. शिष्य गुरूला प्रश्न विचारतो आहे व गुरू त्याला उत्तर देत आहे, अशाप्रकारे बायबलमधील सत्य कथन करण्याची धाटणी फादर स्टीफन्स यांनी अवलंबिली. तिला चांगला प्रतिसाद मिळाला. ग्रीक, लॅटिन, इंग्रजी, फ्रेंच व इटालियन या पाश्चात्त्य भाषांबरोबरच संस्कृत भाषेवरील त्यांचे प्रभुत्व व त्यांचा अफाट शब्दसंग्रह हा त्यांना या कामी उपयोगी पडला आहे. हिंदू धर्मातील शब्दांना व संकल्पनांना त्यांनी एकप्रकारे ‘बाप्तिस्मा’ देऊन आपल्या क्रिस्तपुराणात सामाविष्ट केले आहे.

‘एखादी परदेशी व्यक्ती इतके उत्कृष्ट महाकाव्य रचू शकते का’, याविषयी गेल्या दोन-चार पिढ्यांत उलटसुलट विचार मांडले गेले आहेत. ‘हे महाकाव्य फादर स्टीफन्स यांचे नाहीच’ अशी ठाम भूमिका घेणारे काही विचारवंत ‘चूक आहेत’ असे आपल्याला रोखठोक म्हणता येणार नाही. फादर स्टीफन्स यांची मराठी भाषेवर व साहित्यावर इतकी घट्ट व जबर पकड असेल, यावर विश्वास ठेवणे प्रथमदर्शनी त्यांना अवघड जाते. तथापि, क्रिस्तपुराणाच्या एकूण जडणघडणीत व मांडणीत जे विचार गुंफण्यात आलेले आहेत, ते ख्रिस्ती धर्माच्या थिऑलॉजी या धर्मशास्त्राचा परिपूर्ण अभ्यास ज्याने केलेला आहे, ख्रिस्ती परंपरेच्या मुशीतून ज्याचे बालपण व उभे आयुष्य गेले आहे, त्या प्रतिभावंत कवीश्रेष्ठालाच ते शक्य आहे, असे आपल्याला दिसून येईल. ‘ईशपरिज्ञान’ (Theology) हा ख्रिस्ती धर्माचा गाभा आहे. तो आतून-बाहेरून ज्याला पूर्णपणे उमजला असेल, तोच कवी असे महाकाव्य रचू शकतो. केवळ शब्दपांडित्याच्या जोरावर व फक्त भाषेच्या प्रभुत्वावर अशी बांधेसूद काव्यरचना होऊ शकत नाही, अशा विचारसरणीची जी मंडळी आहे, ती क्रिस्तपुराणाच्या जडणघडणीची माळ निर्विवादपणे फादर स्टीफन्स यांच्याच गळ्यात घालते.

फादर स्टीफन्स यांच्या भाषाशैलीवर संत एकनाथकालीन काव्यशैलीचा प्रभाव जाणवतो; तथापि क्रिस्तपुराणाची जडणघडण ही मराठी भाषेत झाली की कोकणी भाषेत झाली, हा देखील एक वादाचा विषय आहे. क्रिस्तपुराणाच्या सुरुवातीलाच ओवी क्रमांक १२५ ते १२९ यांमध्ये मराठी भाषेची जी थोरवी गायली गेली आहे व संपूर्ण महाकाव्यात अनेकवार मायमराठीचा जो उल्लेख आलेला आहे, तो लक्षात घेता हे महाकाव्य मराठीतच लिहिले गेले, हा विचार अधिक प्रभावी ठरतो. फादर स्टीफन्स यांच्या काळात गोवा विभागात सर्वसामान्य लोकांची बोलीभाषा ही जरी कोकणी असली, तरी सुशिक्षित उच्चवर्गीयांची भाषा ही मराठी होती. मात्र स्थानिक अप्रगत बोलीभाषेत ग्रंथरचना होत नव्हती, एवढेच. शिवाय, गोव्याच्या भूमीतील लोकभाषेला उद्देशून ‘कोकणी भाषा’ हा विशिष्ट शब्दप्रयोग तोवर प्रचलित झाला नव्हता. वस्तुस्थिती ही अशी असली, तरी इ. स. १५१४ यावर्षी छपाईसाठी देवनागरी लिपीचे खिळे उपलब्ध होऊ न शकल्यामुळे देवनागरी लिपीत तयार केलेल्या ह्या मराठी महाकाव्याचे लिप्यंतर रोमन लिपीत करून त्याची प्रथमावृत्ती इ. स. १५१६ मध्ये दक्षिण गोव्यातील रायतूर येथील जेज्वीट (जेझुइट) कॉलेजमध्ये फादरांच्या ‘सेंट इग्नेशिअस’ या छापखान्यात छापून प्रसिद्ध करण्यात आली.

गोव्याच्या सालसेट येथे फादर स्टीफन्स मृत्यू पावले.

संदर्भ :