आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भगवान धन्वंतरी यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला जातो. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती साजरी करतात. भगवान धन्वंतरी हे देवांचे वैद्य मानले जातात. ‘आरोग्य देवता धन्वंतरी हे समुद्रमंथनावेळी अमृत कलश घेऊन आले’ अशी आख्यायिका प्रचलित आहे.

सन २०१६ मध्ये भारत सरकार-आयुष मंत्रालयाने आयुर्वेद उपचार पद्धतीचे दैवत असलेल्या भगवान धन्वंतरी यांचा जन्मदिवस “राष्ट्रीय आयुर्वेद दिन” म्हणून घोषित करण्याचा निर्णय दिला. यानुसार सर्वप्रथम २८ ऑक्टोबर २०१६ रोजी आयुर्वेद दिवस साजरा करण्यात आला.

आयुर्वेदाच्या क्षमतेवर व विविध उपचार पद्धतींवर लक्ष केंद्रित करणे आणि आयुर्वेद शास्त्राचा जगभर प्रसार करणे हा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश आहे. हा दिवस विविध आजारांवरील उपचारांमध्ये आयुर्वेदिक तत्त्वांचा समावेश व्हावा यासाठी समर्पित आहे. आयुर्वेदिक उपचार पद्धती ही काळाची गरज असून या दिवसाच्या निमित्ताने या उपचार पद्धतीस प्रोत्साहन दिले जाते. राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त पुढील उद्दिष्टे ठेवण्यात आली होती –

राष्ट्रीय आयुर्वेद दिवस                                     उद्दिष्टे

२८ ऑक्टोबर २०१६                  मधुमेह प्रतिकार व नियंत्रणासाठी आयुर्वेद

१७ ऑक्टोबर २०१७                  वेदना शमन करण्यासाठी आयुर्वेद

०५ नोव्हेंबर २०१८                    सार्वजनिक आरोग्यासाठी आयुर्वेद

२५ ऑक्टोबर २०१९                  दीर्घायुष्यासाठी आयुर्वेद

१३ नोव्हेंबर २०२०                     कोविड-१९ नियंत्रणासाठी आयुर्वेद

सन २०२० मध्ये राष्ट्रीय आयुर्वेद दिवसाचे औचित्य साधून जामनगर (गुजरात) येथील ‘आयुर्वेद शिक्षण आणि अनुसंधान संस्था’ व जयपूर (राजस्थान) येथील ‘राष्ट्रीय आयुर्वेद संस्था’ या संस्थांचा लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला.

समीक्षक : कौस्तुभ चौंडे