जोशी, प्रभाकर तानाजी 

(५ जानेवारी, १९३४ – )

प्रभाकर तानाजी जोशी यांचे आयुर्वेदाचे शिक्षण नाशिक व पुणे येथे झाल्यांनतर त्यांनी धुळे नगरपरिषदेत सेवा केली. तसेच धुळ्याच्या स्वरूपसिंग नाईक महाविद्यालयात मानद प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापन केले. पुणे विद्यापीठात ते स्वीकृत सदस्य होते, तसेच अखिल भारतीय आयुर्वेद विद्य, आयुर्वेद प्रसारक संघाचे पदाधिकारी, विद्यापीठाच्या राज्यशाखेच्या धन्वंतरी शिक्षण संस्थेचे अधिकारी अशी विविध प्रकारची कामे केली. आयुर्वेदाचा प्रचार, प्रसार होण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने दिली.

संशोधन आणि संशोधक या दोन संज्ञा आयुर्वेदाच्या संदर्भात वेगळ्यापद्धतीने विचाराने लक्षात घ्यायला हव्यात. मुळात आयुर्वेदीय ग्रंथात ते सूत्ररूपाने, संक्षेपात लिहिले आहेत. लिखाण पाठ वजावे हा त्यावेळेचा हेतू असावा. ग्रंथात लिहिलेली जबाबदारीने आणि हिमतीने करावयाची पंचाकर्मासारखी कर्मे त्यांनी मोठ्या प्रमाणात अंमलात आणली. याच दृष्टीने कार्य केलेले अमरावतीचे वैद्य त्र्यं. म. गोगटे हे त्यांचे प्रेरणास्थान ठरले. अलर्जी, मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुन्या, गोवर यांसारख्या साठी या नवीन समजल्या जाणाऱ्या रोगांवर प्रभाकर तानाजी-जोशी यांनी आयुर्वेदातील त्रिदोषादी प्रकुपित होण्याच्या संज्ञामधून विचार करून विशेषतः शरीरशुद्धीचे उपचार करून तत्काळ किती लाभ होतो हे त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि समाजालाही दाखवून दिले. क्षयाचा उतारवयातील मरणासन्न एक रोगी त्यांनी वमनाचे शास्त्रोक्त औषध देऊन पूर्ण बरा केला. या रोग्याने दिलेली एक लाख रुपयांची फी धुळे नगरपरिषदेला देऊन ३० खाटांचे महाराष्ट्रातील पहिले आंतरविभागीय आयुर्वेद रुग्णालय नंदलाल मोदी या त्या रोग्याच्या नावाने सुरु केले.

अशा तऱ्हेने तातडीने शरीर शुद्धीचे – वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, नस्य उपाय करून ज्याला सध्या इमर्जन्सी अवस्था म्हणतात त्याचे विविध रोग्यांना उपयोगी पडलेले रूग्णांची उदाहरणे त्यांनी आपल्या पुस्तकात नमूद केलेले आहेत. गोवराच्या स्थित तर त्यांनी घरोघरी शिबिरे अत्यल्प मूल्यात घेतली. आपल्या अनुभवाने आणि ज्ञानाने त्यांनी पंचकर्माचे उपचार करणारे हजारो विद्यार्थी तयार केले.

पुण्याच्या खडीवाले संशोधन संस्था व राष्ट्रीय शिक्षण संस्थेने त्यांना पुरस्कार दिले.

समीक्षक : बाक्रे, मेघना अचिंत्य